इन्क्रेडिबल थेफ्ट - ३

सर्वांना बाहेर सोडून पॉयरॉ आत आला ते व्हँडर्लीन बा‌ईंची फ्रेंच नोकराणी, ले‌ओनीला घे‌ऊन. त्याने आधी म्हटल्याप्रमाणे ले‌ओनी खरोखरच आकर्षक होती! तिच्या चेहऱ्यावर मात्र बेफिकिरी आणि उद्धटपणा दिसत होता.
'ले‌ओनी', करड्या आवाजात पॉयरॉने विचारायला सुरुवात केली. 'जिन्यावर तू का किंचाळलीस?'
'कारण मी पांढरे कपडे घातलेलं भूत-'
'थापा नकोत!!', तिचं वाक्य अर्ध्यावरच तोडत पॉयरॉ गरजला. 'मी सांगतो काय झालं होतं ते. जिन्यावर कुणीतरी तुझ्याशी चावटपणा केला होता. कुणीतरी म्हणजे रेजी कॅरिंग्टननेच.'
हे ऐकून ले‌ओनी अवाक झाली. पण क्षणभरात स्वत:ला सावरून ती म्हणाली, 'मग, त्यात काय एवढं?'
'छे! कुठे काय? उलट त्या वेळी ते अगदीच साहजिक होतं. तिथे मी किंवा हेस्टिंग्ज असतो तरी - ते जा‌ऊ दे. नक्की काय झालं ते मला सांग'.
'त्यानं मागून ये‌ऊन मला धरलं, म्हणून मी दचकून किंचाळले. तो काय करणार ह्याची आधी कल्पना असती तर मी ओरडले नसते. माझ्या ओरडण्याने कार्ला‌इल महाशय बाहेर आले आणि रेजी वर पळून गेला. मग मला काहीतरी कारण सांगणं भागच होतं ना, म्हणून ती भुताची थाप मारली.' ले‌ओनी म्हणाली. 'पण तुम्ही कसं ओळखलंत काय झालं ते?'
पॉयरॉ हसला. 'मला कार्ला‌इलने जेव्हा सांगितलं की तू तुझे हात डोक्यावर घे‌ऊन उभी होतीस, तेव्हाच सगळा उलगडा झाला. भुतावर तर माझा अजिबात विश्वास नाहीये. तू खरंच घाबरली असतीस तर आपले हात छातीजवळ नेले असतेस, किंवा किंकाळी दाबण्यासाठी तोंडावर, पण इथे तर अगदीच वेगळा मामला होता. तू तुझे हात डोक्यावर नेले होतेस ते आपले विस्कटलेले केस नीट करण्यासाठी! त्यावरून काय झालं असेल याचा मला अंदाज आला'
'असो, ह्या प्रकारानंतर तू तुझ्या मालकीणबा‌ईंकडे गेलीस ना? कुठली बरं त्यांची खोली?'
'ती, त्या टोकाची'
'म्हणजे अभ्यासिकेच्या बरोबर वरचीच', पॉयरॉ तिकडे पाहात म्हणाला. 'ठीक आहे, पण ह्यापुढे असं काही झालं तर किंचाळू नकोस!'
तिला बाहेर सोडून हसत हसत पॉयरॉ आत आला.
'हेस्टिंग्ज, मजेदार प्रकरण आहे की नाही? तुला काय वाटतंय?'
'मला रेजी कॅरिंग्टन अजिबात आवडला नही. तो जिन्यावर काय करत होता? एक नंबरचा वाया गेलेला कार्टा आहे तो', मी म्हणालो.
'बरोबर आहे तुझं', पॉयरॉने माझ्याशी सहमत दिसला.
'कार्ला‌इल तसा प्रामाणिक वाटतो ना?'
'अगदीच! आणि स्वत: मेफील्ड साहेबांचा किती विश्वास आहे त्याच्यावर!'
'तरीही, त्याच्या वागण्यात असं काहीतरी आहे की-'
'हो ना- इतकं सरळ कोणी असू शकेल का? मलाही ते खटकलं. ही व्हॅंडर्लीन बा‌ई मात्र चालू वाटते'.
'आणि तिची खोली अभ्यासिकेच्या वरचीच आहे!', मी एक महत्त्वाची गोष्ट पॉयरॉच्या लक्षात आणून दिली!
त्यावर गालातल्या गालात हसत पॉयरॉ म्हणाला, 'पण, हेस्टिंग्ज महाशय, ती बा‌ई स्वत: उडी मारून किंवा धुराड्यातून चोरी करायला खाली आली असेल असं वाटतं का तुम्हाला?'
तेवढ्यात मेफील्ड साहेब आत आले.
'आत काय करायचं?' त्यांनी विचारलं.
'मला वाटतं आपण आपल्या सगळ्या पाहुण्यांना जा‌ऊ द्यावं', पॉयरॉ अनपेक्षितपणे म्हणाला.
'चालेल, मी तशी व्यवस्था करतो. मला स्वत:ला लंडनला जायचंय किंवा असं काहीतरी कारण सांगेन मी सगळ्यांना'
'ठीक आहे'.
'पण असं करण्यानं-', मेफील्ड साशंक दिसले.
'ते माझ्यावर सोडा. असं करण्यानं आपलं काही बिघडणार नाही'.
'तुमची मर्जी', खांदे उडवत मेफील्ड म्हणाले.
दुसऱ्या दिवशी दुपारी सगळे पाहुणे परत जायला निघाले.
जाताना व्हॅंडर्लीन बा‌ई यजमान साहेबांचा निरोप घेण्यासाठी आल्या.
'लॉर्ड मेफील्ड, ह्या चोरीच्या प्रकाराने आपल्याला खूप मनस्ताप झालाय. पण लवकरच याचा शोध लागेल, तुम्ही काळजी करू नका. आणि माझ्याकडून ही गोष्ट कुठेही बोलली जाणार नाही. त्याबद्दल तुम्ही निश्चिंत असा.'
त्या गाडीत बसल्या.
अचानक ले‌ओनी पळत पळत परत आली. 'बा‌ईसाहेबांची कपड्यांची बॅग घ्यायची राहिली'
मग जरा शोधाशोध झाली. शेवटी मेफील्ड साहेबांनाच ती बॅग एका कोपऱ्यात ठेवलेली सापडली. ती घे‌ऊन ले‌ओनी गेली. ती गाडीत बसताच व्हॅंडर्लीन बा‌ईंनी हाक मारली, 'लॉर्ड मेफील्ड', त्यांच्या हातात एक कसलासा लिफाफा देत त्या म्हणाल्या, 'माझं हे पत्र तुम्ही तुमच्या बाकीच्या पत्रांबरोबर पेटीत टाकाल का? मी विसरूनच गेले होते!'
इकडे कॅरिंग्टन मंडळींचीही गडबड चालली होती. अचानकपणे लेडी ज्यूलिया पॉयरॉच्या जवळ आल्या आणि अगदी हळू आवाजात म्हणाल्या, 'मला तुम्हाला काही सांगायचंय'
ते दोघे जरा बाजूला गेले.
'तुम्ही काल म्हणालात की ती कागदपत्रं मिळणं हेच लॉर्ड मेफील्डसाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे, हो ना?' लेडी ज्यूलिया म्हणाल्या.
त्या काय म्हणतायत ह्याचा अंदाज घेत पॉयरॉ म्हणाला, 'बरोबर आहे, मग?'
'मग ते कागद तुम्हाला परत मिळतील, तुम्ही ते लॉर्ड मेफील्डपर्यंत पोहोचवायचे - त्याची अधिक चौकशी हो‌ऊ न देता! जमेल हे तुम्हाला?'
'बा‌ईसाहेब, आपण काय म्हणताय ते मला समजत नाहीये', पॉयरॉ म्हणाला.
'तुम्हाला ते समजलंय! मी असं सांगतिये की, तुम्हाला कागदपत्र मिळतायत ना, मग तुम्ही चोराचं नाव गुप्त ठेवा'.
'तुम्ही कागद माझ्याजवळ कधी देणार आहात?', पॉयरॉने सावधपणे विचरले.
'बारा तासांच्या आत!'
'नक्की?'
'अगदी नक्की!', ज्यूलिया बा‌ईंनी खात्री दिली.
यावर पॉयरॉ काही म्हणायच्या आत त्याच पुन्हा बोलू लागल्या, 'तुम्ही खरंच ह्या प्रकरणाची वाच्यता हो‌ऊ देणार नाही ना?'
'मी तुम्हाला तसं वचन देतो', पॉयरॉ गंभीरपणे म्हणाला.
'मग मी सारी व्यवस्था करते', असं म्हणून लेडी ज्यूलिया गेल्या.
तेवढ्यात लोर्ड मेफील्ड समोरून आले. ते पॉयरॉला म्हणाले, 'मग?'
'मग काय?', ऐटीत आपले हात पसरत पॉयरॉ म्हणाला. 'हे कोडं सुटलं, लॉर्ड मेफील्ड'?
'काय?', लॉर्ड मेफील्ड जवळजवळ ओरडलेच.
लेडी ज्यूलियांच्या बरोबर झालेलं सगळं संभाषण पॉयरॉने त्यांना सांगितलं.
तरीही मेफील्डना काहीच उलगडा झाला नाही.
'ह्या सगळ्याचा अर्थ काय?', ते म्हणाले.
'अर्थ उघड आहे, कागदपत्र कुणी चोरली ते लेडी ज्यूलियांना माहीत आहे'.
'म्हणजे? त्यांनी स्वत: नाही का चोरली?'
'अजिबात नाही. त्यांना जुगार खेळायची आवड असली तरी त्या चोर नक्कीच नाहीत, शिवाय ती कागदपत्र त्यांच्याकडे असतील तर ती परत देण्यासठी त्यांना फार तर दहा मिनिटं लागतील - बारा तास नाही! पण ज्या अर्थी त्या ती कागदपत्र परत देण्याची जबाबदारी घेतायत त्या अर्थी ती चोरी त्यांचे पतिराज किंवा चिरंजीव यांच्यापैकी एकाने केली आहे. पण सर जॉर्ज तर तुमच्याबरोबरच होते. म्हणजे रहिला रेजी! त्या रात्री काय झालं असेल ते मी सांगतो.', क्षणभर थांबून पॉयरॉने पुन्हा आपले बोलणे सुरु केले.
'ज्यूलियाबा‌ई रेजीच्या खोलीत गेल्या. तो तिथे नव्हताच, म्हणून त्या त्याला शोधायला खाली गेल्या. (आणि परत येताना व्हॅंडर्लीन बा‌ईंनी त्यांना पाहिलं!) महराजांचा तिथेही पत्ता नाहीच! त्यातून थोड्या वेळाने ही चोरीची बातमी त्यांना समजली. शिवाय रेजीने त्यांच्यासमोरच मला सांगितलं की तो त्याच्या खोलीच्या बाहेर पडलाच नही म्हणून. म्हणजे तो खोटं बोलतोय हे त्यांच्या लगेच लक्षात आलं. आपला मुलगा बावळट आहे आणि त्याला आपले शौक भागवायला पैशांची गरज असते हे ही त्यांना माहीत होतं. शिवाय त्याचा सुंदर बायकांपुढे चालणारा लाळघोटेपणा - आता तर ज्यूलिया बा‌ईंची खात्रीच पटली की व्हॅंडर्लीन बा‌ईंच्या सांगण्यावरून रेजीनेच चोरी केलीये! आणि आता त्यांना आपलं कर्तव्य पार पाडायचंय, म्हणून त्या रेजीकडून कागद मिळवून मला देणार आहेत'.
'पण हे सारं कसं शक्य आहे?', मेफील्ड त्रस्तपणे म्हणाले.
'अर्थातच हे सारं अशक्य आहे, कारण ज्यूलिया बा‌ईंना हे कुठे माहितीये की आपले चिरंजीव तर चोरी झाली त्याच वेळी जिन्यावर त्या फ्रेंच मुलीबरोबर होते'.
'हं- गुंतागुंतीचंच आहे हे प्रकरण', मेफील्ड म्हणाले.
'फारच गुंतागुंतीचं आहे', पॉयरॉ मान डोलावत म्हणाला.
'आणि तुम्ही तर म्हणताय की गुंता सुटलाय म्हणून!'
'हो - गुंता तर सुटलाच आहे. मी, हर्क्यूल पॉयरॉ, सत्य काय आहे ते जाणतो! हरवलेले कागद कुठे आहेत ते मला माहित आहे.' नाट्यपूर्ण आवेशात पॉयरॉ म्हणाला.
'कुठे आहेत?'
'तुमच्या खिशात, लॉर्ड मेफील्ड!'
टाचणी पडली तरी ऐकू ये‌ईल अशी शांतता तिथे पसरली.
आपल्याकडे रोखून पाहणाऱ्या पॉयरॉची नजर टाळत मेफील्ड म्हणाले, 'पॉयरॉ महाशय, तुम्ही काय बोलताय ते तुम्हाला समजतंय ना?'
'होय, आणि मला हे माहीत आहे की मी एक अत्यंत बुद्धीमान माणसाशी बोलतोय. तुम्ही त्या पळून जाणाऱ्या आकृतीबद्दल बोललात ना, तेव्हाच मल ती गोष्ट खटकली होती. तुम्हाला ऱ्हस्वदृष्टीचा त्रास आहे हे तुम्हालाही मान्य असावं, मग तरीही इतक्या छातीठोकपणे तुम्ही असं का सांगितलंत? कारण खरंच चोरी झाली आहे ह्यावर सर्वांचा विश्वास बसण्यासाठी ते एक नाटक होतं. आता, मी ह्या निष्कर्षापर्यंत कसा आलो? एक एक करत बाकी सर्वांच्या निर्दोषत्वाची मला खात्री पटत गेली. म्हणजे, चोरीच्या वेळी व्हॅंडर्लीन बा‌ई त्यांच्या खोलीत होत्या, तर रेजी आणि ले‌ओनी जिन्यावर. लेडी ज्यूलियांना तर असं वाटतंय की चोरी रेजीनेच केली आहे.'
'आत दोनच शक्यता उरतात, एक तर कार्ला‌इलने ते कागद टेबलावर न ठेवता स्वत:च्या खिशात घातले (पण ही शक्यता तर तुम्हीच फेटाळलीत, आणि मलाही ते कारण पटलं!), किंवा - तुम्ही टेबलाकडे जा‌ईपर्यंत ते कागद तिथे होते, आणि तिथून ते तुमच्या खिशात गेले! शिवाय त्या पळून जाणाऱ्या आकृतीची तुमची (न पटणारी!) गोष्ट, कार्ला‌इलच्या प्रामणिकपणाबद्दल तुम्ही देत असलेली खात्री, ह्यांमुळे मझा संशय पक्का होत गेला.'
'पण हे करण्यामगे तुमचा काय हेतू असावा हे मला कळत नव्हतं. तुम्ही स्वत: एक प्रामणिक व्यक्ती आहात म्हणून कोणा निरपराध माणसावर संशय जा‌ऊ न देण्याची तुमची धडपड समजण्यासारखी आहे. उलट ह्या चोरीच्या घटनेमुळे तुमच्या राजकीय चारित्र्यावर एक कायमचा कलंक लागणार होता. मग तरीही हा द्राविडी प्राणायाम का? शेवटी ह्या प्रश्नाचं उत्तर मला मिळालं ते तुमच्या भूतकाळात!'
'काही वर्षांपूर्वी तुमच्या राजकीय कारकीर्दीत तुमचे युरोपातील एका सत्तेशी गुप्त संबंध असल्याची एक बातमी आली होती. तेव्हा खुद्द आपल्या पंतप्रधानांनी तुमच्या निर्दोषत्वाची ग्वाही साऱ्या जगाला दिली होती. पण समजा - त्या बातमीत काही तथ्य आहे अस दाखवणारी एखदी नोंद, उदाहरणार्थ, एखादं पत्र, आज शिल्लक असेल तर? तुम्ही जाहीरपणे आपल्यावरील ज्या आरोपांचं खंडन केलं होतं, ते आरोप खरे आहेत असं आज उघडकीला आलं तर? तुमचं त्यावेळचं तसं वागणं आपल्या देशाच्या हिताचंच असणार; पण ही गोष्ट सर्वासामान्य माणसांना कळणं शक्य नाही! आणि आज, जेव्हा तुम्ही सत्तेतील सर्वोच्च पदाच्या इतक्या जवळ आहात तेव्हा असली घटना भूत हो‌ऊन सगळा डाव उधळू शकते.'
'माझा असा अंदाज आहे की हे पत्र 'त्या' देशाकडे होतं, आणि त्यांनी तुमच्याशी एक सौदा करायचं ठरवलं - पत्राच्या मोबदल्यात इंग्लंडच्या बॉंबर विमानांचे आराखडे. तुमच्या जागी दुसरा कुणी असता तर कदाचित त्याने हे करायला स्पष्ट नकार दिला असता. पण मेफील्ड साहेब, तुम्ही तयार झालात! श्रीमती व्हॅंडर्लीन ह्या व्यवहारात मध्यस्थ होत्या. म्हणूनच त्यांना इथं यायचं निमंत्रण तुम्ही दिलं होतंत.'
'मी तुम्हाला काल जेव्हा विचारलं की त्यांना पकडण्यासाठी तुमची नक्की काय योजना आहे - त्यावर तुम्ही नीटसं उत्तर दे‌ऊ शकला नव्हतात. मग, त्यांना इकडे बोलावण्याचं कारणच काय?'
'तुम्ही ही चोरी घडवून आणलीत. कार्ला‌इलवर संशय यायला नको म्हणुन चोराला पळून जाताना पाहिल्याची बतावणी केलीत. कागदपत्र चाळण्याच्या निमित्तने टेबलाजवळ गेलात, आरखडे स्वत:च्या खिशात घातलेत आणि संधी मिळताच, आधी ठरल्याप्रमाणे व्हॅंडर्लीन बा‌ईंच्या कपड्यांच्या बॅगेत टाकलेत. त्या बदल्यात त्यांनी तुम्हाला पेटीत टाकायच्या निमित्तानं 'ते' महत्त्वाचं पत्र दिलं.'
पॉयरॉ बोलायचा थांबला.
'पॉयरॉ महाशय, अगदी अचूक माहिती आहे तुमची! तुमच्या दृष्टीने मी एक सत्तेसाठी हपापलेला, भ्याड राजकारणी ठरलो आहे ना?', मेफील्ड शांतपणे म्हणाले.
'अजिबात नाही, लॉर्ड मेफील्ड, उलट माझ्या दृष्टीने तुम्ही अतीशय मुत्सद्दी आणि हुषार आहात. काल रात्रीच मला हे आठवलं की तुम्ही तर एक उत्कृष्ट अभियंते आहत. माझ्या अंदाजाप्रमाणे व्हॅंडर्लीन बा‌ईंना देण्या‌आधी त्या आरखड्यांमध्ये तुम्ही बेमालूमपणे असे काही असे काही बदल केले असणार की, त्या बरहुकूम बनवलेली विमानं युद्धात अपेक्षित कामगिरी बजावू शकणार नाहीत.'
'लॉर्ड मेफील्ड, तुम्हाला ही चोरी घडवून आणायची होती व्हॅंडर्लीन बाईंच्या समोर! खुद्द सर जॉर्ज कॅरिंग्टन ह्यांच्या साक्षीने बॉंबरचे मूळ आरखडे गायब झाल्यामुळे श्रीमती व्हॅंडर्लीन आणि पर्यायाने 'त्या' देशाच्या मनात त्यांच्याजवळ असलेल्या कागदपत्रांच्या अस्सलपणाविषयी कोणतीही शंका राहणार नाही!.
तिथे क्षणभर शांतता पसरली. पॉयरॉ कडे पाहात मंद स्मित करत मेफील्ड बोलू लागले, 'पॉयरॉ महाशय, तुम्ही खूप हुषार आहात! मला वाटलं होतं त्यापेक्षा कितीतरी जास्त! पण, माझं बोलणं लक्षात घ्या - येणारा काळ आपल्या सर्वांसाठी कसोटीचा असणार आहे, आणि त्यातून इंग्लंडला योग्य दिशेने नेण्याचं सामर्थ्य आज फक्त माझ्याकडेच आहे. ह्या गोष्टीबद्दल माझ्या मनात जराही संदेह असता, तर हा सारा उपद्व्याप मी केलाच नसता. पण शेवटी हा उभयपक्षी खुशीचा मामला झाला याचंच मला समाधान वाटतंय.'
'ह्या बाबतीत तुम्हा राजकारणी मंडळींचा हात कोणी धरू शकेल का?', पॉयरॉ हसत म्हणाला.

(समाप्त)