ऐतरेय महिदास(२)

      एखाद्या कसबी रत्नपारखी जवाहिऱ्याच्या हाती जर एखादा अनघड पण अमूल्य रत्नपाषाण पडला तर त्या रत्नाला जसे अलौकिक पैलू पडतात तसंच झालं होतं. एकादश वर्षांची ती गुणी बालिका आणि तिच्यातल्या गुणांना क्षमतांना जाणून त्यांना सर्वोच्च पैलू पाडण्याअचं कसब असलेले तिचे विद्वान वडील यांच्यातल्या गुरु-शिष्याच्या अजोड नात्याला सुरुवात झाली. इतरेचं विधिवत् उपनयन होऊन ती आता छात्रा झाली. ऋषीवरांनी सांगावं आणि तिनं लगेच ते आपल्या कर्णसंपुटात कायमचं साठवून ठेवावं, आणि ते सहीसही तसंच म्हणूनही दाखवावं असं वरचेवर घडू लागलं. पाहता पाहता वर्षं उलटली. पित्याने विश्वासाने दिलेला ज्ञानामृताचा कण अन् कण आपल्या हृदयात साठवून इतरेने विद्याभ्यास पूर्ण केला. सर्व शास्त्रांमधे ती पारंगत झाली. सर्व विद्यांमधे प्रवीण झाली.


      इतरेच्या या प्रगतीमुळे ऋषीवर जरी कितीही आनंदात असले तरी तिच्या मातेच्या मनात मात्र वेगळीच चिंता घर करू लागली होती. ऋषीपत्नी ऋषीवरांना म्हणाल्या,"येत्या शरदात इतरा अष्टादश वर्षांची होईल. आता तिच्या लग्नाचं बघायलाच हवं." पण ऋषीपत्नींची ही काळजी लवकरच दूर झाली. राजधानीमधे महाराजांनी आयोजित केलेल्या यज्ञीय वादविवाद स्पर्धेत विजय मिळवलेले आचार्य त्यांना जामात म्हणून पसंत पडले. आचार्यांचा तरुण वयात मोठी विद्या संपादन करण्याबद्दल लौकिक होता. घरी सगळी समृद्धी होती. धन,धान्य,पैसा-अडका कश्शाची काही कमतरता नव्हती... शिवाय महाराज स्वतः युवराज जानकीर्तीला आचार्यांच्याच आश्रमात शिकायला पाठवणार असल्याची वदंता होती. लक्ष्मी, सरस्वती आणि राजकृपा या सर्वांनीच युक्त असलेल्या या आचार्यांशी इतरेचा विवाह संपन्न झाला आणि ती नव्या घरी आली.


       लग्न झाल्यावर इतरा नव्या आयुष्याशी विविध नात्यांमधे बांधली गेली. घरी गायी होत्या,विद्यार्थी होते... कष्टाची सवय होतीच. पण आश्रमाचा एकूणच विस्तार मोठा होता. इतरा त्यात अगदी गुंतून गेली. विद्यार्थ्यांसाठी गुरुपत्नी, घराची स्वामिनी, गुरावासरांची माऊली,चिमुकल्या महिदासाची आई  अशा अनेक पाशांमधे गुरफटूनसुद्धा तिचं हिरव्या वृक्षवेलींशी असलेलं नातं मात्र तुटलं नाही. या सगळ्या रामरगाड्यात दिवस कुठच्या कुठे पळून गेले हे इतरेला कळलंसुद्धा नाही.  आचार्यांशी शास्त्रचर्चा मात्र होत नव्हती. इतरा स्वतःशीच विचार करीत असे की मैत्रेयी-याज्ञवल्क्य ही जोडी एखादीच... बाकीच्यांनी नुसतीच ती कल्पना करायची....