ह्यासोबत
जिने रोर्कवर पाहताक्षणीच जीव ओवाळून टाकला, त्या डॉमिनिक फ्रँकनचं पात्र फारच अप्रतिमपणे आयन रँडने मांडलं आहे.
रूपगर्विता असण्याशिवाय डॉमिनिक ही अत्यंत कुशाग्र बुद्धीची रसग्राहिकापण आहे. तत्कालीन, किंबहुना एकंदरीतच अशा सुंदर, उच्चभ्रू समाजातल्या स्त्रीयांकडून समाजाच्या ज्या अपेक्षा असतात त्यांच्या बरोबर विरुद्ध असं तिचं वर्तन आहे. डॉमिनिकचा व्यक्तीवादावर, माणसातल्या "जिनियस"वर जबरदस्त विश्वास आहे. आणि बांडगुळांचा मनापासून तिटकारा. परंपरेच्या नावाखाली चालणाऱ्या प्रतिगामी चालीरीती आणि त्यामागे असणाऱ्या समाजघटकांबद्दल तिला अत्यंत घृणा आहे. पण त्याचबरोबर तिच्या दृष्टीने समाजाची रचनाच अशी केली गेली आहे, कि रोर्क सारखा माणूस कितीही बरोबर असला, तरी सामाजिक प्रणाली त्याच्यासारख्यांना अडसर समजून नेस्तनाबूत करेल अशी तिची पक्की धारणा आहे. अशा भ्रष्ट जगाकडून रोर्कची निर्भत्सना होईल, त्याच्यातील जिनियस हरेल ह्या खात्रीने ती ते रोखण्यासाठी फारच वेगळं पाऊल उचलते...
डॉमिनिक स्वतःच रोर्कला कामं मिळू नयेत ह्यासाठी पडद्यामागून सूत्रसंचालन करते. हे पाहून मला तरी निदान जबरदस्त धक्का बसला... पण पुढे जेव्हा ह्यामागची भूमिका ती विशद करते, तेव्हा तिच्या तर्कसंगत विचार - आचारांचं कौतुक वाटतं. भ्रष्ट, नीच समाजाकडून होणारी रोर्कची फरफट पहावणार नाही, ह्यासाठी त्याचं कामच जगाला पहायला मिळू नये असा तिचा प्रयत्न असतो. अर्थात, ह्या प्रयत्नात असतानाही आपण रोर्कच्या नाशाला कारणीभूत होत आहोत ही भावना तिला सतत खातच असते.
पुढे रोर्कच्या प्रभावाने तिच्या त्याच्याविरोधी कारवाया बंद होऊन उलट ती न्यायालयात त्याला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करते. त्यापायी तिला तिची नोकरी गमवावी लागते आणि मानहानी पत्करावी लागते. प्रयत्न करूनही यश न आल्याने निराश होऊन प्रायःश्चित्त म्हणून ती स्वतःलाच शिक्षा करून घेते ती पीटर कीटिंग ह्या तिच्या वडलांच्या भागीदाराबरोबर लग्न करून. पीटर कीटिंगचं पात्र आपण ह्यापुढे पाहूच, पण जाता जाता एवढंच सांगून जातो की डॉमिनिक - पीटर ही जोडी म्हणजे संपूर्ण विरोधाभास आहे.
पुढे पीटरच्या नाकर्तेपणाला (जो तिला माहित असतो आधीपासूनच) वैतागून, त्याहूनही अधिक अधःपतनाच्या शोधात ती गेल वाय्नांड ह्या प्रतिष्ठित वृत्तपत्र सम्राटाशी लग्न करते. त्याच्यात तिला रोर्कच्या काही गुणांचा सतत भास होत रहातो आणि तिची दुविधा अधिकच गहन होत जाते. पुढे रोर्कशी अधिकाधिक संबंध येऊन त्याच्याशिवाय जगणं आपल्याला शक्य नाही हे तिला जाणवतं आणि शेवटी ती रोर्कला त्याच्या एका (समाजाच्या, प्रस्थापित संकल्पनांच्या दृष्टीने) घातपाताच्या कामात मदत करते, भयानक जखमी होते, आणि शेवटी तरीही रोर्कच्या विजयात सहाय्यभूत ठरते.
आज इथेच थांबतो, पुन्हा उद्या इतर पात्रांना भेटूच.
आपला, मंदार...