नाकाखालीच! (आरंभ)

स्वतःशीच गुणगुणत मेरी विणकाम करत होती. आता कोणत्याही क्षणी दारावरची घंटी वाजेल आणि जॉन येईल. शांतपणे बूट कोट काढेल आणि खुर्चीवर येऊन बसेल. जॉन..मेरीचं पूर्ण आयुष्यच या शब्दाभोवती फिरतं होतं. आताही आठव्या महिन्यातही ती हसतमुख होती आणि कुरकुर न करता घरातली कामं संभाळत होती. अबोल पण प्रेमळ जॉनचा तिला मोठाच आधार होता.

दारावरची घंटी वाजली. पोटाचा भार संभाळत मेरी उठली आणि तिने दरवाजा उघडला. जॉन आत आला आणि कोट बूट काढून खुर्चीवर बसला. (आज तो खुर्चीत जवळजवळ कोसळला असं तिला वाटलं. काहीतरी झालेलं दिसतंय पोलीसठाण्यात. विचारायला हवं.) 'आजचा दिवस कसा गेला?' मेरीने विचारलं. 'विशेष नाही' जॉनने मोजक्या शब्दात उत्तर दिलं. मेरीने नेहमीप्रमाणे एक ब्रँडीचा प्याला तयार केला आणि त्यात दोन बर्फाचे खडे टाकून त्याला दिला आणि खुर्चीवर बसून विणकाम हाती घेतलं.


आज स्वारीचा नूर काही वेगळाच दिसतोय..मेरीने विचार केला. रोज आरामात बसून घुटका घुटका ब्रँडी घेणाऱ्या जॉनने आज एकाच घोटात पूर्ण पेला संपवला, हे न बघताही पेल्यात आपटलेल्या बर्फाच्या आवाजावरुन तिला कळलं. 'जेवणाला भाजलेलं चिकन आणि चीज चालेल ना?' तिने सावकाश उठत विचारलं. 'थांब, थोडावेळ बस इथे, मेरी.' जॉन खिडकीकडे तोंड करुन उभा होता तो तिच्याकडे न पाहताच म्हणाला. मेरी अर्धबट उठलेली परत खुर्चीत बसली.


जॉन भरभर बोलू लागला, 'मेरी, बऱ्याच दिवसापासून तुला सांगेन म्हणत होतो, पण आता सांगावंच लागेल कारण तीसुद्धा माझ्या बाळाची आई बनणार आहे. माझं तिच्यावर प्रेम आहे. सहा महिन्यापूर्वी मी एका कामगिरीवर गेलो होतो तिथेच तिची माझी भेट झाली. आता मात्र आम्ही एकत्र रहायचं ठरवलं आहे. तू मला घटस्फोट दे. तू आणि तुझं बाळ यांचं व्यवस्थित भागेल इतकी रक्कम मी तुला दर महिन्याला देईनच.' बोलून जॉनने कोंडून धरलेला श्वास सोडला. मेरीने आतापर्यंत त्याची खूप चांगली सेवा केली होती आणि म्हणूनच हे सर्व बोलताना त्याला अपराध्यासारखं वाटत होतं.


यानंतरः  नाकाखालीच(मध्य)