नाकाखालीच! (मध्य)

याआधीः नाकाखालीच!(आरंभ)
मेरीने आतापर्यंत त्याची खूप चांगली सेवा केली होती आणि म्हणूनच हे सर्व बोलताना त्याला अपराध्यासारखं वाटत होतं.


मेरीच्या कानात शिरुनही शब्द डोक्यापर्यंत गेलेच नाहीत. ती सावकाश उठली आणि म्हणाली, 'ठिक आहे. मी जेवण बनवायला घेते. आपण जेऊन घेऊ.' आणि ती स्वयंपाकघरात गेली. फ्रिजमधे बर्फाच्या कप्प्यात चिकनचा मोठा तुकडा होता. तिने तो बाहेर काढला. पण जॉनला भूक कितपत होती, शंकाच होती. म्हणून ती किती चिकन बनवू ते त्याला विचारायला बाहेर आली.


जॉन अजूनही खिडकीकडे पाहत पाठमोरा उभा होता. तिचं सर्वस्व जॉन. जॉनच्या पोलीसी नोकरी आणि दगदगीमुळे मेरीने आपली नोकरी लग्नानंतर सोडून स्वतःला पूर्णपणे घरकामाला वाहून घेतलं होतं. हातातल्या गार कडक चिकनचा स्पर्श जाणवून मेरी भानावर आली आणि अचानक तिने हातातले चिकन जीव एकवटून जॉनच्या डोक्यात मारलं. 'अं..' असा अस्पष्ट आवाज काढत जॉन जमिनीवर कोसळला.


मेरी थकून आरामखुर्चीत बसली. काही वेळ ती डोळे मिटून शांत पडली. मग उठून तिने केस सारखे केले. हातातला चिकनचा तुकडा ओव्हनमधे ठेवला. आरशात पाहून ती हसली आणि म्हणाली, 'हाय सॅम, मला पटकन एक किलो मटण, एक सॅलड आणि एक सॉसची बाटली दे.'


बऱ्याच वेळा उजळणी केल्यावर तिचा आवाज नेहमीसारखा उमटला. तोंड धुवून पिशवी घेऊन ती बाहेर पडली आणि दार लोटून घेत म्हणाली, 'मी पटकन भाजी घेऊन आले हं जॉन!' आणि दार लोटून ती बाहेर पडली.


सॅमच्या दुकानापाशी थांबत ती हसली. म्हणाली, ''हाय सॅम, मला पटकन एक किलो मटण, एक सॅलड आणि एक सॉसची बाटली दे.' सॅमनेही ओळखीचं हास्य करत तिला विचारलं ,'आज संध्याकाळी बाजाराला??' 'हो ना. जॉन आला आहे आणि घरात काहीच नाही. त्याला खूप भूक लागली आहे.' सॅमने भराभर नेहमीच्या वस्तू बांधून दिल्या. 'केक ताजे आले आहेत. देऊ का? जॉनला आवडतील.' 'हो चालेल. गोड पण काहीच नाही घरात.'


पिशवी संभाळत मेरी सावकाश घराच्या पायऱ्या चढली. 'जॉन, मी आले!' म्हणत तिने दरवाजा उघडला आणि...


यानंतरः नाकाखालीच!(अंत समीप)