कावळ्याचे निवेदन

     कळावे लोभ असावा, नुसते कळावे लोभ असावा नव्हे तर, कळावे लोभ असावा आणि अभिप्राय द्यावा ही विनंती. आपला नम्र, लिखाळ.


     माझे सुमार लिखाण आपल्यापैकी बरेच जण शेवटपर्यंत वाचणार नाहीत ही खात्री असल्याने शेवट आधी केला. कारण,त्यातले अभिप्रायाचे वाक्य फार महत्वाचे आहे हो ! आणि यामध्ये, विचित्र सुरुवात पाहून, लेख दमदार असेल,हळूहळू रंग चढेल वगैरे गैरसमज होऊन काही वाचक तो शेवटपर्यंत वाचतील ही,युक्ती आहे.


    तरी, सर्व मनोगतींना सप्रेम नमस्कार.काही दिवसांपूर्वी या संकेतस्थळाबद्दल समजले. गेले ४/५ दिवस सारख्या भेटी देत होतो..हो हो तो १३वा पाहुणा मीच असायचो...तर आपणांपैकी काहींचे लिखाण वाचले, खूप आवडले. त्यावरचे अभिप्राय (प्रतिसाद) सुद्धा छानच. कधी कधी मूळ लेखनाच्या पुढे प्रतिसादांची शेपूट मारुतीच्या शेपटीची आठवण करून देते. त्यातील विनोद, खट्याळपणा, पुढे गैरसमज,मग समजुती,सल्ले,सबुरी,क्षमा,शांती,सबका मलिक एक..(ओह.. चुकले काहीतरी),       हं हं तर हे सर्व पाहून आपणही 'मनोगत' चे सदस्य व्हावे असे वाटले. 'प्रसिद्ध होण्याचे उपाय' वाचून विचित्र नाव घ्यावे असे ठरविले...पण नाव काही सुचेना..दोन दिवस विचार करून शेवटी कुंडली मांडली, तर अक्षर निघाले 'लि'...पण नाव काही सुचेचना. मग देवाची करुणा भाकली..आणि काय !! माझ्या कानांत एका देवदूताने येऊन "लिखाळ कु र र र " असे म्हटले..आहो..आहो..काळजी करू नका,या देवदूताला मी पाहिलेसुद्धा नाही..मग व्यंगचित्र वगैरे.. छे छे..भलतंच..आहो, या देवदूताचा आणि जागतिक सामाजिक-धार्मिक घडामोडींचा ( जेथे घडा कमी आणि मोडी च जास्त ) काहीही संबंध नाही..बरं ते राहू द्या !


    तर, मी लिखाळ, भरपूर बोलणाऱ्या पण कर्तृत्व शून्य असणाऱ्यास वाचाळ म्हणतात,तसा मी प्रतिभाशून्य लिखाळ. आहो,देवाने या रिकाम्या भांड्यात प्रतिभेऐवजी शाईच ओतली.. वाक्य जरा बरे वाटले म्हणून टाकले.. तसे आता समुद्राची शाई आणि धरणीचा कागद करण्याचा काळ गेला हो.. आता या संगणकाच्या युगामध्ये खरं तर वाचकांचे हाल.. या लिखाळांचे लेख वाचून तर वाचकांना फारच उद्वेग येत असेल..कारण ज्या संगणक-पानांवर हे लिखाळ लेखन करतात त्या पानांचा ना रद्दीला उपयोग,ना भेळ खायला, ना जास्त भेळ खाल्ल्यामुळे दुसऱ्या दिवशी होणाऱ्या.. नव्हे 'सुरू' होणाऱ्या 'परंपरेला' निस्तरण्याला.(शीः शीः काय हे !!) बरं ते राहू द्या !


   तर काय, या कोकिळांच्या थव्यात या कावळ्यालासुद्धा सामावून घ्या ही विनंती. हवं तर मी तुमच्या सभेत तोंडातून आवाज देखिल काढणार नाही. पण तुमच्या सोबत उडू तरी द्या. पाहणाऱ्याला तरी मी तुमच्यासारखाच भासेन (प्रतिभावंत).


  तर काय,


  कळावे, लोभ असावा,


  नुसते कळावे लोभ असावा नव्हे. तर,


  कळावे लोभ असावा आणि प्रतिसाद द्यावा ही विनंती.


  आपला नम्र,


  लिखाळ.