भूतलावरील स्वर्गाच्या वाटेवर भाग २

       दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसहा वाजता राणी लक्ष्मीबाईच्या थाटात पुन्हा घोड्यावर चढले. चौदा किलोमीटरच्या प्रवासाने माझी आणि घोड्याची थोडी भीड चेपली होती. आता सहा किलोमीटर अंतर चढायचं होतं आणि समुद्रसपाटीपासून सोळा हजार फूट उंचीवर असलेलं शिखांचं धर्मक्षेत्र 'हेमकुंडसाहिब' इथं जायचं होतं.


          हेमकुंडपर्यंतच्या प्रवासात शिखांचे तांडेच्या तांडे भेटतात. बायकांना, लहानग्या मुलांना, म्हाताऱ्या-कोताऱ्यांना घेऊन देवदर्शनाच्या असीम ओढीनं सर्वस्व झोकून देऊन चढत जाणारी आणि मुखानं भजनं म्हणत किंवा 'जो बोले सो निहाल' चा घोष करत चढणारी शीख मंडळी पाहून मनात विचार येतो,की विठ्ठलाच्या ओढीनं अभंग म्हणत वर्षानुवर्षं पंढरीची पायी वारी करणाऱ्या आमच्या वारकऱ्यांच्या आणि या मंडळींच्या भक्तिभावनेत कोणता मूलभूत किंवा गुणात्मक फरक आहे? शेवटी देव जसा एक तसाच माणूसही एक आणि त्याची भक्तिभावनाही एक; परिवेश तेवढा निराळा!


         हेमकुंडच्या रस्त्याला लागलो मात्र, थोड्याच अंतरावर गुलाबी फुलांच्या तुऱ्यांचे ताटवेच्या ताटवे दिसायला लागले. डाव्या हाताला असलेल्या डोंगरातल्या दगडांमधून डोकावणाऱ्या ब्लू पॉपीज आणि उजवीकडच्या उतारावर गुलाबी, पिवळी, लालचुटुक फ़ुलं आणि त्यामध्ये उगवलेली ब्रह्मकमळं- इथल्या ब्रह्मकमळांपेक्षा वेगळी, हलक्या पिवळट हिरव्या रंगाची. कळीच असलेली! बाकी इथल्या फुलांना सुगंध मात्र नाही. नुसतंच देखणं,गोंडस रूप!           
       'देता किती घेशील दो करांनी' असं म्हणणारा निसर्ग सौंदर्याची मुक्त उधळण करतो आणि त्याच्या प्रचंडपणापुढे क्षुद्र ठरणाऱ्या आपल्या अस्तित्त्वाचा एरवी आपण केवढा गहजब माजवत असतो.


        वरती पोचलो तर जिकडेतिकडे शीख मंडळी दिसत होती. प्रथम हेमकुंडात जाऊन स्नान तरी करा किंवा हात-पाय तरी धुवा आणि मगच गुरुद्वारात प्रवेश करा. निसर्गरम्य देखण्या हेमकुंडाभोवती लोकांचा गराडा होता. एरवी बर्फ होणारं हेमकुंड जुलै-ऑगस्टच्या दिवसांत बर्फ विरघळल्याने पाण्यात म्हणजेच कुंडात रूपांतरित होत असतं. पाण्याचा तळ स्वच्छ दिसत होता. क्षणात धुकं येत होतं आणि हेमकुंडाला असं वेढून टाकत होतं, की आपण पाहिलेलं कुंड आणि त्याभोवतालच्या हिमनद्यांनी सजलेल्या पर्वतरांगा हा भास होता की काय, असं वाटावं. पाणी अर्थातच बर्फ़गार होतं. हात-पाय धुऊन आम्ही गुरुद्वारात प्रवेशलो. प्रसन्न वातावरण होतं. अत्यंत गोड आवाजात भजनं गायली जात होती. त्यानंतर प्रवचन होतं. एक अक्षरही कळत नव्हतं. पण भाषेचे बंध सगळे तुटलेच होते. शब्दांचे अर्थ जाणून घेण्याची गरजच वाटत नव्हती.


         वातावरण भारलेलं  होतं. समोरच्या दरवाजातून मध्येच हेमकुंड दिसत होतं; पुन्हा दिसेनासं होत होतं. थंडी वाढत चालली होती. हात-पाय गारठू लागले होते. प्रवचन संपल्यावर दर्शन घेतलं आणि पुन्हा जागेवर येऊन बसलो. मनात काही उचंबळतंय असं वाटत होतं. एकदम लक्षात आलं, की आपल्या डोळ्यांतून पाणी वाहू लागलं आहे. हळूच इतरांकडे पाहिलं तर त्यांचीही तीच अवस्था दिसत होती. आमच्याबरोबर असलेल्या मुस्लिम मायलेकींच्या डोळ्यातूनही धारा लागल्या होत्या. मोकळेपणाने डोळे वाहू दिले. कोण जाणे मनातलं काय काय धुऊन निघत होतं. म्हटलं, होऊन जाऊ दे.


        गुरुद्वारातून बाहेर पडलो. तेव्हा अभ्यंगस्नान करून शुचिर्भूत झाल्यासारखं वाटत होतं आणि क्षणार्धात मला स्वर्गाची नवी व्याख्या सापडली-- ज्या ठिकाणी मनाला स्नान घडतं व ते स्वच्छ होऊन जातं, तो स्वर्ग! ज्या ठिकाणी मनातल्या काळोखाच्या भावना दूर होतात आणि मन लखलखीत उजेडाने भरून जातं, तो स्वर्ग आणि ज्या ठिकाणी साऱ्या तपशिलांच्या कपच्या गळून पडून आपल्या अस्तित्त्वाचा केवळ एक ठिपका शिल्लक राहतो तो स्वर्ग!


            कमालीच्या निग्रहानं तिथून उठलो आणि बाहेर पडलो.  लंगरमध्ये खिचडी व चहा घेतला. सेवाभावीवृत्तीनं भांडी घासणाऱ्या, स्वयंपाक करणाऱ्या व एरवी मोठमोठ्या अधिकारपदांवर असलेल्या  शीख मंडळींकडे पाहिलं की मन आदरानं भरून जातं. खरोखरच माझं-तुझं करण्यात, मान-अपमानाच्या,सुख-दुःखाच्या हीन कल्पनांमध्ये अडकून आपण आपल्या जीवनाचा केवढा काळ व्यर्थ गमावत असतो.


        चौथ्या दिवशी जेव्हा घांग्रियाचा निरोप घेतला, तेव्हा मनात खंत नव्हती, अपूर्णताही नव्हती. आता घोड्याची,डोंगराची की नदीची कशाचीच भीती उरली नव्हती.