गगन भरारी - (५-शेवट!)

मेजरला रडार जॅमरचा क्रमांक बंगळूरहून आलेल्या यादीतून शोधून काढायला फारसे श्रम पडलेच नाहीत. गगनचे निकामी झालेले पार्ट्स योग्य ती कागदपत्रे तयार करून झाल्यावर सुरक्षितपणे बंगळूरला पाठवली जात. हा जॅमर निकामी झालेला होता, परंतू बंगळूरला पाठवण्याच्या आतच त्याला पंख फुटले होते......  मेजरने सर्वच अधिकाऱ्यांचे फ्लाइंग रेकॉर्ड्स मागवून घेतले होते. तेच तो वाचत होता.


बॅलेस्टिक रिपोर्ट अपेक्षेप्रमाणेच आलेला होता.- एव्हिएम भोसल्यांवर व विजयसिंह वर गोळ्या एकाच पिस्तुलातून झाडलेल्या होत्या. ३ मीमी बोअरचे हे पिस्तूल चिनी बनावटीचे असून भारतात अधिकृतरीत्या फक्त २० जणांकडे असल्याचे त्या खात्याने कळवले होते. सगळेच मालक पूर्वेकडील होते व संरक्षण खात्याच्या बाहेरचे होते.
गेस्टरूम मध्ये बसून शांतपणे तो सर्व कागदपत्रे विचारपूर्वक तपासत होता.   
पिस्तुलाच्या बनावटी वरून शेजारच्या कुठल्या देशाला भारताच्या डिआरडिओ संशोधनात रस होता हे मेजरच्या लक्षांत आले होते. फोरेन्सिक अहवालाची फारशी आवश्यकता मेजरला आता वाटत नव्हती. ते रक्त अमरच्याच रक्तगटाशी मिळते जुळते असणार हे त्याला पूर्वीच्या अनुभवांवरून ताडता येत होते.


विजयसिंह वर अगदी जवळून गोळी झाडण्यात आली होती. जखमेतल्या कार्बन जमा झालेल्या जागेवरून कळत होते की, ओळखीच्या माणसाबरोबर तो एकांतात गेला असावा. व तेंव्हाच सायलेन्सर लावलेल्या त्याच पिस्तुलातून गोळी झाडलेली असावी. विजयसिंह च्या पत्नीने तो कोणा "साहब" बरोबर कामासाठी जात असल्याचे बोलला होता इतकेच स्थानिक पोलिसांना सांगितले होते. विजयसिंह चा फोटो अमरने ओळखला होता. रेकॉर्डरूम मध्ये बेशुद्धावस्थेत एकदा पाहिल्याचे आठवलेला विजयसिंहच होता. फक्त "साहब" ची ओळख पटायची बाकी होती.


त्याने परत एकदा रडार जॅमरची यादी नीट तपासली. सर्व अधिकाऱ्यांचे गोपनीय अहवाल घेऊन तो वाचत बसला...... खास करून एका अधिकाऱ्याची माहिती त्याने जास्त खोलात जाऊन वाचली. हळूहळू तो एका निष्कर्षावर येत होता. फक्त त्याला कबुली जवाब हवा होता. पुरावे गोळा करण्याचे काम नंतर करता आले असते. गोळा केलेली सर्वच माहिती त्याने एकत्र करायला सुरुवात केली. ध्यानमग्न होत, डोळे मिटून तो स्वतःचे निष्कर्ष पडताळू लागला....बुद्धिबळातल्या उंटासारखी चाल खेळण्यास मेजर तयार झालेला होता !


"सर, आपको भोसले साहब बूला रहे है ।" अचानक तंद्रीतून तो जागा झाला, गेस्ट रूमवरच्या शिपाई तो झोपला होता की काय ह्याचा विचार करीत उभाच होता.
"चलो, मै आ रहां हूं ।" इतके बोलून आजूबाजूला पडलेला पसारा व विखुरलेले कागद त्याने गोळा करायला सुरुवात केली.
दमदार पावले टाकत व आत्मविश्वासाने भरलेला मेजर साहेबांच्या कॅबीन मध्ये पोहचला.
"हे काय मेजर, केस न सोडवताच परत जाणार ?" भोसले साहेबांनी सरळ विचारले !
"कोण म्हणतं सर ? केस तर सॉल्व्ह झालेलीच आहे. फक्त पुरावे हवेत..... ते मी तुम्हाला देणार आहेच थोड्याच वेळात." असे म्हणतं त्याने अमरला मोबाईल वर फोन लावला...... भोसले साहेबांपासून थोडे दूरवर सरकत तो अमरशी तोंडातल्या तोंडात पुटपुटल्यासारखं काही तरी बोलला. 
एव्हिएम भोसले त्याच्या कडे अजूनही गोंधळल्यासारखे बघत होते. इतक्यात पुरी साहेबांनी खोलीत प्रवेश केला. "मेजर, मला बोलावणे धाडले ?"
" हो सर, कल्प्रीट कोण ते कळले आहेच, म्हटलं तुम्हीही येथे असायला हवे !"
"हू इज दॅट, मेजर ?" " दोन मिनिटे धीर धरा सर !"
मेजर शांतपणे भोसले साहेबांच्या समोरील खुर्चीत बसून होता. भोसले अस्वस्थपणे फेऱ्या मारीत होते. ग्रुप लीडर पुरींची मेजरच्या बाजूच्या खुर्चीत चुळबूळ सुरू होती.........


थोड्याच कालावधीत एक एक करीत सगळे स्क्वाड्रन लीडर्स जमा होत गेले.
"बॉइज.....पूर्णं भारताला ज्या गोष्टीचा अभिमान वाटणार आहे त्यात आपण सर्वच सामील आहात परंतू आपल्यातला एक अधिकारी असा आहे ज्याचा आपण सर्वच तिरस्कार करू व तो अधिकारी त्याच लायकीचा आहे" मेजरने धीरगंभीर आवाजात सुरुवात केली."निकामी झालेले रडार जॅमर कोणाच्या फ्लाइंग टाइम मध्ये जामनगर जवळ टाकण्यात आले व कोणी भोसले साहेबांच्या ग्लासवर गोळी झाडली ह्याचा तपास लागलेलाच आहे....."
"बडा साहब नावाने त्याला फार थोडे लोक ओळखतात ! त्याच्या वॉर्डरोबमध्ये मला तेच पिस्तूल सापडले. त्याच्याकडील एका ब्रिफकेस मध्ये अत्यंत शक्तिमान ट्रांन्समीटर व रिसीव्हर सापडला आहे." टाचणी पडली तरी आवाज येईल इतकी शांतता खोलीत पसरली "त्याच कपाटात मला गुन्हेगाराची काही कागदपत्रेही मिळालेली आहेत-" खरा गुन्हेगार कोण ते सापडल्याचे समाधान त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. 


मेजर सर्वांच्या चेहऱ्यावरून नजर फिरवीत बोलला. सगळेच गोंधळात पडलेले होते.
भोसले साहेबांचा चेहरा लाल बूंद झालेला होता.
पुरी हाताच्या मूठा आवळून उभे होते.
कुमार थंडपणे मेजरकडे बघत होता.
अमर दरवाज्याजवळ अटेन्शन पोझ घेऊन उभा होता.


"अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने भारताचे हे महत्त्वपूर्ण संशोधन चिनी गुप्तहेरांच्या हाती जाण्यापासून केवळ सुदैवानेच वाचले. अजून थोड्या अंतरापार रडार जॅमर पाडले असते तर, कराची जवळील कोण्या एजंटने ते उचलून इप्सित स्थळी पोहचवले असते. नशिबाने बीएसएफ वाले वेळेवर पोहचले व त्यांच्या हाती ते जॅमर लागले."
सर्वच एक चीत्ताने मेजर दिपक भोसले काय बोलतो ते ऐकत होते.


"रडार जॅमर बीएसएफ च्या हाती लागलेले पाहून बडा साहब घाबरला, जॅमरच्या सेरीयल नंबरवरून ते कोणाच्या ताब्यातले होते ते कळले असते. जॅमर जर सापडले नसते तर एक जॅमर पाठवताना गहाळ झाले असा प्रचार सर्वदूर झाला असता."
प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उत्सुकता उफाळून येत होती. मेजर खोलीत फेऱ्या मारीत पुढे बोलू लागला....
"एक गुन्हा दडवण्यासाठी त्याने दुसरा गुन्हा केला ! एअर व्हाईस मार्शल भोसल्यांवर प्राणघातक हल्ला ! परंतू तेथेही स्क्वाड्रन लीडर अमर गुप्ते आडवा आल्याने त्याचा गोंधळ उडाला. साथीदाराच्या मदतीने त्याने अमरला बेशुद्ध करवून रेकॉर्ड रूम मध्ये ठेवले. अमरने जर त्याला अंधारात ओळखले असते तर अमर आज येथे जिवंत उभा राहू शकला नसता व जे त्याच्या साथीदाराचे- विजयसिंह चे झाले तेच अमरचे झाले असते."
मेजर अत्यंत नाट्यपूर्ण रितीने ही सगळी कहाणी ऐकवत होता. मध्येच थांबत भोसले साहेबांच्या टेबलवर ठेवलेला पाण्याचा ग्लास उचलून तो पाणी प्यायला.


"भजनसिंहला माहीत नव्हते बडा साहब कोण म्हणून भजनसिंह वाचला. परंतू विजयसिंहला त्याने एकांतात नेऊन त्याच पिस्तुलाने उडवले."......"मित्रांनो, इथपर्यंत सर्व पुरावे व परिस्थिती त्याने व्यवस्थित हाताळली होती. परंतू त्याच्या दुर्दैवाने बीएसएफ कडून आलेली माहिती सीक्रेट सर्व्हिसेसला सर्वप्रथम मिळाली व दिल्लीतच मी गुन्हेगार कोण असावा ह्याचा तपास सुरू केला. प्रत्येक अधिकाऱ्याची फाइल शनिवारी सायंकाळीच मी तपासलेली होती."
मेजर हे सांगत असताना भोसले साहेब अविश्वासाने त्याच्या तोंडाकडेच पाहतं राहिले. पुरींची प्रतिक्रिया गोंधळ उडाल्याची होती. कुमार पूर्वीपेक्षाही थंडगार पडला होता. अमर दरवाजा अडवून उभा राहिला.
"येथे पोहचल्यावर मी सर्वांच्या वाहनांचे नंबर तपासले. कोणत्या वेळी कुठले वाहन बाहेर किंवा आत आलेले आहे त्याची बारकाईने तपासणी केली. सर्व तपास पूर्णं केल्यानंतर मी आपणां सर्वांस खात्रीलायक पणे सांगू शकतो........"


मेजर दिपक भावेने एक मोठा सुस्कारा सोडला, सर्वांच्या चेहऱ्यावरून एक नजर फिरवली......
बुद्धिबळांतला उंट त्याची निर्णायक खेळी खेळायला व "बडा साहब" ला मात द्यायला तयार होत होता.


"...... मित्रांनो "बडा साहब" दुसरे तिसरे कोणी नसून स्वतः भोसले आहेत."
मेजरच्या तोंडून हे वाक्य ऐकताच उभे असलेले एव्हिएम भोसले खुर्चीत कोसळले.आपले डोके दोन्ही हातात गच्च धरून खांदे पाडलेल्या भोसले साहेबांकडून प्रतिकार होणार नसल्याची खात्री मेजरला पटली.
*********************************************************
पुरी साहेबांच्या घरी मेजर दिपक भावे, स्क्वाड्रन लीडर अमर गुप्ते, स्क्वाड्रन लीडर कुमार सुब्रमण्यम व स्वत: पुरी इतकीच मंडळी त्या रात्री जेवणासाठी एकत्र आली होती.
"सर, आपण तर खरोखरच कमाल केलीत !" कुमार मेजरला बोलते करायच्या प्रयत्नांत होता. अमर सोडल्यास तिघेही ड्रिंक्स चे ग्लासेस घेऊन बसले होते.
"मेजर, तुम्हाला काही शंका होती ह्या बाबत आधी ?" पुरींनी मेजरला विचारले.


मेजर बोलायला लागला.......
"सर्वप्रथम गोळी झाडण्याची पोझिशन बघूनच मला कळले की, भोसलेंना मारण्यासाठी ही गोळी झाडलेली नसावी.... कारण ग्लास वर गोळी झाडण्यासाठी ज्या उंचीवरून गोळी झाडावी लागेल त्याच उंचीवरून त्यांच्या डोक्यात गोळी झाडावी लागेल... मग गोळी नेमकी ग्लास वर झाडण्याचे कारण काय असावे...?"
"मग भोसल्यांवर गोळी कोणी झाडली ?" पुरींनी गुगली टाकली.
"ते भोसले साहेबांचे नाट्य होते. टेबलावर ग्लास ठेवून खिडकीतून सायलेन्सर लावलेल्या पिस्तुलाने त्यांनी गोळी झाडली असावी व मागच्या दरवाज्याने रेकॉर्ड रूम मध्ये यायचा प्रयत्न करीत असतानाच अमर तेथे येऊन थडकला असावा." सर्वांच्या चेहऱ्यावर मेजर बद्दल कौतुक स्पष्ट दिसत होते.
"दुसरी शंका आली ती अलार्म वाजण्याची वेळ व अमरची आत येण्याची वेळ ह्यांच्यात बरीच तफावत होती. अमर ९.१० ला आत आलेला होता. अलार्म वाजायला ९.३० ला सुरुवात झाली.अमरने ९.१२ ला गोळी झाडणाऱ्याला पाहिले असावे मग ९.१२ ते ९.३० पर्यंत काय घडत होते ह्या विचारानेच मला भोसल्यांचा संशय जास्त आला !"


"ह्याच मधल्या आठ दहा मिनिटांच्या काळात त्यांनी बेशुद्ध अमरला विजयसिंहच्या मदतीने रेकॉर्ड रूम मध्ये हालवले ! विजयसिंहला हल्ल्यानंतर कोणी पाहू नये म्हणून त्याच्यासाठी रेकॉर्ड रूमचा मागचा दरवाजा आधीच उघडा ठेवलेला होता व म्हणूनच शुद्धीवर येत असताना अमरने विजयसिंहला एकदा बघितले होते"
"मग विजयसिंह कधी बाहेर पडला असावा ?" कुमारने शंका काढली.
"कुमार, जेंव्हा रविवारी सर्व अधिकाऱ्यांची बैठक संपली त्यानंतर भोसल्यांनी त्याला स्वतःच्या ऍम्बेसेडरने बाहेर सोडले असावे कारण त्यांच्या गाडीची तशी नोंद रविवारी दुपारी मी यायच्या आधी केलेली मला आढळली."
मध्ये थोडे थांबत मेजर पुढे बोलू लागला.... "कुमारच्या सांगण्यानुसार व इतर कागदपत्रे तपासल्यावर मला कळून चुकले की, महत्त्वाच्या संदेशांचे डिकोडर्स फक्त दोघांनाच माहीत होऊ शकतात..... तसेच, रेकॉर्ड रूमचा विषय काढताच त्यांनी अमर तेथे जास्त जातो असे सुचवण्याचा केलेला प्रयत्न मला जरा विचित्र वाटलेला होता. विजयसिंहचा खून झाल्याची बातमी त्यांनी मला दिली. ती त्यांना कुठून मिळाली ह्याची माहिती काढण्याचा मी प्रयत्न केला होता. विजयसिंहच्या पत्नीने फोन केला असता तर तो भजनसिंह साठी पुरी साहेबांना केला असता.... स्थानिक पोलिसांनी केला म्हणावा तर त्यांना कुठे माहीत होते की विजय व भजन दोघे भाऊ आहेत व जरी केला असता तर पुरी साहेबांना आधी कळायला हवे होते.... इथेच माझा संशय दाट झाला."


"भजनसिंहच्या माहितीचा तसा फारसा उपयोग झालाच नव्हता.... कारण एकतर त्याला फारसे काही माहीतच नव्हते. त्यात विजयसिंहने त्याला बरेचसे अंधारात ठेवले होते. काय घडणार ह्याच टेन्शन मध्ये तो जास्त होता व सारखा पुरी साहेबांची वाट पाहतं होता.... परंतू मी गोष्ट ऑबसर्व्ह केलेली होती; भोसले साहेबांच्या ऑर्डर्लीने, आम्ही जेवत असताना, एकदा मध्येच त्यांना 'बडे साहब' अशी हाक मारताच मी जरा चपापलो. हे सगळे मुद्दे मी नीट लक्षांत घेऊन त्यांचे फ्लाइंग टाइम चेक केले. विंगमन म्हणून ते कुमार बरोबर गेले होते.... फक्त मला इतकेच नाही कळले की त्यांनी रडार जॅमर खाली कसे टाकले असावे ?"  
"ओह.... त्यात फारसे कठीण काही नाही. गगनमध्ये विंगमन पुढच्या चाकांच्या एक्सॅक्टली मागे असतो व जर थोडा प्रयत्न केला तर वाकून त्याच्या वेस्ट बॉक्स पोकळीत ती डबी सरकवता येईल व हवी त्या ठिकाणी रिलीज करता येईल, मी पण ह्यावर इस्पितळात असताना विचार केला होता." अमर बोलला.......
"म्हणूनच ज्या दिवशी ते विंगमन म्हणून माझ्या सोबत आले तेंव्हा ते आधीच पोझिशन घेऊन बसले होते" कुमारची ट्यूब पेटली. 


"सापडलेले रडार जॅमर येथे आल्यानंतरही त्याच्या परीक्षणाच्या वेळी त्यांनी मला चुकीची माहिती पुरवण्याचा केलेला जाणीवपूर्वक प्रयत्नांमुळे माझी खात्री पटत चालली होती. परंतू सेंट्रल स्टोअर ला न विचारता डिआरडिओ कडे चौकशी करा असे मी व पुरींनी सुचवल्याने त्यांचा नाईलाज झाला असावा." मेजरने थोडा पॉज घेत बोलायला सुरुवात केली, "माझी खात्री पटल्याने मी काल कुमार झोपल्यानंतर भोसल्यांच्या बंगल्यात रात्री प्रवेश केला. त्यांच्या बेडरूममधल्या वॉर्डरोबमधील पिस्तूल बघून माझा संशय खरा असल्याचे मला दिसले...... अजून शोध घेता, पलंगाखाली ठेवलेल्या ब्रिफकेस मध्ये चिनी गुप्तहेरांशी संपर्क करण्यासाठी तयार ठेवलेली यंत्रणा मिळाली......"


"मग सर... आपण त्यांना लगेच अटक का नाही करवली ?"
"मला सर्व काही कळले आहे ते त्यांना माहीत नसल्याने ते पळून जाण्याचा धोका नव्हताच. त्यांचे फ्लाइंग टाइम व त्यांच्या गाडीच्या बाहेर जाण्याच्या व आत येण्याच्या वेळा ह्यांवरून एक नजर फिरवणे आवश्यक होते, अमर. मी एकदम वरच्या हुद्द्यांवरील व्यक्तीला सरळ हात लावू शकत नाही !" 
"त्यांनी फाइलमधील संशोधनाचे कागदपत्रे चीनला पाठवले तर नसतील ?" पुरी साहेबांनी शंका काढली.
"त्यात संशोधन विषयक माहिती काहीच नव्हती सर, फक्त रडार जॅमरच्या परफॉर्मन्स चे अहवाल होते. खरे महत्त्वाचे होते ते रडार जॅमर खुद्द..... पण तेच देशाबाहेर पडू न शकल्याने आज हे संशोधन वाचले !"


मेजर वगळता सर्वांनी एकदमच समाधानाचा एक सुस्कारा सोडला....... 'गगन' ला भरारी घेण्यास आता कोणीच थोपवू शकणार नव्हते !


                                   ~समाप्त~