फाउंटनहेड परिचय - एक

दि फाउंटनहेड


 


आयन रेंड ह्या जगप्रसिद्ध लेखिकेच्या दि फाउंटनहेड ह्या पुस्तकाचा संक्षिप्त अनुवाद करण्याचं धाडस करतो आहे, सांभाळून घ्या!


 


कथानकाला हात घालण्याआधी जरा लेखिकेबद्दल आणि तिने प्रचलित केलेल्या तत्वज्ञानाबद्दल जरा थोडं बोलू. लेखिकेचा जन्म 1905 साली रशियात झाला, एका सुखवस्तू, राजघराण्याशी जवळीक असणार्‍या घराण्यात. तिचं मूळ नाव होतं अलिसा झिनोविएव्ना रोसेनबाऊम. तत्त्कालीन रशियाचा सार्वभौम सम्राट झार निकोलस दुसरा ह्याच्याशी तिच्या कुटुंबाचे फार जवळचे संबंध होते. त्यामुळे बालपण एकदम सुखात गेलं. अभ्यासात तिला विशेष गती होती, आणि अंगभूत हुशारीमुळे ती नवीन गोष्टी भरकन आत्मसात करून पुढच्या आव्हानाच्या शोधात असायची.


 


पुढे रशियन राज्यक्रांतीच्या दरम्यान तिच्या कुटुंबाला हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या. त्यांच्या व्यवसायाचं राष्ट्रीयीकरण केलं गेलं. एकंदरीतच साम्यवाद आणि सामायिकतावादाचे दुष्परिणाम तिला फार जवळून पहावे/ भोगावे लागले. बोल्शेव्हिकांच्या अत्याचारांपासून मुक्‍ती मिळवण्यासाठी तिच्या कुटुंबाने आधी क्रायमिया आणि पुढे व्यक्‍तीस्वातंत्र्याचा, खुल्या बाजारपेठेचा अवलंब करणार्‍या अमेरिकेत आश्रय घेतला.


 


रशियातील अनुभवांमुळे तिच्या मनात सामायिकतावादाविरुद्ध फार खोलवर अढी बसली आणि पुढे ह्यातूनच तिच्या विचारसरणीत साम्यवादविरोधी, व्यक्‍तीवादाचा अंमल आला. साम्यवादाने होणारी माणसाची कुतरओढ आणि त्यातून मनुष्याचे होणारे अध:पतन पाहून प्रत्येक व्यक्‍तीत असणारी क्षमता, बदल घडवून आणायची असामान्य ताकद ह्यावर तिने लक्ष केंद्रित केलं आणि त्यातूनच ज्याला Objectivism म्हणतात अशा विचारधारेचा उगम झाला. ही विचारधारा एकंदरीतच समाजाच्या परंपरागत विचारसरणीला छेद देणारी आहे, आणि त्यामुळे प्रचलित, रूढ सामाजिक घटकांकडून, विशेषत: साम्यवादाच्या, डाव्या विचारसरणीच्या गटांकडून ह्याला प्रचंड विरोध झाला. आजही, अमेरिकेत डाव्या (डेकोक्रटिक) आणि उजव्या (रिपब्लिकन) पक्षांमध्ये ह्या वादाचे पडसाद उमटताना दिसतात. आयन रेंड ही व्यक्‍तीस्वातंत्य्रवादी चळवळीची प्रणेती आणि अध्वर्यू मानली जाते. तिच्या विपुल लेखनापैकी दि फाउंटनहेड हे 1945 साली प्रसिद्ध झालेलं पुस्तक माझं विशेष आवडीचं आहे. त्याबद्दल ह्या लेखमालेत चर्चा करायचा मानस आहे.


 


पहिला भाग इथेच संपवतो, पात्रपरिचयावर सध्या काम करतो आहे, लवकरच पात्रपरिचय घेऊन परत हजर होईन.