ऐतरेय महिदास(३)

    तशातच एक दिवस तीर्थयात्रेला निघालेला एक ब्राह्मण त्याच्या कन्येसह अतिथी म्हणून आश्रमात आला. अतिथीचे सगळे यथासांगच झाले पाहिजे असा आचार्यांचा कडक नियम होता. हिमालयाकडे प्रस्थान ठेवलेल्या अतिथीची जीवनयात्रा इतरेच्या ओटीवर अचानक समाप्त झाली. जात्या जिवाने आपली कन्या आणि आपली संपत्ती ओटीत घेण्याची केलेली विनंती आचार्य कसे धुडकावणार? सोन्यालंकारांनी मढलेली द्वितीया इतरेला सवत म्हणून घरात आली. त्याच सुमारास महाराजांनी मोठ्या सन्मानाने युवराज जानकीर्तीला आचार्यांच्या आश्रमात पाठवले. त्याबरोबर मिळालेली संपत्ती आणि मान हा आचार्यांना द्वितीयेचाच पायगुण वाटला. आचार्यांना तिच्याविषयी वाटणारे ममत्त्व अधिकच वाढले. इतरेचा कामकाजाचा भार मात्र वाढला....


      असाच एक दिवस होता. कसलासा सण होता. सगळा आश्रम सजवून इतरेने आज अपूप करायला घातले होते. द्वितीया आपल्या मुलांना फुलांच्या माळा घालवून सजवीत होती. महिदास बिचारा एकटाच खेळत होती. द्वितीयेला त्याच्याबद्दल तुच्छता वाटे. मुलांनाही तीच शिकवण होती. बाहेर पाठशाळेत आचार्य मुलांना संथा  देत होते. पण कुठेतरी काहीतरी चुकत होते.एका विशिष्ट ओळीनंतर संथा पुढे जाण्याऐवजी मूळ पदावर परत येत होती. दोनतीन वेळा हाच प्रकार झाल्यामुळे विद्यार्थीही जरा भांबावले होते.काय चुकते आहे हे इतरेच्या चटकन् लक्षात आले. हातातला अपूप कढईत सोडून ती तीरासारखी धावत बाहेर आली. चुकणारे सूत्र नीट सावरून घेत तिने ते सगळे सूक्त अस्खलितपणे म्हणून दाखवले. सारे विद्यार्थी ते पठण ऐकताना एकीकडे विस्मयचकित होऊन तर एकीकडे भारावून,आनंदून इतरेकडे बघत होते. सूक्त पूर्ण झाल्यावर तिने अभिमानाने आचार्यांकडे पाहिले मात्र... आणि वीज कडाडल्यासारखी गर्जना झाली " माहितेय मोठे पांडित्य आहे ते... तो अपूप जळतो आहे आत तो पहा जाऊन... आम्हाला शिकवायची काही गरज नाही...." इतरा क्षणात भानावर आली. डोळ्यांतून वाहणारे पाणी थोपवून घरात शिरली. 


        त्या दिवशी संध्याकाळी इतरेला आज्ञा झाली " यापुढे या घरात रहायचं कारण नाही. आपल्या विद्वत्तेची इथे गरज नाही. नगराबाहेर जानकीर्तीच्या वडिलांनी दिलेले नवीन क्षेत्र आहे तिथे जायचे रहायला आजपासून. आणि हो महिदासालाही घेऊन जा बरोबर...." साऱ्याच विद्यार्थ्यांची माता असलेल्या इतरेला मिळालेली वागणूक पाहून विद्यार्थीही स्तिमित झाले. युवराज जानकीर्ती त्या दिवशी रात्री ती निघण्यापूर्वी तिच्याकडे आला. तिला खाली वाकून नमस्कार करून म्हणाला," माते तुझ्यावर अन्याय झाला आहे हे मला दिसतंय, कळतंय पण मी आज तुझ्यासाठी काहीही करू शकत नाही. मी हतबल आहे. पण तुला पुढेमागे काही अडचण आली तर माझी ही मुद्रिका तुझ्याजवळ ठेव."