गगन भरारी- (३)

स्वत:च्या विचारांत असलेल्या मेजरच्या मागून येऊन कोणीतरी त्याच्या खांद्यावर थाप मारली."पुरी साहेबांशी गुफ्तगू झाले का ?"
"ओह, कुमार...काय चाललंय ?" "काही नाही सर, नेहमीचेच रुटीन"
"कुमार त्या दाराच्या चाव्या कोणाकडे असतात ?" "कुठल्या ?" कुमार गोंधळला होता
"रेकॉर्ड रूमच्या ?" मेजरने त्याच्याकडे रोखून बघत विचारले.
"ते दार नेहमीच उघडे असते !" कुमारने पटकन उत्तर दिले. "फनी" मेजर स्वत:शीच बोलला.
"नॉट एक्सॅक्टली.... कारण तेथे काही महत्त्वाचे नाहीच ! "
"तरीही ते बंद राहावे असे नाही वाटत तुला ?"
"नाही कारण पूर्ण कार्यालयाला मध्यवर्ती सुरक्षा दिलेली आहेच, तेंव्हा त्या खोलीला वेगळी सुरक्षा का द्यावी?"
मेजरचे तरीही समाधान झालेले नव्हते परंतू त्याने वरवर तसे दाखवले नाही.
पुढचे दोन अडीच तास सुरक्षा कर्मचाऱ्यांचा जबाब घेण्यात गेला. एव्हिएम साहेबांना भेटावे म्हणून तो त्यांच्या खोलीकडे गेला. परवानगी मागून आत गेल्यावर साहेबांनी त्याला बसायला सांगितले.


"मेजर, फक्त दोन मिनिटे द्या, आय विल फिनीश धिस ऍंड अटेंड यू" "वुइथ प्लेझर सर..." मनोमन मेजरला त्यांच्या औदार्याचे कौतुक वाटले.
"बोला मेजर.... कुठवर झाली प्रगती ?" काम हातावेगळे झाल्यावर त्यांनी पाइप पेटवत विचारले.
"काहीच नाही सर- नो होप्स" मेजर खांदे खाली पाडत बोलला.
"डोन्ट से सो मेजर, माणसाने नेहमी आशावादी असावे- " भोसले साहेब धीर देत बोलले.
"यस्सर, रेकॉर्ड रूम भोवतीच सगळे संशय एकवटलेत- गेल्या दोन तासांत मी प्रत्येक सुरक्षा रक्षकाला त्याबद्दल विचारले पण कोणीच काहीच सांगू शकले नाही."
"यू आर डायलींग अ राँग नंबर माय बॉय.... रेकॉर्ड रूम मध्ये सर्वात जास्त वावर गुप्तेचाच असतो."
"पींगो..... आय मस्ट मीट हिम अगेन; एक अजून महत्त्वाची गोष्ट कळली आहे." मेजर झटक्यात उठला.
"त्याने नर्सकडून येथे फोन करवून तुझ्यासाठी भेटायला बोलावल्याचा निरोप ठेवलाय मेजर" तोवर मेजर दारापर्यंत पोहचला होता.


अमर आतुरतेने मेजर दिपक भावेची वाट पाहत होता. "बोल अमर, काय खास ?"
"सर, निश्चितपणे सांगतो ते कमीत कमी दोघे होते" "कशावरून ?"
"कोणीतरी खिडकीजवळ उभा असल्याचे मला वाटत होते व बाहेरच्या अंधारात मी त्या माणसाचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करीतच होतो इतक्यात माझ्यावर मागून हल्ला झाला"
"खिडकीजवळ नक्की कोणी होते ?" "हो सर, माझी नजर धोका खाणार नाही."
मेजर विचारांत पडला होता.... एक असो की दोघे, त्याने परिस्थितीवर फारसा परिणाम होणार नव्हता. हा अंधारात कोंबडी पकडण्याचा प्रकार होता.
"अमर तू रेकॉर्ड रूम च्या चाव्या कोणाला देतो ?" "ती उघडीच असते.... मी बऱ्याच वेळा तेथे जातो. जुन्या युद्धांचे बॅटल प्लॅन वाचायला मला आवडतात." मेजर काही बोलण्याच्या आतच अमर म्हणाला, "अजून एक सर, त्यांच्यातल्या एकाला मी परत बघितला-"
"कुठे?" मेजरला अचानक आशेचा एक किरण दिसायला लागला.
"रेकॉर्ड रूम मध्येच सर, मी शुद्धीवर यायची ती वेळ असावी... तो अगदी माझ्या चेहऱ्यावर वाकून पाहत होता. पण एक नक्की, त्याला मी ह्या पूर्वी कॅम्पस मध्ये बघितल्याचे आठवत नाही, कदाचित सिव्हिलीयन असावा.".


मेजर विचार करू लागला. कुठल्याच सिव्हिलीयनची बेस कॅम्पच्या मुख्य प्रवेशद्वारावर नोंद झालेली असती तर ते त्याच्या नजरेतून सुटले नसते.
"तुला डिस्चार्ज केंव्हा मिळेल ?"..."तुम्हांस ह्याला नेता येणार नाही इतक्या लवकर !" आंत येणारी एक लेडी डॉक्टर हसत हसत बोलली.
"कायम ठेवणार वाटते तुला येथे !" मेजरने डॉक्टर कडे बघत कोटी केली....
"नाही सर; यू मे टेक हिम एनी मोमेंट, खरं तर तुम्ही येथे आल्याचे पाहून मी डिस्चार्ज कार्ड बनवायला लागले"
"खरंच? ग्रेट ! मी खूपच कंटाळलो होतो पडल्या पडल्या !" अमरने टुणकन उडी मारत म्हटले.


थोड्या सोपस्कारानंतर अमरला घेऊन मेजर निघाला तेंव्हा टळटळीत दुपार झालेली होती. मेन गेटवर जीप बाजूला उभी करून मेजर खाली उतरला तेंव्हा सगळेच रक्षक एकदम अटेन्शन पोझीशन मध्ये उभे राहिले. कॅबीन मध्ये जाऊन मेजरने सरळ एक खुर्ची ओढून त्यावर बसला. हा अधिकारी आपल्या समोर एकदम येऊन बसल्याने प्रमुखाची तारांबळ उडाली. खाडकन सलाम ठोकत तो तसाच उभा राहिला.
"कोई नही, बैठ जाईये." "यस्सर"
"क्या आप मुझे बता सकते है, शनिवार को जिस दिन एव्हिएम साहब पर गोली चली.... कोई बाहरका सिव्हिलीयन अंदर आया था ?"
"जी, नही सर, रुटीन चेक मे मैने और स्पेशल चेकिंग मे आर्मी पुलीस ने भी चेक किया है, सर !" चोपडीची बरीच पाने उलटवत मेजर बसला होता. अमरला कळत नव्हते इतके महत्त्वाचे त्या चोपडीत काय आहे.
"इसमे पुरी साहब के ऑर्डली की एंट्री कहा है ?" मेजरने खोलांत जाऊन चौकशी केली.
बराच वेळ शोधा शोध करून त्याचे नक्की नांव तपासून प्रमुखाने कबूल केले की ती जर नोंद नसेल तर त्याचा अर्थ तो बाहेर गेलाच नसेल.
"येथे नोंद केल्याखेरीज भोसले साहेबांनाही मध्ये किंवा बाहेर जाता येत नाही सर" अमरने त्याला पुष्टी जोडली.


शांतपणे मेजर उठला. जीप पुरी साहेबांच्या बंगल्यावर नेली. ऑर्डर्लीला सरळ ताब्यात घेऊन तो कॅम्प कार्यालयाकडे निघाला. 'पुरी साहेबांना सांगतो' म्हणणाऱ्या भजनसिंग ला त्याने फोन करायची परवानगीही दिली नव्हती. भोसले साहेबांच्या ऑफिस मध्ये प्रवेश करून त्याने फक्त 'ह्याला चौकशीसाठी ताब्यात घेतलाय' इतकेच सांगितले.



ग्रुप लिडर पुरींच्या ऑर्डर्लीला- भजनसिंगला ताब्यात घेऊन कैदी ठेवतात त्या खोलीजवळ मेजर आला. आपापसांतली भांडणे, मारामाऱ्या किंवा कुठे फुटकळ चोऱ्या, कामात आळशीपणा हे प्रकार कॅन्टमध्ये पण व्हायचेच. सरळ पोलिसांच्या ताब्यात देण्याऐवजी अशा डिफेन्स पर्सनल्स ना छोट्या शिक्षेसाठी सरकारने ही व्यवस्था केलेली होती. संरक्षण खात्यातील माणसे बरीच मेहनतीने घडतात. त्यांच्या छोट्या प्रमादापायी त्यांना व पर्यायाने देशाला त्यांचे प्रशिक्षण वाया घालवून चालण्यासारखे नव्हते. परंतू गुन्हेगारीवर वचक बसावा म्हणून ही खास कैद बनवण्यात आलेली होती. मोठे गुन्हे आर्मी पोलीस तर त्याहून मोठे गुन्हे स्थानिक पोलीस हाताळण्याची पद्धत केंद्र सरकारने अमलांत आणलेली होती.
भजनसिंग वर मानसिक दबाव आणण्यासाठी मेजरने त्याला कोठडीत ठेवून व कैद्याची नोंद चोपडीत करून तेथून तो अमरला घेऊन परत बेस ऑफिसला आला. तोपर्यंत मेजरने पुरी साहेबांच्या ऑर्डर्लीला ताब्यात घेतल्याची कुणकुण सर्वदूर झालेली होती.


मेजर वाट पाहत होता ती पुरींनी त्याला बोलावण्याची वा त्याच्याकडे स्वत: येण्याची. मेजरचे अंदाज कधीच चुकत नसत. पुरी स्वत:हून मेजर कडे येऊन पोहचले. मेजर तेंव्हा शांतपणे गेस्टरूम वर काही जुने रेकॉर्ड्स चाळत बसला होता.
"या सर !" अगदी थंडपणे त्याने पुरींचे स्वागत केले. नंतर आपलेच राज्य येथे चालते ह्या आविर्भावात त्याने बाहेरील ऑर्डर्लीला चहा आणण्यास फर्मावले.
"माफ करा; आपल्याच ऑफिसमधला चहा आपणांस ऑफर करीत आहे, कधी दिल्लीत आलात तर माझ्या कॅबीन मध्ये आमच्या पद्धतीचा चहा पाजेन" स्वत:च्या अपमानाचा बदला कसा घ्यायचा ते मेजरला बरोबर माहीत होते.
"हरकत नाही, जमले तर नक्की दिल्लीत भेटेन" "माझा ऑर्डर्ली आपल्या ताब्यात आहे ?"
"हो, आत्ताच त्याला कैदेत सोडून आलो. पण आपणांस कोणी सांगितले ?" पुरींकडे मेजरच्या प्रश्नाचे उत्तर नव्हते.
"त्याचा गुन्हा काय ?" पुरींनी तणतणतच विचारले "तोच तर शोधून काढतोय"
"म्हणजे ?"मेजरला काय म्हणायचे आहे ते त्यांना कळलेच नाही.-
"पुरी साहेब, प्रत्येक खात्याची व त्यातल्या प्रत्येक माणसाची काम करण्याची एक पद्धत असते. मी बुद्धिबळातल्या उंटासारखा तिरका चालणारा माणूस आहे, आधी अटक करतो मग कैद्याची मुलाखत घेतो, त्याने सहकार्य केल्यास त्यानुसार त्याच्यावर आरोपपत्र दाखल करतो.... हवे तर माझ्या साहेबांना विचारा !" मेजर आता तापलेला होता. आपल्या कामातला अडथळा तो सहन करणार नव्हता.
"ह्या मुळे माझ्या नांवाला डाग लागेल"
"का ? आपणही त्याला सामील आहात का ? एका ऑर्डर्लीच्या गुन्ह्यातल्या सहभागाने त्याच्या साहेबावर कुठलाही डाग लागल्याचे मी आजवर येथे पाहिले नाही." मेजरने सरळ त्यांना तडकवले.
"मेजर, माझ्या काही वैयक्तिक गोष्टी त्याला माहीत आहेत त्याचे भांडवल तो करू शकेल"
"त्या गोष्टींना किती महत्त्व द्यायचे ते माझ्यावर अवलंबून आहे सर, ही केस सध्या मी हाताळत आहे. आपल्या वैयक्तिक गोष्टी भोसले साहेबांच्या हल्ल्यावरील व राडार जॅमर संबंधात नसतील तर आपण निष्कारण काळजी करीत आहात- कारण, बाकीच्या गोष्टींमध्ये मला स्वारस्य नाही."
जळफळत पुरी साहेब चहा टेबलावरच सोडून बाहेर गेले- मेजरने आनंदाने दोन कप चहा गिळला, नाहीतरी कुमारच्या घरून बाहेर पडल्या पासून त्याने पोटात काहीच ढकलले नव्हते.


पुरी साहेब गेल्यावर मेजरने भोसलेंना झाला प्रकार सांगितला. "नथिंग दॅट सीरियस मेजर......" भोसलेंनी ते वाक्य अर्धवट सोडले, "ते मी तुला नंतर सांगेन" इतकेच बोलून गप्प बसले.



कुमार घरी नव्हता म्हणून मेजरने त्याच्या भ्रमणध्वनीवर त्याला फोन केला. "मी तासाभरात येतोय, काही खरेदीसाठी सिटीत आलोय" इतके ऐकल्यावर आता काय करायचे त्याचा विचार मेजर करू लागला. अमर कडे चक्कर टाकूया असा विचार करीत तो अमरच्या घरी गेला. अमर अंघोळीला गेला होता. त्याच्या ऑर्डर्लीने मेजरला बसायला सांगून तो किचन कडे वळला. समोर टिपॉय वर अमरचा मोबाईल पडलेला होता. चाळा म्हणून मेजरने तो उचलून त्यातले लघु संदेश वाचायला सुरुवात केली. अर्धे संदेश कुणा अनघा नावाच्या मुलीचे असल्याचे बघून त्याला हसू आले. बहुतेक सर्वच संदेशांत प्रेमालाप व घरच्या बातम्या होत्या. पाठवलेल्या संदेशात पण बहुतेक सर्वच संदेश वैयक्तिक स्वरूपाचेच होते. पूर्ण संदेश न वाचता मेजरने फक्त काही हरकतीचे संदेश तर नाहीत ह्याची खात्री केली. इतक्यात अमरच्या बाथरुम मधून बाहेर पडण्याचा आवाज आलाच म्हणून त्याने मोबाईल ठेवून दिला.


"अरे वा, अलभ्य लाभ !" करीत अमरने हस्तांदोलनासाठी हात पुढे केला. खुर्चीतून अर्धवट उठत मेजरने त्याच्याशी हात मिळवला. दोघे बराच वेळ गप्पा मारीत होते. नंतर अमरने उठून मेजरसाठी व स्वत:साठी पेय बनवून आणले.
"माफ करा, मेजर, मी व्हिस्की वगैरे घेत नाही"
"इट्स ओके, मला पण खास आवश्यकता असतेच असे नाही.""आज स्क्वॅश खळायला नाही गेलास?" मेजरने विचारले.
"नाही, आठ दिवस धावपळ व गेम्स टाळ असे डॉक्टरने सांगितले आहे".
"अमर, भोसलेंवर हल्ल्याचे कारण काय असेल ?" मेजर अंदाज घेत बोलला
"तेच कळत नाही सर, फक्त राडार जॅमर साठी कोणी सरांवर हल्ला करायची रिस्क का घ्यावी. तो माणूस चुकूनही कोणाच्या किंवा माझ्याच तावडीत सापडला असता तर त्याचे आयुष्य बरबाद झाले असते"


इतक्यात मेजरच्या भ्रमणध्वनीची घंटी वाजली. कुमारचा फोन असावा ह्या अपेक्षेने त्याने पडद्याकडे बघितले तर तो अनोळखी क्रमांक दिसत होता. फोन वर मेजरने बोलायला सुरुवात केली. "ओके, यस्सर, ओके.... "इतकेच बोलून मेजरने फोन ठेवला. अमरच्या डोळ्यांत प्रश्नचिह्न उमटले.
"भोसले साहेबांचा होता !" "पुरीच्या ऑर्डर्लीच्या भावाचा कोणीतरी खून केला आहे व त्याला रिलीव्ह करावे म्हणून भोसले साहेब सांगत होते."
"अरे देवा, म्हणजे आता हा तपास रखडेल कारण त्याला रिलिव्ह तर करावेच लागेल"
"बघू काय होते ते" इतके बोलून अमर उठला. त्याला भजनसिंगला सोडणे भाग होते. काय व कसे करावे ह्याचाच तो विचार करीत होता. कुमारला परत फोन लावावा म्हणून त्याने फोनची बटणे दाबली खरी पण राहू दे असा विचार करीत परत कापला.



भजनसिंगला ठेवलेल्या कोठडीवर जाऊन त्याने भजनला बोलवून आणण्याबद्दल तेथल्या प्रमुखाला सांगितले.
"भजनसिंग, तुम्हारे लिये एक बुरी खबर है ।" "क्या हुआ साहब ?" भजन मनातून आधीच हादरलेला होता.
"तुम्हारे भाईका किसीने कत्ल किया है ।" हे ऐकताच भजनसिंगचा चेहरा घाबरा झाला.... काय करावे ते त्याला सुचत नसल्याचे त्याच्या वागण्यावरून दिसत होते.
"तुम्हे जाना है उसे देखने के लिये ?" मेजरने विचारले.
"नही साहब मुझे यहांसे मत निकालना, वो मुझे भी मार डालेंगे" त्याच्या चेहऱ्यावर मूर्तिमंत भीती दिसत होती.
"यहां बात नही होगी; तुम मेरे साथ चलो ।" मेजरला तो कुठे आहे त्याचे व्यवस्थित भान होते.
त्याच्या तात्पुरत्या ताब्याच्या कागदपत्रांवर सह्या करून त्याने भजनला बरोबर घेतले.
"कहां ले जायेंगे सर आप इसे ?" तेथल्या सुरक्षा प्रमुखाने मेजरला विचारले.
"यह जानना आपका काम नही. किसीने पुछा तो मेरे कब्जे में है यही कहना ।" मेजरला कुठलीच माहिती गळू द्यायची नव्हती.


क्रमशः.......