दैव (भाग १)

कामतानाथ यांच्या कथेचा अनुवाद.


मी सुरथखल च्या रीजनल अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विश्रामगृहात उतरलो होतो. एका परिचर्चेसठी इथे आलो होतो. आणि आता इथून गोव्याला जायचे होते. जर मी महाविद्यालयच अधिकाऱ्यांना सांगितले असते तर त्यांनी माझी नक्कीच सोय केली असती. कदाचित इथून गोव्यापर्यंतचे भाडे सुद्धा देऊ केले असते. पण मलाच त्यांना तसे सांगणे जीवावर आले. म्हणून मी स्वतः मंगळूर ला जाऊन बस चे आरक्षण करून आलो. रात्री ९.५० ची पणजीला जाणारी बस होती.


आता ८ वाजायला आले होते. मला कोणत्याही परिस्थितीत ९.३० किंवा फारतर ९.४० पर्यंत मंगळूर ला पोचावे लागणार होते. खरे तर ही बस इथूनच जाणार होती. पण मला आधी माहीत नसल्याने हा घोळ झाला. नाहीतर मी अधीच तसे सांगितले असते तर मला सुरथखललाच बस मधे चढता आले असते.


पण आता उशीर झाला होता. मला इथून मंगळूर ला जाण्याशिवाय गत्यंतरच नव्हते. शिवाय मी माझी तत्त्वे सांभाळण्याच्या नादात महाविद्यालयाच्या अधिकाऱ्यांना चारचाकीची गरज नसल्याचे कळवूनही मोकळा झालो होतो.


तसे माझ्याजवळ सामान फारसे नव्हते. एक छोटी बॅग तर होती. बॅग घेऊन मी मंगळूरकडे जाणारी बस मिळते तिथे येऊन उभा राहिलो. तिथे एका झाडाखाली कदाचित प्रवाशांच्या सोयीसाठीच बांधलेला एक चौथरा होता. त्या चौथऱ्यावर एक माणूस बसला होता. मी जाऊन त्याच्या शेजारी बसलो. त्याने मला निरखून पाहिले आणि विचारले, 'कुठे जाणार ?'


'मंगळूर', मी म्हणालो, 'तिथून मला रात्रीच्या ९.५० चा बसने पणजीला जायचंय.'


'आरक्षण केलंय ?'

'सकाळीच केलंय', मी उत्तरलो.


'मग खरं तर तुम्ही त्यांना सांगायला हवं होतं. बस इथूनच जाते. इथेच तुम्हाला बसमधे चढता आलं असतं.'


'हो ना ! हे मला आधी माहिती नव्हतं.'


'असूंदे. अजून वेळ आहे. तुम्ही अगदी आरामात पोचाल. वीस-बावीस किलोमीटर चाच तर प्रश्न आहे. फक्त तुमचा वेळ जाईल इतकंच.'


'नीट माहिती नसल्याची शिक्षा म्हणा हवं तर !'


इतक्यात दूरून एका वाहनाच्या दिव्याचा झोत आला. वाटले, मंगळूर ला जाणारी बस असावी.


'बस थांबवतील की मला हात दाखवून थांबवावी लागेल ?', मी त्या व्यक्तीला विचारले.


त्याने त्या झोताच्या दिशेने पाहिले आणि सांगितले, 'ही तर कार आहे. तुम्ही जरा बसा. बस यायला अजून थोडा वेळ आहे. साडे आठ ला पहिली बस येईल. पण मला विचाराल तर तुम्ही त्या बस मधून काही जाऊ नका. ती स्लो बस आहे. थांबत थांबत जाते. त्या बसने तुम्ही वेळेवर पोचाल की नाही कोणास ठाऊक. त्या नंतरची दुसरी बस ९.१० ला आहे. ती एक्स्प्रेस बस आहे. आणि ती ९.४० ला मंगळूर ला पोचेल. विनाथांबा बस आहे.'


तेव्हढ्यात ज्या गाडीचा झोत लांबून दिसला होता ती आमच्या समोरून गेली आणि ती खरेच कार होती. इतक्या लांबून त्या माणसाने कार असल्याचे कसे काय बरे ओळखले याचे मला आश्चर्य वाटले.


'तुम्ही उत्तर भारतीय आहात ?' मी त्याला विचारले.


'का?'


'तुम्हाला हिंदी चांगले येते.' मी म्हणालो.


तो हसून म्हणाला, 'फक्त हिंदीच नाही तर मला कन्नड आणि कोकणीं ही उत्तम येते. शिवाय मराठी, मल्याळम, पंजाबी, आसामी, बंगाली सुद्धा तोडके-मोडके बोलता येते. पण मी मूळचा कुठला आहे, माझे आई-वडील कोण होते, त्यांचा धर्म कोणता होता, हे मला अजूनही माहीत नाही.'


'असं कसं ?' मी आश्चर्याने विचारले.


'खूप जुनी गोष्ट आहे.' तो एकदम भूतकाळात हरविल्यासारखा वाटला.


इथून पुढे ...