दैव (भाग ४)

याआधी


सुदैवाने जवळच एका दुकानात सिगारेट मिळाली. आम्ही पुन्हा पहिल्या जागी आलो.


'तुमच्या लग्नाचं सांगत होतात तुम्ही.' मी त्याला आठवण करून दिली.


'हं. लग्नानंतर आम्ही त्याच घरात रहायला लागलो. आम्हाला तीन मुलगे झाले. माझी इच्छा होती तिघांनी शिकून मोठं व्हावं. पण तिघांना ड्राइविंगचेच खूळ होते. मोठ्या मुलाने हट्टच धरला तेव्हा आम्ही दोघांनी घर गहाण ठेवून त्याला एक टॅक्सी घेऊन दिली. तोपर्यंत मधला मुलगाही मोठा झाला आणि मग दोघं आळीपाळीने टॅक्सी चालवायला लागले. पुढे त्यांच्यात टॅक्सीवरून भांडणं व्हायची. मग दुसऱ्यानेही टॅक्सीचा हट्ट धरला. पण दुसरी टॅक्सी घेण्याइतकी माझी काही ऐपत नव्हती. त्यामुळे मी धाकट्याला नकार दिला. मग त्याने एका ट्रान्स्पोर्ट कंपनीची नोकरी धरली. मी त्याला खूप समजावलं पण त्याने एकलं नाही. तितक्यात एक दुर्घटना झाली.'


'काय झालं?' मी विचारले.


'माझा मोठा मुलगा टॅक्सी घेऊन पणजीहून मंगळूर ला जाताना एका ट्रक ला धडकला. टॅक्सीतल्या प्रवाशांना काहीच झाले नाही. पण माझा मुलगा मात्र जागच्याजागी खलास झाला. ही घडलं ते ठिकाण जिथे माझा अपघात झाला नेमकं तेच होतं. त्यावेळी त्याचं वय होतं २३ वर्षं ११ महिने १३ दिवस.'


'अर्रर्र. वाईट झालं.' मी म्हणालो.


'मला धक्काच बसला. मी माझ्या मधल्या मुलाला ट्रक चालवू नको म्हणून सांगितलं पण त्याने ऐकलं नाही. त्याच सुमारास सर्वात धाकटा मुलगाही टॅक्सी साठी हट्ट करायला लागला.'


'त्या सुमारास जुलीचे आई-वडीलही वारले होते आणि मोठ्या मुलाच्या जाण्याचा धक्काही तिला बसला होता. पण ती काही माझ्यासारखी अंधविश्वासू नव्हती. तिने धाकट्याला टॅक्सी दुरुस्त करण्यासाठी पैसे दिले. आणि तो टॅक्सी चालवायला लागला. थोड्या दिवसात दुसरी दुर्घटना घडली.'


मी आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले.


'झालं काय की माझा मधला मुलगा रिकामा ट्रक घेऊन मंगळूरहून पणजीला येत होता. त्यावेळी नेमक्या त्याच जागी त्याचा ट्रक घसरला आणि खाली दरीत जाऊन पडला. क्लीनर ला किरकोळ जखमा झाल्या पण माझा मुलगा मात्र जागीच गेला.'


एक क्षण तो बोलायचा थांबला. 'त्यावेळी माझ्या मधल्या मुलाचे वय काय होते माहित्ये ?'


'काय?'


'२३ वर्ष ११ महिने १३ दिवस.'


काही क्षण आम्ही दोघेही गप्प बसलो.  मग त्याने पुन्हा सांगायला सुरुवात केली, 'त्यानंतर तर मी जबर धसका घेतला. जुलीला पण माझं न ऐकण्याचा पश्चात्ताप झाला आणि त्या दुःखात तिच्या डोक्यावर परिणाम झाला. मी तिला वेड्यांच्या इस्पितळात ठेवलं. मग मला माझ्या धाकट्या मुलाची काळजी वाटायला लागली. कोणतीतरी दुष्ट शक्ती माझ्या मुलांना माझ्यापासून हिरावून घेतेय अशी मला भीती वाटायला लागली. मी ठरवलं की काही झालं तरी मायकेल ला टॅक्सी चालवून द्यायची नाही. पण तो काही माझं ऐकत नव्हता. शेवटी एक दिवस मी त्याला घरात कोंडून ठेवलं आणि टॅक्सी विकून टाकली. टॅक्सी विकल्यावर त्याचे पैसे त्याला दिले आणि ते पैसे वापरून छोठामोठा धंदा करायला सांगितलं. तो काही न बोलता माझ्याकडून पैसे घेऊन घराबाहेर पडला, तो अजूनही परतला नाहीये.'


'अजूनही आला नाही ?'


'हं. मे खूप शोधलं त्याला. आज सतरा तारीख आहे आहे नं?'


'हो' मी म्हणालो.


'आज त्याचं वय २३ वर्ष ११ महिने ८ दिवस आहे. चार-पाच दिवसात तो इथे नक्की येईल. चार दिवसांनी मी त्या ठिकाणी जाणार आहे. प्रत्येक गाडी थांबवणार. काहीही झालं तरी त्याला शोधणारंच. माझी खात्री आहे मी त्याला वाचवू शकेन.'


'तुम्हाला असं वाटतं की तो २३ वर्ष ११ महिने १३ व्या दिवशी तिथे येईल ??'


'माझं मन मला सांगतं तो नक्की येईल.' तो म्हणाला.


'तुमची पत्नी ?' मी विचारले.


'ती अजूनही वेड्यांच्या इस्पितळात आहे. तीही दिवस मोजते, तिला भीती वाटते मायकेल पण वाचणार नाही. मी तिला वचन देऊन आलोय की मायकेल ला नक्की वाचवीन...ते बघा तुमची बस येतेय'


दूरून गाडीच्या दिव्यांचा प्रकाशझोत येत होता. बस जवळ आल्यावर त्याना हात दाखवून थांबविली.


'चला.' तो म्हणाला. मी माझी बॅग घेऊन बसमधे चढलो. 'नमस्कार' तो म्हणाला.


बस निघाली तरी हात हालवतं तो माझा निरोप घेत होता.


त्याने बरोबर सांगितले होते. ती पहिली पॅसेंजर बस मला वाटेत उभी असलेली दिसली. मी वेळेत पोचलो  आणि मला आरामात पणजीला जाणारी बस मिळाली. पणजीला जाताना वाटेत पुन्हा मला तो माणूस त्या पारावर एकटाच बसलेला दिसला. रस्ताभर मी फक्त त्याचाच विचार करत होतो. जर त्याने माझ्याकडे पैसे मागितले असते तर माझी खात्री पटली असती की त्याने सगळी गोष्ट रचून सांगितली आहे. पण तसे नव्हते.


पणजीला पोचल्यावर मी तिथे जर हिंडलो - फिरलो. मला त्या माणसाचा पूर्ण विसरच पडला होता. निघायच्या दिवशी मी हॉटेलमधे बसून चहा पीत होतो. तेव्हढ्यात समोरच्या टेबलावरच्या वर्तमानपत्रातील एका बातमीकडे माझे लक्ष गेले. 'ट्रक अपघातात ड्राइवर चा मृत्यू'.  


वर्तमानपत्र घेऊन मी बातमी वाचली. 'काल मंगळूरहून पणजी कडे येणारा एक ट्रक अर्ध्या रस्त्यात एका वृद्धाला वाचविण्याच्या प्रयत्नात दरीत जाऊन पडला. क्लीनर किरकोळ जखमी झाला पण ड्राईवरचा घटनास्थळीच मृत्यु झाला. ड्राइवर चे नाव मायकेल डिसूझा होते. त्याचे वय जवळपास २४ वर्षे होते.'


मी सुन्न झालो. त्याने त्याला वाचविण्याच्या नादात त्यानेच त्याचे प्राण घेतेले ?  


मी पूर्णपणे नास्तिक आहे. कोणत्याही दैवी शक्तीवर माझा विश्वास नाही. मग याला काय म्हणू योगायोग की नियती की .....


तुम्हीच सांगा !!