माझी प्रेम कहाणी (भाग ३) -शेवटचा

पुढे काय होणार या विचारांनीच मला कसेतरी होत होते. पण एक गोष्ट होती ती म्हणजे नकाराची अपेक्षा, आणि मी त्याला तयार होतो. ठरल्यावेळेला मी तिकडे पोहोचलो. थोड्याच वेळात आमच्या बाईसाहेब पण आल्याच. मी खुपच कसल्यातरी दबावाखाली होतो. काही वेळ उगाचच इकडच्या-तिकडच्या गप्पा मारल्या. घड्याळाचे काटे पुढे-पुढे जात होते. शेवटी अधीक वेळ घालवण्यात अर्थ नाही म्हणुन मी सरळ विषयाला हात घालायचे ठरवले.
प्रथम मी तिला विचारले, "तुला माहित आहे का मी तुला कशाला इकडे बोलावले?" ती हसली, जणु काही तिला माहीत आहे कशाला ते. पण मला नाही म्हणाली.
मग मी तिला म्हणालो, "मी जे काही बोलेन, ते निट आधी ऐकुन घे आणी नंतर बोल.. आणी अजिबात हसायचे नाही."..
तीः "ठिक आहे".
मग प्रथम मी तिला माझ्याबद्दल थोडक्यात सांगीतले, माझे पालक, नातेवाईक, माझी शैक्षणीक वाटचाल, माझा स्वभाव, आवडी-निवडी, माझे भविष्याबाबतचे विचार वगैरे. मी तिला माझ्या जिवनात येउन गेलेल्या माझ्या प्रेमप्रकरणांबद्दल पण सांगीतले, हो उगाच नको अंधारात ठेवायला. तिने सगळे हे शांत पणे ऐकुन घेतले. त्यामुळे माझा आत्मविश्वास थोडा वाढला आणी मला जरा मोकळे-मोकळे वाटायला लागले. मग मी तिला माझे जोडीदाराबद्दल चे मत सांगीतले आणी म्हणालो ".. थोडक्यात ती तुझ्यासारखी असावी." ती परत हसली. [मस्त रे !! छान टाकलास.. पोरगी हसली बघ !] मग एकदमच विचारले "माझ्याशी लग्न करशील??, मला तु खुप आवडतेस असे मी म्हणणार नाही कारण खुप शब्दाची व्याप्ती कमी आहे, तु मला त्यापेक्षाही कितीतरी अधीक आवडतेस." अवकाशात शांतता कशी भासत असेल ते मी अनुभवले. मी हे सर्व खाली मान घालुनच बोलत होतो. माझे कान तिचे बोलणे ऐकायला असुसले होते.. पण ती काहीच बोलली नाही. मी वर पाहिले, ती माझ्याकडेच बघत होती. तिच्या मनात काय चालले असेल त्याची मला काहीच कल्पना येत नव्हती.


शेवटी मी म्हणालो.."तुला काही बोलायचे नाहीये का?"
तीः "तुच म्हणालास ना मधे काही बोलु नकोस. तुझे झाले की सांग मग बोलते."
मीः "मला माहिती आहे मी तुझ्याइतका चांगला नाही दिसायला, माझे मित्र म्हणतात त्याप्रमाणे 'लंगुर के मुहं मे अंगुर' असेल ही कदाचीत पण आयुष्याच्या शेवटा पर्यंत हाच चेहरा साथ देत नाही, साथ असते ते आपले मन आणी मनात असणारे प्रेम. मला माहीत आहे की तु मला नाहीच म्हणशील पण माझे मन मला स्वस्थ बसुन देत नाही. तुच सांग त्याला समजाउन. झाले माझे बोलुन आता बोल."


तीः "तु आत्ता जे काही बोललास ते मला माहीत होते..!!!!! तु जेव्हा मी आणी गौरीशी बोलत बसायचास तेंव्हा मला वाटत होते की तुला गौरी आवडते, खरे तर सगळ्यांनाच तसे वाटत होते. 'रोज डे' ला जेंव्हा तु दोघींनाही लाल गुलाब दिलास तेंव्हा मला वाटले की खरे तर तुला फक्त गौरीलाच दयायचा होता, मला आपला उगाचच दिलास. असो, पण अशा गोष्टी लपुन रहात नाहीस. मला कुठुन तरी हे कळलेच. दुसरी गोष्ट, हे लंगुर वगैरे तु जे काही बोललास ते मला आजिबात आवडले नाही. तु खरंच खुप चांगला आहेस, खरं तर मीच तुला योग्य नाहीये. मला पण तु आवडतोस, पण माझे काही प्रॉब्लेम्स आहेत. मला शक्य असते तर मी तुला नक्की हो म्हणले असते. पण कदाचित हे शक्य नाहीये."


त्यानंतर ही ती बरेच काही बोलली पण माझे लक्षच नव्हते. माझा चेहरा खुप पडला होता. आयुष्यात काही शिल्लकच नाहीये असे वाटु लागले. घरी जाताना मला म्हणाली "सावकाश जा. आणी घरी पोहोचल्यावर फोन कर." मला घरी जायचा खुप कंटाळा आला होता, म्हणुन मी मित्राकडे गेलो आणी तेथुन घरी उशीरच गेलो. घरी गेल्यावर कळले बाईसाहेबांचा फोन येउन गेला. म्हणुन फोन केला तर मला खुप ओरडली.. कुठे गेला होतास, फोन का नाही केलास वगैरे. दुसऱ्या दिवशी पण कॉलेज ला जायचा खुप कंटाळा आला होता, जरा ताप पण वाटत होता, म्हणुन जरा उशीराच उठलो. जरा उशीराच जायचे ठरवुन आवरले, तेवढ्यात फोन आला.."कॉलेजला नाही जायचे का? नापास होयचेय?" कोण बोलतेय..काय.‌.काहीच नाही.. मग कळले पल्लवी आहे.. मग मी म्हणालो.."नाही.. जरा बरे वाटत नाहीये म्हणुन जरा उशीराच जाणार आहे." मग जरा गप्पा मारुन फोन ठेवुन दिला. मग आंघोळ वगैरे आटोपली, आवरले, मेल वगैरे चेक केली तेवढ्यात बेल वाजली. सकाळी सकाळी कोण आले म्हणुन दार उघडले आणी पाहतो तर काय.. दारात पल्लवी उभी.. माझा माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. तिला बघीतले आणी ताप-बिप सगळे गेले, एकदम प्रसन्न वाटु लागले. साक्षात आमच्या बाईसाहेब आमच्या तब्येतीची चौकशी करायला आमच्या घरी दाखल झाल्या होत्या. मला काय करु आणी काय नको असे झाले. मग मी स्वयंपाक-घरात धाव घेतली, म्हणलं.. निदान सरबत तरी करावे, पण कुठे काही सापडतच नव्हते. माझी शोधाशोध चालुच होती, नुसते भांड्यांचेच आवाज येत होते. शेवटी तिच आत आली आणी सगळे शोधुन सरबत बनवले सुध्दा. तिला स्वयंपाक-घरात काम करताना बघुन मला उगाचच मी नवरा आणी ति माझी बायको वाटु लागले.


असो.. नंतर माझे आयुष्य पुर्वपदावर आले. रोज सकाळ दुपार संध्याकाळ मी जेव्हा शक्य होइल आणी जितका वेळ शक्य होइल तितक्या तिच्याशी गप्पा मारायचो, रोज रात्री फोन असायचा. आधी फक्त मीच करायचो, नंतर नंतर ती पण करायला लागली. या काळामध्ये मला अजुन बऱ्याच नविन गोष्टी कळल्या, ती डावखुरी आहे, हे कळल्यावर तर मला कोण आनंद झाला, का-कुणास ठाउक पण मला डावखुरी लोक फार आवडायची. ती दर गुरुवारी दत्ताच्या देवळात जाते, ३ वर्षापासुन जपानी भाषा शिकतेय, काळा रंग आवडत नाही [..पण मला फार आवडतो], भुताची फार भिती वाटते, चायनीज आवडते, पावसात भिजायला खुप आवडते [..मला आजिबात आवडत नाही] आणी बरेच काही. कधी सरळ सरळ तर कधी शब्दाच्या आडुन मी तिला मागणी घालुन पाहीले पण दर वेळी मला नकारच मिळाला. एक गोष्ट मात्र होती, ती मला खुप "मिस.." करायची, एक दिवस मी तिला फोन नाही केला तर तिने लगेच केलाच समजा, एक दिवस कॉलेज मधे नाही गेलो, तर दुपारी ती घरी येयची मला भेटायला. कॉलेज मधे आम्ही तासं-तास गप्पा मारत बसायचो. बऱ्याच वेळेला, एखाद्या क्षुल्लक गोष्टीवरुन लहानमुलासारखी मारामारी पण करायचो. एकदा असेच मारामारी करताना, तिच्या गाडीच्या कि-चेन ला लावलेले घुंगरू माझ्या हाताला लागले आणी थाडे रक्त आले, तिने लगेच मेडिकल दुकानातुन बॅड-एड आणले.


तिच्या वागण्यातला बदल मला जाणवु लागला होता. मी खुपच वैतागलो होतो. काय चालु आहे काही कळतच नव्हते. हा अक्षरशः माझा मानसिक छळ चालु होता. मी तिला सारखे म्हणायचो "हो म्हण, हो म्हण, विचार कर".. पण ती नाहीच म्हणायची.


आणी तो दिवस उजाडला. सकाळी कॅन्टीन मधे तिच्या वर्गातल्या ग्रुप बरोबर गप्पा मारत बसलो होतो. तिचा एक वर्ग मित्र होता- अभिजीत, त्याला माझ्या वर्गातली एक मुलगी आवडायची-मानसी.. तो मला विचारत होता, काय करु, काय बोलु, तु मदत करशील का?? पल्लवी पण तिथेच होती. मी आधीच वैतागलेला होतो.. विचार करुन डोके बधीर झाले होते त्यात तो असले प्रश्न विचारत होता ज्याची उत्तरे मीच शोधत होतो. मी त्याला म्हणले, "अरे नको मुलींच्या नादी लागुस, वैतागशील. एकटा आहेस तेच बरे आहे रे बाबा. बर तु तिला विचारलेस आणी ति हो म्हणली तरी चांगले, नाही म्हणली तरी चांगले, पण नाही म्हणायचे, आणी 'तुझ्याशिवाय जगणे अशक्य' असे वागायचे हे फार वाईट. डोक्याचा नुसता भुगा होतो" आणी मी असे बरेच काही टोमणे मारत होतो. पल्लवी बहुतेक चिडली होती.. गौरी आणि तिचे काही तरी बोलणे झाले गौरी तिला म्हणली.. पल्लु जाउ-देत.. लक्ष नको देउस.. पल्लवी म्हणली.. मला आता अशक्य आहे.. मला राहवत नाहिये.. मग ती मला म्हणाली..  एक-मिनीट तुझी वही दे.. मी दिली.. मग तिने काही तरी त्यात लिहीले, वही माझ्या बॅगेत कोंबली आणी ती आणी गौरी तेथुन पळुन गेल्या. मी घाई-घाईने वही उघडली.. तर त्यात जपानी भाषेत काही तरी लिहीले होते.. ते काय होते ते मला कळले नाही, पण तिचा चेहरा मला खुप काही सांगुन गेला. मी पण लगेच त्यांच्या मागे पळालो. कॅन्टिन मधले सगळे बघत होते, कुणालाच काही कळत नव्हते काय पळापळी झाली ते.. मी तिला पार्कींग मधे पकडले. तिला विचारले, हे काय लिहिले आहेस..
तिने वाचुन दाखवले "एई अनाता.." असले अगम्य भाषा.. मला एकदम तो झपाटलेला सिनेमा आठवला.. तात्या विंचुः "ओम भग भुगे..भग्नी भागोदरी..ओम फट स्वाः"
मी म्हणलो.. "म्हणजे काय?"
तीः "एवढा काही तु बुद्दु नाहीयेस न कळायला.. आणी पळुन गेली."
आता काय करावे.. मला कळत होते काय असेल.. पण विश्वास बसत नव्हता.. कसे शक्य आहे.. मी सरळ लॅब मधे गेलो आणी गुगल.कॉम चा आधार घेउन त्या शब्दांचा अर्थ शोधला आणी जे मी ऐकायला तरसलो होतो तेच समोर दिसले "माझे तुझ्यावर प्रेम आहे" मी पुर्ण गार पडलो होतो.. पुर्ण बधिर. काही म्हणजे, काही कळत नव्हते. खुप जोर जोरात ओरडावे, किंचाळावे असे वाटत होते. तेवढ्यात तिचा मोबाइल वर फोन आला, मला म्हणली "कळले का काय ते? "नंतर मला सिनेमाला बोलावत होती, पण मी कसल्याच मनस्थीतीत नव्हतो, मला फक्त घरी जाउन एक शांत झोप हवी होती.


यथावकाश मला तिच्याकडुन कळले की तिलाच समझले नाही ती कधी माझ्यावर प्रेम करायला लागली, पण तिने मला सांगीतले नाही कारण ती माझ्या जन्मदिनी म्हणजे २,ऑगस्ट ला सांगणार होती, पण त्यादिवशी तिला राहवले नाही आणी ति सांगुन बसली.. तो दिवस होता ११, जुलै, २००२. मी म्हणले, कसला वाढदिवस आणी कसले काय, तु अमावस्येला सांगीतले असतेस तरी चालले असते, मी किती तडफलोय ते मलाच माहीत.


मी जेंव्हा मित्रांना हे सांगीतले तेंव्हा कोणाचा विश्वासच बसला नाही..
पुढे १० महिन्यांनी आमचा साखरपुडा झाला, आणी नंतर ७ महिन्यांनी  म्हणजे २६ डिसेंबर २००३ विवाह. 


हे सगळे लिहीताना एक गोष्ट आठवतेय, लगान सिनेमातल्या "ओ मितवा" गाण्याची सुरुवात..


"हर संत कहे, साधु कहे.. सच और साहस है जिसके मन मै, अंत मै जित उसीकी है.."


धन्यवाद,
अनिकेत


                                            [ समाप्त ]