दैव (भाग ३)

याआधी


मी नकळत त्या व्यक्तीबद्दल विचार करू लागलो. नुसत्या दिव्याच्या प्रकाशावरून लांबवरूनच वाहने ओळखणारा हा माणूस नक्की आहे तरी कोण ?


'तुम्हाला सांगू तो मुलगा कोण होता?' 


'तो मुलगा तुमच्यासमोर बसलाय.' असे म्हणून त्याने त्याच्या गळ्यातला ताईत दाखविला.


'तुम्ही??'


'हो मीच.'


'मग तुम्हाला पुढे काही कळलं?'


'काहीच नाही.' तो म्हणाला.


'मी चार-पाच वर्षं अनाथाश्रमात राहिलो. नंतर तिथून पळून गेलो. प्रत्यक्षात तो एक मुलांना भीक मागायला लावण्याचा अड्डा होता. सकाळी मुलांना भीक मागायला पाठवलं जायचं आणि संध्याकाळी प्रत्येक मुलाकडून पैसे गोळा केले जायचे. पैसे कमी मिळवले तर मारहाण व्हायची. जेवायलाही मिळायचे नाही. म्हणून मग मी तिथून निघालो... तुमची बस येत्ये. पण ही पॅसेंजर बस आहे. माझ्या मते तुम्ही या बसने जाऊ नका.'


'ठीके. अनाथाश्रमातून तुम्ही कुठे गेलात ?'


'तोपर्यंत मला अपघाताबद्दल सगळं काही कळलं आणि मी त्या अपघाताच्या जागी येऊन पोचलो. तिथे रस्त्याच्या कडेला एक हॉटेल झालं होतं तिथे काम करायला लागलो. त्यावेळी माझ्या गळ्यातला फोटो पाहून लोकांना मी कोण हे समजायचं. सगळे माझ्याकडे अगदी उत्सुकतेने पहायचे. ड्राइव्हर आणि कंडक्टरांना माझ्याबद्दल विशेष कुतूहल होतं. ते मला खूप सुदैवी समजायचे. मग कधी कधी मला त्यांच्याशेजारी बसवून घेऊन जायचे. मग थोड्या अंतरावर गेल्यावर मी तिकडून परत येणाऱ्या बसमधे बसून हॉटेलात परत यायचो.'


पॅसेंजर बस येऊन थांबली. अगदी खच्चून भरली होती. एक दोन जण उतरले. पण मी त्याचे ऐकायचे ठरविले.


'मग काय झाले?' मी विचारले.


'मग बसने येणं जाणं रोजचंच झालं. ड्राइव्हर-कंडक्टर माझ्या जेवणाखाण्याचा खर्च करायचे. मग रोजच्या रोज मी मंगळूर-पणजी आणि पणजीहून परत असा प्रवास करायला लागलो. या रस्त्यावरचे हॉटेलवाले, प्रवाशी सुद्धा मला ओळखायला लागले. कधी कोणी मला बिस्किटं, फळं द्यायचे. सुरुवातीला त्यांची सहानुभूती मला बरी वाटली पण नंतर नंतर मला ते नकोसं वाटायला लागलं.'


'मग हळूहळू मी गाडी चालविणं पण शिकलो. मला मंगळूरच्या एका ट्रान्स्पोर्ट कंपनीत नोकरीपण मिळाली. मग मी भारतभर ट्रक चालवायचो. त्यामुळे मला हिंदी आणि इतर भाषा पण यायला लागल्या.'


'ही कोणती गाडी आहे? ' एका वाहनाचा प्रकाश पाहून मी विचारले.


तो बराच वेळ प्रकाशाकडे पाहत म्हणाला, 'ही तर बस वाटतेय. पण अजून बसला वेळ आहे. किती वाजले?'


'आठ चाळीस'


'मग तर बसची वेळ नाहीये. पण ही बसच आहे.'


तेव्हा एका प्रायव्हेट टूरिस्ट कंपनीची गाडी येताना दिसली.


'दिवा पाहून तुम्हाला कसं काय कळतं?'


'आयुष्यभर हेच केलंय आणि शिकलोय.' तो म्हणाला.


मग बराच वेळ शांततेत गेल्यावर मी पुन्हा त्याला बोलते केले. 'एका टूरिस्ट कंपनीमधे नोकरी केल्याचं तुम्ही सांगत होतात.'


'हं. पण तीन-चार वर्षांतच मला त्या नोकरीचा कंटाळा आला. महिनाभर क्लिनर आणि हेल्पर बरोबर दिवसरात्र ट्रक वर रहायला लागायचं, कधी गाडी बंद पडली तर सुनसान रस्त्यावर दिवस-दिवस थांबायला लागायचं खायचे-प्यायचे हालही व्हायचे.  मग नोकरी सोडल्यावर काही दिवस बेकार होतो. मग काही दिवस पणजीतल्या टूरिस्ट बस सर्विस ची नोकरी केली. ही नोकरी सुखाची होती. सकाळी आठ वाजता प्रवाशांना घेऊन आसपासची प्रेक्षणीय स्थळं दाखवण्याचं काम होतं. पणजीमधेच डिसूझा नावाच्या एका ख्रिश्चन कुटुंबात भाडोत्री म्हणून रहायचो. म्हातारे आई-वडील आणि मुलगी असे तिघंच असायचे. एक मुलगा गोवा मुक्तीसंग्रामात मारला गेला. मुलगी जुली माझ्याहून २-३ वर्ष लहान होती. छान नाचायची, पियानो आणि गिटारही वाजवायची. मग हळूहळू आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो आणि आई-वडिलांच्या परवानगीने लग्न करून मोकळे झालो. '


माझे सिगारेट चे पाकीट संपले. 'इथे जवळ कुठे सिगारेट मिळेल ?' मी विचारले.


'काही सांगता येत नाही. चला पुढे जाऊन पाहूया.' तो म्हणाला.


सुदैवाने जवळच एका दुकानात सिगारेट मिळाली. आम्ही पुन्हा पहिल्या जागी आलो.


इथून पुढे...