नदी सागराला मिळता...

नदी सागराला मिळता
पुन्हा येईना बाहेर
अशी शहाण्यांची म्हण
नाही नदीला माहेर

काय सांगू रे बाप्पांनो
तुम्ही आंधळ्याचे चेले
नदी माहेराला जाते
म्हणूनीच जग चाले

सारे जीवन नदीचे
घेतो पोटात सागर
तरी तिला आठवतो
जन्म दिलेला डोंगर

डोंगराच्या मायेसाठी
रूप वाफेचे घेऊन
नदी तरंगत जाते
पंख वाऱ्याचे लावून

पुन्हा होऊन लेकरू
नदी वाजविते वाळा
पान्हा फुटतो डोंगरा
आणि येतो पावसाळा !

- गदिमा. (पूरिया)