साल्सा (सालसा : टोमॅटोची मेक्सिकन कोशिंबीर)

  • अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा आणि १-२ कोवळी कांद्याची पात बारीक चिरलेली
  • २-३ तिखट हिरव्या मिरच्या चवीप्रमाणे प्रमाण वाढविण्यास हरकत नाही.
  • अर्धी वाटी कोथिंबीर
  • २-३ लसूण पाकळ्या चिरलेल्या, मीठ चवीप्रमाणे आणि मिरपूड अर्धा चमचा-(शक्यतो ताजी वाटलेली)
  • पातळ सालीच्या मध्यम आकाराच्या १ लिंबाचा रस (लाईम ज्यूस, लेमन नव्हे)
  • ३ मोठे टोमॅटो, साल काढून आणि बिया काढून चिरलेले
३० मिनिटे
३-४ जणांना

एका चाळणीत किंवा रोवळीमध्ये कापलेला कांदा आणि लसूण घालून त्यावर ३-४ वाट्या उकळते पाणी घाला.  सर्व पाणी पूर्णपणे निथळू द्या.  तसेच कांदा-लसूण पूर्ण थंड होऊ द्या.

सर्व जिन्नस काचेच्या किंवा गंजरहित पोलादाच्या (स्टेनलेस स्टील) भांड्यामध्ये एकत्र करून शीतकपाटात २-३ तास ठेवल्याने सर्व चवी एकत्र नीट मिळून येतील.

अशी ही कोशिंबीर तळलेले मेक्सिकन पापड (टोर्टिया चिप्स) बरोबर खायला चविष्ट लागते.  त्रिकोणी आकाराच्या या ढलप्या (चिप्स) मेक्सिकन उपहारगृहात गेले की आपल्यापुढे पहिल्यांदा आणून ठेवतात.  पुढचे पदार्थ येईपर्यंत या अरबट चरबट खाण्यानेच आपले पोट भरून जाते. 

हाच साल्सा मेक्सिकन जेवणात लज्जत येण्यासाठी बरीटो, टाको, एन्शिलाडा, तमाली, फहिटा, फ्लाऊटा, अशा सर्व मेक्सिकन खाण्याच्या पदार्थांबरोबर खाता येतो. तसेच यामध्ये वेगवेगळे पदार्थ घालून साल्सा करतात.  मँगो साल्सा हा खूप प्रसिद्ध आहे.

असे साल्से इकडच्या खाद्यबाजारात (सुपरमार्केट) सहज मिळतात त्यामुळे घरी करण्याच्या भानगडीमध्ये आपले लोक पडत नाहीत.  पण घरी केलेल्या ताज्या साल्साची चव आगळीच असते.  बाजारात मिळणारे साल्से त्यातल्या तिखटपणाप्रमाणे सौम्य, मध्यम आणि जहाल असे मिळतात.  मला स्वतःला "जहाल" आवडतो.

साल्सा या स्पॅनीश शब्दाचा अर्थ सॉस म्हणजे चटणी असा आहे.  त्याच्या खमंगपणाने साल्सा संगीत, आणि साल्सा नृत्य असे अस्तित्वात आले आहेत.  त्या संगीत आणि नृत्याची उत्तेजक चाल आणि हालचाल जरूर अनुभवावी.

मनोगतींनो आपले मत कळवा.

सुभाष

नाहीत.

खाण्याचा आणि बनविण्याचा बराच स्वानुभव