नाकाखालीच!(अंत)

याआधीः नाकाखालीच!(अंत समीप)
'मिसेस जॉन, तुम्ही या अवस्थेत स्वतःची काळजी घ्या आणि आज रात्री माझ्या घरी माझ्या पत्नीबरोबर झोपा.' पीटर सहानूभूतीने म्हणाला.


स्वयंपाकघरातून एक हवालदार बाहेर आला. 'आत ओव्हनमधे काहीतरी आहे.' 'अरे हो.. जॉनसाठी मी चिकन ठेवलं होतं आणि बाजारत गेले होते.' मेरी म्हणाली. 'माझा जॉन जर आज असता तर त्याने त्याच्या मित्रांचं चांगलं आदरातिथ्य केलं असतंच. माझी विनंती आहे की तुम्ही सर्व हे भाजलेलं चिकन संपवून टाका.मला तर आता जेवणाची अजिबात इच्छा नाही.' मेरी दुःखी आवाजात म्हणाली आणि रडायला लागली. सर्वजण चुळबूळू लागले. ७ तासांच्या कामानंतर आणि आता केलेल्या घराच्या प्रदीर्घ उचकापाचकीनंतर चिकनचा वास त्यांच्या नाकांना खुणावत होताच. पण अशा प्रसंगी नको म्हणून ते आढेवढे घेत होते. 'बरं ठिक आहे. अशा प्रसंगी बरोबर वाटत नाही. पण तुमच्या जॉनसाठी..' आणि ते सर्व बाहेरच्या खोलीत जेवायला बसले.


जेवताना विषय चालूच होता, 'एकदा खुनाचं हत्यार सापडलं की खुनी सापडलाच.' 'पण खुनी इतक्या गजबजलेल्या भागातून हत्यार घेऊन जाईलच कसा? त्याने नक्की ते या घरातच लपवलेलं असणार. आपण नीट शोधायला हवं.' 'हो. कदाचित ते हत्यार आता आपल्या अगदी नाकाखालीच असेल.बागेत वगैरे पण नीट शोधायला हवं.' एक हवालदार म्हणाला आणि त्याने चवीने चिकनचा लचका तोडला.


स्वयंपाकघरात मेरी आवाज न करता पण खदखदून हसत होती!!


(मूळ कथेचे व लेखकाचे नाव आठवत नाही. कोण्या अमेरिकन कथासंग्रहात वाचली होती.मेरी खुनी आहे, पण तिच्यासाठी हे कृत्य करणं सर्वात कठीण काम असावं.)