ह्यासोबत
हेन्ऱी कॅमेरॉनच्या निवृत्तीची बातमी "आर्किटेक्ट्स गिल्ड ऑफ अमेरिका" च्या एका पत्रकात छापून आली.. त्याच्या कारकिर्दीचा सारांश पाच सहा ओळींत गुंडाळला होता, आणि त्याच्या इमारतींची नावं पण चुकीची छापली गेली होती...
ते पत्रक घेऊन पीटर गाय फ्रँकनच्या कचेरीत शिरला. गाय त्यावेळेस अत्यंत महत्त्वाच्या, एका तपकिरीच्या खरेदीच्या घासाघिशीत गर्क होता. पीटर असा अचानक आलेला पाहून कपाळावर आठ्या आणून त्याने कारण विचारलं. पत्रक गायच्या मेजावर टाकून पीटर म्हणाला, "मला हा माणूस हवाच आहे"... गायला काही कळेच ना. तो म्हणाला कोण? पीटरचं उत्तर "हॉवर्ड रोर्क"!
गाय अजूनच बुचकळ्यात पडला. हा कोण बुवा? पीटरने त्याला रोर्कची पुन्हा आठवण करून दिली, हेन्ऱीचा डिझायनर म्हणून.
ओहो... मग जा, बोलाव त्याला, गायचं उत्तर. "तू मला त्याला कामावर घेण्यासाठी पूर्ण अधिकार दे" अशी पीटरची विनंती. "एका साध्या ड्राफ्टसमनला कामावर घेण्यासाठी अधिकार कसले हवेत??" गायचा अजूनच चक्रावून प्रश्न.
"रोर्कला मनवणं सोपं नाही" पीटरचं उत्तर, "आणि इतर कोणाकडे तो जाण्याआधी तो मला हवा आहे"!
"खरंच की काय? एक साधा ड्राफ्ट्समन, आणि अवघड? आणि तो ही हेन्रीकडचा? तिथून त्याला इथे आणण्यासाठी त्याची मनधरणी करावी लागेल असं म्हणतोस? वा! हेन्र्ऱी कडून येणारा माणूस ह्या लायकीचा कधीपासून झाला??"
"हे काय गाय? खरं सांग!..."
"अम्म्म.. खरं तर मी पण एकेकाळी हेन्ऱीचा सर्वोत्त्म डिझायनर होतो म्हणा.. आणि कॅमेरॉन त्याच्या माणसांना चांगलं तयार करतो, अर्थात केवळ रुक्ष तांत्रिक बाबतीत, सौंदर्यदृष्टीने बोंबच आहे म्हणा. ह्म्म्म... जा, घेऊन ये त्या तुझ्या रोर्कला.. "
"मला त्याची आवश्यकता आहे असं काही नाही, पण तो माझा जुना मित्र आहे, आणि सध्या नोकरी नसल्याने त्याला जरा मदत करावी एवढाच उद्देश आहे माझा"...
"तुला हवं ते कर, पण माझं ह्या क्षुल्लक गोष्टींवरून डोकं खाऊ नकोस. काय वाटतं तुला - ही तपकिरीची डबी कशी आहे?"
....
त्या संध्याकाळी पीटर रोर्कच्या घरी होता. "सहजच इथून जात होतो, म्हटलं भेटून जावं"... अवघडून म्हणाला.
"हंम्म्म.. तुला काय हवं आहे, मला माहित आहे... ठीक आहे, किती?"
"म्हणजे?"
"तुला माहीत आहे पीटर!"
"अंम्म्म.. पासष्ट डॉलर्स, आठवड्याला." खरं तर पीटर जे ठरवून आला होता, तसं काहीच होत नव्हतं. काहीच न करता रोर्क तयार होईल असं त्याला वाटलंच नव्हतं. "सुरूवातीला पासष्ट; जर तुला योग्य वाटत नसतील तर... "
"पासष्ट".
'तू... तू आमच्याबरोबर करशील काम???"
"कधी करायची सुरूवात?"
"अरे! ह्या सोमवारपासून!"
"ठीक आहे, धन्यवाद हॉवर्ड!"
"ह्म्म्म.. पण एकाच अटीवर. मी रेखाटनांचं काम करणार नाही.. अजिबात नाही, सजावट नाही. पंधराव्या शतकातल्या स्कायस्क्रेपर्स नाहीत. मला ह्या सगळ्यापासून दूरच ठेव, मला हवं तर अभियांत्रिकीत घाल. मला साईटवर पाठव. अजूनही मी यायला हवं आहे?"
"नक्कीच! तुला आमच्याकडे यायला नक्कीच आवडेल, गाय फ्रँकन एकदम राजा माणूस आहे, अरे तोही हेन्ऱीचाच चेला आहे!"
"हम्म्म.. हे चारचौघांत सांगू नये त्याने!!! काळजी करू नकोस, मी त्याला काही म्हणणार नाही, कोणालाच काही सांगणार नाही. तुला एवढंच हवं आहे ना?"
"अरे! मला काही भीती नाही त्याची... मी तसा विचारही करत नव्हतो!"
"ठीक आहे मग. चला... सोमवारी भेटूया."
"हो.. तशी मला काही घाई नाहीये, मी तर तुला असाच भेटायला आलो होतो...."
"पीटर, काय झालं? तुला काही म्हणायचं आहे का?"
"हो... अम्म्म नाही.."
"मी हे का स्वीकारतो आहे हे तुला जाणून घ्यायचं आहे ना, ऐक तर. ह्या पुढे मी कुठे काम करतो ह्याची मला काहीही किंमत नाहीये. मी काम करेन असा स्थापत्यविशारद नाही आहे आता.. पण काहीतरी काम करायलाच हवं मला.. मग तो तुझा फ्रँकन असला म्हणून काय बिघडलं? मला जे हवंय ते मिळाल्याशी कारण, म्हणून मी स्वतःला विकतोय पीटर!"
"रोर्क, असा विचार करू नकोस... अरे तुला खरंच आवडेल आमच्याकडे. खासकरून त्या हेन्ऱीच्या खुराड्यानंतर..."
"बास.... आपण त्याविषयावर बोलणार नाही आहोत पीटर, कळलं?"
"मला काही टीका करायची नव्हती.. जाऊदे. चल ना, आपण हा आजचा दिवस साजरा करूया!!"
"नाही पीटर, माझ्या कामात ह्याचा समावेश होत नाही..."
"कधीतरी साध्या माणसासारखा तू वागशील का हॉवर्ड?"
"काय?"
"माणसासारखा, नैसर्गिक!!!"
"पण मी आहे की साधाच."
"तू माझ्याबरोबर साधं गप्पा मारायला, खायला प्यायला पण येत नाहीस..."
"पण कशाबद्दल?"
"प्रत्येक गोष्टीला कारणमीमांसा हवीच का? काही कारण नसताना, असंच काही करू नये का? तुला सगळंच महत्त्वाचं असतं, सगळंच विशेष काही ना काही करून. तू शांत असलास तरी त्याला कारण असतं! तू कधीच आरामात असू शकत नाहीस का?"
"नाही."
असा त्यांचा संवाद बराच वेळ चालू राहिला... आणि क्षणोक्षणी पीटरला नुकत्याच मिळालेल्या विजयावर विरजण पडल्यासारखं होत राहिलं. रोर्क अत्यंत निर्विकारपणे त्याच्या प्रश्नांना तार्किक उत्तरं देत राहिला आणि पीटरचं रक्त आणखीच खवळत गेलं.
"रोर्क तू का करतोस एवढा माझा दुःस्वास!"
"मी? कशाला करेन?"
"मग निदान तेवढं तरी कर. लोकांचं अस्तित्व नाकारून त्यांचा अपमान करण्याचा क्रूरपणा तरी करू नकोस... का करतोस असं?"
"कारण मी नाहीये कनवाळू वगैरे!"
पीटरला काय बोलावं सुचेना... शेवटी रोर्कच त्याला म्हणाला,
"पीटर, जा घरी आता... तुला हवं ते मिळालंय ना? ठीक मग. सोमवारी भेटू."
क्रमशः....