नांव- स्क्वाड्रन लिडर अमर गुप्ते.
अविवाहित : वय २७- उंची ५'११''- वजन ६८ किग्रॅ
डोळ्यांचा रंग तपकिरी- केसांचा रंग काळा
शरीर ऍथलेटिक पीळदार; चष्मा-नाही, व्हिजन-क्लियर.
शिक्षण- एमटेक.-इलेक्ट्रॉनिक्स/टेलिकॉम, (दिल्ली आय.आय.टी.)जॉइन्ड ऑन : ०९/११/२००१: ऍकॅडेमीक ट्रेनिंग रेकॉर्ड- जिआर१.
इंटर कॉलेज बॉक्सिंग चॅंम्पीयन.~ स्क्वॅश प्लेअर्.
स्पेशल कमांडो ट्रेनिंग क्लास टू कम्प्लिटेड
परिवार : आई-वडील-लहान बहीण.
वडील- पोस्ट मास्तर, आई-गृहिणी, बहीण-शिक्षण.
मूळगांव /वास्तव्य - खालापूर (जि.रायगड) - महाराष्ट्र
*********************
एअर व्हाइस मार्शल भोसलेंनी फाइल मधील "कॉन्फिडेंशिअल" चा भाग उघडला -
स्क्वा.लि.अमर गुप्ते ची शाळा सोडल्या पासूनची इत्यंभूत माहिती त्यात स्पष्ट पणे नोंदवलेली होती. आंधळ्याने जरी ती फाइल वाचली असती तरी अमर गुप्ते काय चीज आहे ते तो डोळ्यांपुढे आणू शकला असता इतकी चोख माहिती ऍनेलिसीस विंगने त्यात दिलेली होती. एव्हिएम भोसलेंचे काम होते फक्त आलेल्या फाइल्स मधील तीन जणांना निवडून त्यांच्यावर जबाबदारी व ब्रिफिंग देण्याची.
त्यांनी डोळ्यांवरला चष्मा बाजूला काढून ठेवला. दोन बोटांच्या चिमटीत डोळ्यांच्या कडा नाका जवळ चोळत ते त्यांच्या अवाढव्य खुर्चीत मागे रेलून बसले. जे काम सीक्रेट सर्व्हिसेसचे होते ते त्यांच्या डोंबलावर येऊन पडले होते. एअर रेड कोअर कामाला बैलासारखे जुंपलेले असताना हे थोडे आडवळणाचे काम अंगावर येऊन पडल्याने ते वैतागलेले होते. पण संरक्षण खात्यात तक्रार चालत नाही हे त्यांना पुरेपूर माहीत होते.
त्यांच्या खात्याचे खरे काम फारच थोडक्या मंडळींना ठाऊक होते. खात्याला दिलेल्या इतर कर्मचारी वर्गालापण आपले साहेब लोक नेमके काय काम करतात तेच माहीत नसायचे. त्यांची एक ऍम्बॅसेडर सोडली तर खात्याने वाहने इतर कोणालाच दिलेली नव्हती. अधिकारी वर्गाला सर्व चारचाकी वाहने सक्तीने स्वत:ची घ्यायला लावलेली होती. चालक ठेवायचा नाही अशी सक्त ताकिद होती. प्रत्येक अधिकाऱ्याला आपण काय काम करतो ते नीट ठाऊक असल्याने कधी कुणालाच प्रश्न पडलेलाच नव्हता.
'गगन' नावाचे लाइट कम्बाट एअरकाफ्ट खास हवाईदलासाठी डिआरडीओ ने संशोधीत केले होते त्यांच्या विविध उड्डाण चाचण्यांसाठी १२ वैमानिकांचा ताफा त्यांनी तयार केलेला होता. प्रत्येक अधिकारी तावून सुलाखून वेगवेगळ्या बेस वरून निवडून घेतलेला होता. ज्यांची लग्ने झालेली होती त्यांना दिल्लीला कुटुंबे ठेवण्याची अट घालण्यात आली. अधिकाऱ्यांच्या कुटुंबांनाही ह्या बाबींचा थांगपत्ता लागू देता कामा नये अशी सक्त ताकीद अधिकारी वर्गाला होती व त्याचाच एक भाग म्हणून राजस्थान व पंजाबच्या सीमेवरच्या भटिंड्या जवळच्या बेस वर ह्या चाचण्या घेण्यात येणार होत्या. सर्व उड्डाणे साऊथ वेस्ट ५० डिग्री लोअरकेस वर- खालच्या, म्हणजे गुजरातच्या भागात केली जाणार होती. शत्रूची कुठलीही राडार यंत्रणा ह्या विमानांना आपल्या कक्षेत पकडू शकणार नाही असे आवरण व यंत्रणा ह्या विमानांत बसवण्यात आलेली होती.

सध्याचे राष्ट्रपती व माजी संशोधक अब्दुल कलामांचे हे स्वप्न डिआरडीओने मेहनतीने पूर्ण करीत आणले होते. एका अक्षम्य चुकीने त्यावर पाणी फिरायला नको व शत्रू किंवा बलाढ्य मित्रपक्षालाही त्याचा अजिबात सुगावा लागायला नको म्हणून ही काळजी घेतली जात होती. एका रात्रीत संशोधनावर 'पेटंट पेंडींग'चा शिक्का मारून, भारताला विमाने आपल्याकडूनच खरेदी करायला भाग पाडण्या इतकी ताकद काही देशांकडे होती. ह्या पार्श्वभूमीवरील 'गगन' ला तळहातावरच्या फोडाप्रमाणे जपणारे हे अधिकारी एका विशिष्ट देशप्रेम भावनेने भारावलेले असल्याने धोका झाला नसता परंतू त्या भरवशावर बेसावध राहणे एअर रेड खात्याला भारी पडले असते.
फक्त एक दिवसांत भोसलेंना निर्णय घ्यायचा होता. ३ आधिकाऱ्यांना द्यायची त्यांची अजिबात तयारी नव्हती. त्यांना शक्य झाले असते तर 'माझे अधिकारी खूप व्यस्त आहेत' अशी पांच शब्दांची एक ओळ पाठवून आलेल्या संदेशाची त्यांनी पार बोळवण करून टाकली असती. पण संदेशाच्या खालच्या परिच्छेदाने त्यांचे कुतूहल जागे झाले. आपला एकतरी अधिकारी ह्या मोहिमेवर जायला हवा ह्याची त्यांना मनोमन खात्री झाली होती. जामनगरच्या उत्तरेला व कच्छचे आखात संपते त्यापूर्वी सीमा सुरक्षा दलाच्या गस्ती पथकाला एक वॉकी टॉकी पद्धतीची यंत्रणा कच्छच्या रणांत सापडली होती. जेमतेम अर्धा किग्रॅ वजनाची ही डब्बी करड्या रंगाची असून वर दोन लाल दिवे सतत उघडझाप करीत आहेत असा छोटा पण परिणामकारक संदेश होता. तो वाचून भोसले सतर्क झाले होते. 'गगन'च्या राडार ब्लॉकींग यंत्रणेचे हृदय समजले जाणाऱ्या राडार जॅमरचे वर्णन ह्या डब्बीशी मिळते जुळते आहे हे जर कोणाला समजले असते तर बंगळूर पासून तपास पथके वास घेत फिरली असती. तपास पथकांच्या हातात हे काम गेले की, त्यांचे अधिकारी त्यांच्या पद्धतीने ते हाताळतील व चुकूनही 'गगन' बद्दल माहिती सीक्रेट सर्व्हिसेसना मिळाली असती तर काम कठीण झाले असते.
भोसलेंनी पुढ्यातल्या संगणकावर संदेश तयार करून पाठवला. सध्या एका अधिकाऱ्याला तयार करतो व तो तेथे पोहचल्यावर त्याच्या अहवालानुसार दुसरे अधिकारी जातील असे कळवले होते. त्याच संदेशात जर ती डब्बी येथे पाठवता आल्यास सर्वांनाच त्याबद्दल माहिती मिळू शकेल अशी पुस्तीही जोडली.
संदेश गेल्याची खात्री झाल्यावर त्यांनी समोरचा पाण्याचा ग्लास उचलून तोंडाला लावणार इतक्यात 'फट्ट' करीत आवाज करून ग्लास वर काहीतरी आदळले. एका सेकंदात त्यांनी खुर्चीवरून जमीनीवर लोळणं घेतली. गोळ्या झाडण्याची सवय गेली असली तरी भोसले गोळ्यांचा परिणाम विसरलेले नव्हते. ह्या वयांतही त्यांची चपळाई वाखाणण्याजोगी होती. हात लांब करून त्यांनी सर्वप्रथम डेस्कच्या खालचे घंटीचे बटण जोरात दाबले.... व दाबूनच ठेवले. कमीत कमी गोळी झाडणाऱ्याचा गोंधळ उडावा व तो काहीतरी चूक करून सुरक्षा रक्षकांच्या हाती सापडावा अशीच ते मनोमन प्रार्थना करीत होते. स्वत:च्या जीवापेक्षा मारेकरी त्यांना हवा होता.
बाहेर काही गोंधळ उडतोय का ह्याचा कानोसा घेत ते जागेवरच पडून होते. पण बाहेरच्या शांततेत घंटीचा कर्कश आवाज घुमत असूनही काहीच हालचाल ऐकू येत नव्हती. इतक्यात कोणीतरी कॅबीनकडे धावत येण्याचा आवाज त्यांनी ऐकला. "क्या हुआ साहब?" एअरमन मिश्रा आश्चर्याने भरलेल्या नजरेने खाली पडलेल्या साहेबांकडे पाहतं होता.
"जल्दीसे अलर्ट आलार्म ऑन करो" एवढे ऐकून त्याने मागच्या मागे धूम ठोकली. धोक्याच्या घंटीचा खणखणाट रात्रीच्या शांततेत घुमत असतानाच चारी बाजूंनी सेंट्री धावत येताना पाहून भोसले जागेवरचे उठले. सर्वदूर पटापट सर्च लाइट लावले गेले... ग्रुप कॅप्टन पुरी तेथे पोहचेपर्यंत भोसले बरेच स्थिर स्थावर झालेले होते.
*****************
फार थोडक्या आधिकाऱ्यांना तातडीने पाचारण करण्यात आले. पुरी व स्वत भोसले वगळता अजून तिघे अधिकारी भोसलेंच्या कॅबिनमध्ये आले. भोसलेंनी सर्वांना ब्रीफ करून झाल्यावर, तासाभरापूर्वी आलेला संदेशाची प्रत फिरवली गेली. एकमताने दुसऱ्याच दिवशी सर्व अधिकारी वर्गाला ह्या बाबत कल्पना देण्याचे ठरले. संदेशात उल्लेख केलेली डब्बी 'राडार जॅमर' आहे ह्या बद्दल कोणाच्याही मनात शंका राहिलेली नव्हती.
भोसले साहेबांवर हल्ला व तोही कोअरच्या बेस वर झालेला पाहून सर्व अधिकारी वर्ग नुसता हादरलाच नव्हता; तर चवताळून उठला होता. काहीही झाले तरी ह्या हल्ल्यामागचे हात तोडल्याखेरीज त्यांना समाधान मिळाले नसते. भोसले साहेबांच्या ब्रिफिंगसाठी प्रेसेंटेशन हॉल मध्ये जमा झालेल्या प्रत्येक आधिकाऱ्याच्या चर्येवर संतापाची छटा स्पष्टपणे जाणवत होती. सर्वांत महत्त्वाची काळजी होती ती 'राडार जॅमर' ची. कोणाच्याच मनात संदेह राहिलेला नव्हता की, राडार जॅमर चे बिंग फुटलेले होते..... ते कुठल्या पायरीवर होते व शत्रुपक्ष कुठल्या पायरीवर तोच अंदाज घेण्यासाठी सर्वांना एकत्र बोलावण्यात आलेले होते.
सर्व आधिकाऱ्यांची नांवे नोंदवली गेली...... फक्त स्क्वाड्रन लिडर अमर गुप्ते गैरहजर होता !
एव्हिएम् भोसले साहेबांवर गोळ्या झाडणाऱ्याचा तपास कसा करायचा ह्याचा विचार करण्यासाठी तसेच कच्छ मध्ये सापडलेली यंत्रणा राडार जॅमर आहे ह्याची खात्री कशी पटवावी ह्याच्या विचारांसाठी बोलावण्यात आलेल्या भल्या सकाळच्या बैठकीत स्क्वा.लि.अमर गुप्ते गैरहजर असल्याचे पाहून बहुतांश आधिकाऱ्यांना नवल वाटले होते.
बैठक सुरू करताच ग्रुप लिडर पुरी साहेबांनी ब्रिफिंगला सुरुवात केली.
"बॉइज्, इट्स सीरियस टू नोट दॅट, वन ऑफ द ऑफिसर इज अब्सेंट फॉर धिस मीटिंग....."
बैठकीत सर्व गोष्टींचा उहापोह झाल्यावर सीक्रेट सर्व्हिसेसला एअर फोर्स एच.क्यू. मार्फत ह्या प्रकाराची कल्पना देण्याचे ठरले. भोसले साहेबांनी स्वतःवर झालेल्या हल्ल्याचे रिपोर्ट्स मुख्यालयाकडे पाठवल्यानंतर बैठकीचा समारोप झाला.
अमर का आला नाही ह्याचे भोसलेंनाही नवल वाटलेले होतेच. प्रत्येक आधिकाऱ्याला स्वतंत्र क्वार्टर दिली असूनही बरेच अधिकारी वेळ घालवण्यासाठी एकमेकांच्या घरी जातात हे माहीत असल्याने त्यांनी गुप्तेच्या जवळच्या मित्रांकडे चौकशी केली. त्यांच्यातला स्क्वा.लि.कुमार हा गुप्तेला जास्त जवळचा होता.
"गुप्ते रात्री आठ वाजेच्या आसपास माझ्या कडून गेला सर; माहीत नाही पुढे तो कुठे गेला- हि वॉज सेइंग हि माईट गो टू क्लब फॉर अ गेम ऑफ स्क्वॅश.... बहुदा त्याला मीटिंग बद्दल माहीतच नसेल."
"बट हि मस्ट बी अवेअर दॅट आय वॉज अटॅक्ड - जस्ट चेक व्हेदर ही इज अराउंड " इतके बोलून भोसले साहेब त्यांच्या कामांकडे वळले. रविवार असल्याने फारशी कामे नव्हती परंतू नाश्ता झाल्यावर तिघा आधिकाऱ्यांची काल अर्धवट राहिलेली फाइल त्यांना तपासायची होती.
स्क्वा.लि.कुमाराने अमरच्या मोबाईलवर फोन लावण्याचा प्रयत्न केला पण तो फक्त वाजतंच होता.शेवटी स्वतःच्या ऑर्डर्लीला अमरच्या क्वार्टरवर पाठवले व तो अमरच्या मोबाईलवर फोन करींत राहिला. फोन फक्त वाजतंच होता..... कुमाराने अजून एक दोघांना प्रयत्न करायला सांगितले - त्यांनाही उत्तर मिळत नव्हते. इतक्यात कुमाराचा ऑर्डर्ली सायकलवर परत येताना दिसला. "साहब, गुप्ते साब तो घरपर नही है। उनके भैय्याने मुझे बताया की वो रातभर घरपर ही नही आये और कुछ बताकर भी नही गये है ।" कुमाराने इतके ऐकले व तो जवळ जवळ धावतंच पुरी साहेबांच्या घरी जाण्यास निघाला.
"त्याचा मोबाईल कुठे आहे ते जरा ऑपरेटिंग सिग्नल्स वाल्यांना ट्रेस करायला सांग मी ऑफिसला पोहचतो."
ऑपरेटिंग सिग्नल्स वाल्यांनी सिव्हिल सर्व्हिसेसच्या त्या भ्रमणध्वनी कंपनीत फोन करून गुप्तेचा फोन ट्रेस करायला सुरुवात केली. फोन चालू होता म्हणजे तो बेसस्टेशनला स्वत:चे ठिकाण कळवत राहणारच हा पुरी साहेबांचा होरा बरोबर ठरला. एका फोन ऑपरेटरला फोन सतत वाजत राहिला पाहिजे अशा सूचना देऊन पुरी साहेब कॅबीन कडे वळले. जे घडतंय त्याची काळजी स्पष्ट त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती. सापडलेले राडार जॅमर, एअर मार्शल भोसलेंवरचा हल्ला व त्यापाठोपाठ गायब झालेला गुप्ते एकाच साखळीच्या कड्या असल्याचा तीळमात्र संशय त्यांच्या मनांत नव्हता.
कुमार हा गुप्तेचा फ्लाइंग मेट होता. गुप्ते थोडा अवखळ आहे पण बेजबाबदार नाही हे त्याला माहीत होते. त्यामुळे त्याचा गोंधळ उडाला होता. समवयीन व त्यातही एकाच बॅचचे असल्याने दोघांचे संबंध घनिष्ठ होते. गुप्ते न सांगता फार फार तर पिक्चर टाकायला जाईल पण रात्री घरी परतणारंच ! कुमारच्या घरी पार्टीला कितीही रात्र झाली तरी तो थांबत नसे - सकाळ स्वतःच्याच बिछान्यात व्हावी ह्याबद्दल तो नेहमीच आग्रही होता म्हणून कुमारची काळजी वाढतंच होती. इतक्यात सिग्नल्स वाल्यांनी गुप्तेचा फोन कॅम्पस मध्ये असल्याचे कळवले. नक्की जागा कळवण्यास सिव्हिल सर्व्हिसेसने असमर्थता दाखवली होती. स्वत कुमार इतरांबरोबर गुप्तेचा फोन शोधण्यास मदत करू लागला. इतक्यात झटका आल्यागत पुरी साहेब आपल्या खुर्चीतून ताडकन उठले व कुमारला घेऊन तडक भोसले साहेबांच्या कॅबीन बाहेरील हिरवळीवर तपास घेऊ लागले.
शोध सुरू असताना काही क्षणांतच कुठून तरी मोबाईल च्या किणकिणल्याचा स्वर ऐकू आला. ओरडूनच सर्वांना बोलावून घेत कुमाराने नक्की जागेचा तपास केला.... कॅबीनच्या 'त्या' खिडकीपासून थोड्याच अंतरावर झाडीत गुप्तेचा फोन वाजत होता.
"कोई उसे हाथ नही लगायेगा !" कुमाराने सोडलेले फर्मान ऐकून पुरी साहेबांनी मान डोलवली.
सीक्रेट सर्व्हिसेस साठी हा मुद्दा महत्त्वाचा ठरला असता ह्याची जाणीव कुमारला होती. एका काडीला फ्लॅग बांधून ती मोबाईलच्या जागेवर खोचण्यात आली व हस्तसंचाच्या परीक्षणासाठी तो सिग्नल्सच्या ताब्यात देण्यात आला. मेस मध्ये दुपारच्या जेवणात सर्वांच्या तोंडी अमर गुप्ते च्या गायब होण्याचा विषय होता.
क्रमशः
ह्या कथेत वातावरण निर्मीतीसाठी अपरिहार्याने इंग्रजीचा वापर मुक्त हस्ताने करावा लागला आहे- वाचकांची त्याबद्दल माफी मागतो !