नाकाखालीच!(अंत समीप)

याआधीः नाकाखालीच!(मध्य)
पिशवी संभाळत मेरी सावकाश घराच्या पायऱ्या चढली. 'जॉन, मी आले!' म्हणत तिने दरवाजा उघडला आणि...


तिचा जॉन खिडकीपाशी पडला होता. डोक्यावरुन एक रक्ताचा ओघळ जमिनीवर आला होता. 'जॉन, काय झालं?' मेरी घाबरुन त्याला उठवायचा प्रयत्न करायला लागली. पण त्याचं अंग थंड पडलं होतं. मेरीच्या समोर तिने आणि जॉनने घालवलेली पाच सुखाची वर्षं फिरु लागली आणि ती रडायला लागली.


पोलीस ठाण्यात फोन खणखणला. पीटरने फोन उचलला. 'हॅलो, मी मिसेस जॉन बोलतेय..इथे काहीतरी भयंकर झालं आहे. तुम्ही पटकन या. ' मेरीला फोनवर रडू आवरत नव्हतं.


पीटर आणि दोन हवालदार जॉनच्या घरी आले. कर्तव्यदक्ष आणि शांत जॉनचा असा मृत्यू ही त्याचा मित्र पीटरसाठी पण खूप दुःखाची घटना होती. 'डोक्यावर कोणत्यातरी बोथट हत्याराने प्रहार.आपल्या भागात ही खून करण्याची पद्धत कोणाची आहे शोधून काढलं पाहिजे.' पीटर हवालदाराशी बोलत होता. मेरी खुर्चीवर बसून रडत होती. एका हवालदाराने तिला वाईनचा पेला दिला. तिला खरंच याक्षणी त्याची खूप गरज होती. 'साहेब, बऱ्याच ठिकाणी पैशासाठी बायकोनेच नवऱ्याचा खून केल्याच्या केसेस पण खूप आहेत.' बाहेर हवालदार पीटरच्या कानाशी कुजबुजला. 'मेरीला मी बरीच वर्षं ओळखतो. अत्यंत सज्जन आणि संसारी बाई. तिच्या हातून असं काही होणं निव्वळ अशक्य आहे. मी आसपास विचारलं. सॅम म्हणाला की त्याच्या दुकानात आली तेव्हा ती एकदम नेहमीसारखी होती. नवऱ्यासाठी जेवण बनवायला चिकन घेत होती. बिचारी! या अवस्थेत तिला आपल्या नवऱ्याचं प्रेत बघावं लागलं..' 'एक मात्र खरं की खुन्याने खूप जोरात मारलं आहे. एका फटक्यात जॉन खाली पडला आहे. नाहीतर त्याने प्रतिकार केला असता.'


मेरी आता थोडी सावरली होती. 'अशा कठीण प्रसंगी तुम्ही जॉनचे मित्र पटकन धावून आलात. तुमची खूपच मदत झाली.' मेरी म्हणाली. 'मिसेस जॉन, तुम्ही या अवस्थेत स्वतःची काळजी घ्या आणि आज रात्री माझ्या घरी माझ्या पत्नीबरोबर झोपा.' पीटर सहानूभूतीने म्हणाला.


यानंतरः नाकाखालीच!(अंत)