काही वर्षांपूर्वी एका उपनिषदविषयक मासिकात वाचलेली आणि मनात घर करून राहिलेली ही कथा आहे. ती मी इथे मला आठवतेय तशी फक्त टंकलिखित करते आहे. याच्या मूळ लेखिकेचे/लेखकाचे नाव आता दुर्दैवाने मला आठवत नाही त्यामुळे श्रेयनिर्देश करण्यास सध्या तरी असमर्थता आहे. या कथेत जे काही गुण वाटतील ते मूळ रचनाकाराचे तर जे दोष असतील ते माझ्या स्मरणशक्तीचे समजावेत ही विनंती.
प्रातःसमयीची वेला. ऋषीवर शिष्यांना ज्ञानदान करीत होते. ज्ञानसागरात पोहताना गुरू आणि शिष्य सर्वांची अगदी समाधी लागलेली होती. स्थळकाळाचे संदर्भ विसरून, भान हरपून, अगदी हातचं काहीही न ठेवता गुरू ज्ञान देत होते आणि अनंतहस्ते दिला जाणारा तो ज्ञानसंचय आत्मसात करताना शिष्यही अगदी दंग झाले होते. प्रातःसमयीची प्रसन्नता चोहीकडे अगदी भरभरून वाहात होती.... तेव्हाच... तो आवाज ऋषीवरांच्या कानावर पडला. त्या आवाजाने त्यांना अगदी मंत्रमुग्ध करून टाकलं. काल सायंकाळी त्यांनी शिष्यांना शिकविलेल्या ऋचेचं कोणीतरी पठण करीत होतं...
नासदासीन्नो सदासीत्तदानीं नासीद्रजो नो व्योमा परो यत् ।
किमावरीवः कुह कस्य शर्मन्नम्भः किमासीद्गहनं गभीरम् ॥
अतिशय सुस्पष्ट शब्दोच्चार आणि स्वरांची अचूक जाण असलेला तो आवाज मात्र अतिशय कोवळा वाटत होता. पण त्या आवाजातली मोहिनी विलक्षण होती. न राहवून ऋषीवर उठले आणि तपोवनात त्या आवाजाचा शोध घेऊ लागले. इकडेतिकडे नीट पाहूनही त्या आवाजाचा उगम त्यांना सापडेना. किंचित संभ्रमावस्थेतच त्यांचं लक्ष शेजारच्या फुलांच्या ताटव्याकडे गेलं. त्यांची कन्या इतरा सुस्नात होऊन प्रातःपूजेसाठी वेलीवरून फुले तोडत होती. अचानक त्यांना लख्खकन् एक साक्षात्कार झाला. ती एकादश वर्षांची बालिकाच ती काल संध्याकाळची ऋचा खणखणीत आवाजात अतिशय शुद्ध रवाने सस्वर म्हणत होती. त्या बालिकेची ती प्रतिभा, कष्टाने साध्य होणाऱ्या गोष्टींमधील निसर्गदत्त प्राविण्य आणि एकपाठी अतिशय तेजोगर्भ अशी बुद्धिमत्ता पाहून त्यांना प्रज्ञा,मेधा आणि प्रतिभा यांचा अजोड संगम आपण पाहतो आहोत याची खात्री झाली. साक्षात सरस्वतीचा वरदहस्त लाभलेल्या या हिरकणीला पाहून ते थक्क झाले. "आजपर्यंत हे माझ्या लक्षात कसं आलं नाही? या हिऱ्याला पैलू पाडण्याचं भाग्य मिळणं हीदेखिल मोठी भाग्याची गोष्ट आहे की!... आजच्या आज हिचं उपनयन करायला पाहिजे" असं स्वतःशीच पुटपुटत ते घाईघाईने पर्णकुटीच्या वाटेने निघून गेले....