फाउंटनहेड - कथा ६

टूहीच्या स्थापत्यशास्त्रावरील पुस्तकाने त्या विश्वात एकदम खळबळ माजवली. स्वतःला बुद्धीमान आणि विचारवंत म्हणवणाऱ्या प्रत्येकाने आवर्जून वाचावं असं ह्या पुस्तकाबद्दल म्हटलं जाऊ लागलं. आणि अर्थातच स्वतःला (च) बुद्धीमान आणि विचारवंत म्हणवणारे समाजात पैशाला पायलीभर असतात, त्यांनी ह्या पुस्तकाला डोक्यावरच धरलं! काहीही कष्ट न करता, कोणत्याही ज्ञानाशिवाय केवळ पुस्तक वाचूनच अधिकारवाणीने बोलायची सोय अशा महाभागांची ह्या पुस्तकामुळे झाली. त्या पुस्तकाचा नुसता उल्लेख करून आपली महती वाढवणाऱ्यांत चढाओढच लागली. ख्यातनाम घरांच्या दिवाणखान्यांतून टूहीचं आणि स्थापत्यशास्त्राचं नाव जोडीनं घेतलं जाऊ लागलं.


त्याच्या "तत्त्वां"नुसार टूहीने कोणाही स्थापत्यविशारदाचा उल्लेख पुस्तकाच्या मसूद्यात केला नाही. पण विपुल अशा तळटीपांमध्ये मात्र काहींचा उल्लेख होता. उदाहरणार्थ गाय फ्रँकन, ज्याच्या परंपरेला जरा जास्तच कवटाळण्याबरोबरच त्याच्या परंपरेशी असणाऱ्या ईमानाचं कौतुक झालं होतं. शिवाय एक टीप हेन्ऱी बद्दलही होती... "एकेकाळच्या आधुनिकतेच्या पुरस्कर्त्या हेन्ऱीची अधोगती ही सर्वसामान्यांनी दिलेला दैवी कौलच आहे" अशी..


फेब्रुवारी १९२५ मध्ये हेन्ऱी निवृत्त झाला.


कधी ना कधी हा दिवस उगवणारच हे त्याला माहित होतंच. कामाचा ओघ तर कित्येक वर्षांपासून आटला होता. रोर्क सोडून इतर कर्मचारी केव्हाच निघून गेले होते. विषण्ण अशा मनस्थितीत असणाऱ्या हेन्ऱीला एके दिवशी अचानक झटका आला आणि जागच्या जागी तो रोर्कसमोर कोसळला. रोर्कने त्याला तातडीने डॉक्टरांकडे नेलं आणि त्यांनी जीव प्यारा असेल तर पूर्ण विश्रांती घ्यायला हवी असा सज्जड सल्ला दिला.


हेन्ऱीने रोर्कला कार्यालय बंद करायची विनंती केली. रोर्क रात्रभर त्याच्या उशाशी बसून होता... पुढे हेन्ऱीची एक बहीण न्यूजर्सी मधून आली त्याला घ्यायला. ती स्वतःही अगदीच खचलेली, कशाचीच आशा नसलेली, आला दिवस काढणारी अशी होती.. तिला हेन्ऱीचं ना दुःख होतं ना त्याचा दुःस्वास. कोणत्याही प्रकारच्या भावना व्यक्त करण्याच्या पलिकडे गेलेल्या अशा त्याच्या बहिणीकडे हेन्ऱी जाऊन राहिला. जाता जाता हेन्ऱीने रोर्कच्या हातात एक पत्र दिलं, ते काय आहे हे समजून, न वाचतात रोर्कने फाडून टाकलं आणि हेन्ऱीला तो म्हणाला "माझ्यासाठी तू कोणाकडेही तोंड वेंगाडायची गरज नाही. माझी काळजी करू नकोस."


हेन्ऱीने रोर्कला कार्यालयाला ताळं ठोकायला सांगितलं, तिथलं प्रत्येक रेखाटन, आराखडा जाळून टाकायला सांगितला, जणू हेन्ऱी आपलं आयुष्य पुसून टाकायचा प्रयत्न करत होता... आणि मला भेटायला येत जा, फार वेळा नाही जमलं तरी येत जा असं त्याने रोर्कला सांगितलं.


हेन्ऱीला सोडून परतताना रोर्क रिकाम्या रस्त्यांवर एकटाच चालत होता... त्याचा पुढचा प्रवास सुरू झाला होता आता.


हेन्ऱीच्या कार्यालयात जाऊन निर्विकारपणे रोर्कने हेन्ऱीने सांगितल्याप्रमाणे सगळ्या कागदपत्रांचा होम केला.. जसं काही रोर्क त्याच्या कोण्या पूर्वजाची उत्तरक्रीयाच करत होता. एका वर्तमानपत्रातील मुलाखतीच्या कात्रणात हेन्ऱीचे उद्गार होते "स्थापत्यशास्त्र हा काही धंदा किंवा करिअर नाही आहे. तो एक अखंड चालणारा यज्ञ आहे, जीवनाचा आधार आहे, आणि अवर्णनीय, निखळ आनंद!" रोर्कने ते कात्रण धगधगणाऱ्या आगीत टाकलं आणि इतर कागदपत्रांकडे वळला.


हेन्ऱीच्या पेन्सिली आणि इतर उपकरणंही रोर्कने जाळून टाकली... हे करत असताना मात्र त्याने त्या धगधगत्या आगीकडे नजरही वळवली नाही.. तो त्या विस्तवाच्या आचेजवळ उभा होता; त्याने भिंतीवर लटकवलेल्या एका कधीच न बांधल्या गेलेल्या उत्तुंग इमारतीच्या चित्राकडे पाहिलं आणि क्षणभर त्याची दृष्टी धूसर झाल्यासारखा त्याला भास झाला.


-----


पीटर कीटिंगचं फ्रँकनकडचं तिसरं वर्षं होतं. ताठ मानेने, उत्तमोत्तम कपडे घालून फिरणाऱ्या कीटिंगच्या मनात लोकांच्या आदरयुक्त आणि कौतुकाच्या नजरा पाहून खुशीचे फुगे फुटत होते. पार्क ऍव्हेन्यूवर लहानसंच पण छानसं घर होतं त्याचं आता. अधून मधून आपल्या ग्राहकांना घेऊन वेगवेगळ्या ऑपेरांना किंवा महागड्या रेस्तराँमध्ये त्याचं येणं जाणं चालू झालं होतं. प्रतिष्टित समजल्या जाणाऱ्या वर्तमानपत्रांतून "सोसायटी" पानांवर त्याच्या नावाचे उल्लेख होऊ लागले होते. ही कात्रणं त्याने अगदी आवर्जून जपून ठेवली होती.


आपल्या पहिल्या इमारतीचं (जी त्याने रोर्ककडून बनवून घेतली) शल्य तो केव्हाच विसरला होता. हे किती सोपं आहे हे तो आता शिकला होता. सकृत्दर्शनी मोठा देखावा करून त्यात काहीही गुंडाळून द्यायची कला तो शिकला होता. जोवर ग्राहकांना तो देईल ते मान्य होतं तोवर त्याला कसली फिकीर नव्हती, जोवर त्यांचे पाहुणे त्यांच्या घरांवर खूश होते तोवर त्याच्या ग्राहकांना कसलीच चिंता नव्हती, आणि त्यांच्या पाहुण्यांनातर (आपली काहीच गुंतवणूक नसल्याने) कसलीच फिकीर नव्हती.. एकंदरीतच पाठशिवणीच्या खेळात पीटर पारंगत होत होता..


क्रमशः