दैव (भाग २)

याआधी


'खूप जुनी गोष्ट आहे.' तो एकदम भूतकाळात हरविल्यासारखा वाटला.


'पन्नास-बावन वर्षापूर्वीची गोष्ट असेल. याच मंगळूर-पणजी रस्त्यावर एका बसला भयानक अपघात झाला होता. त्यावेळी कदाचित तुमचा जन्म पण झाला नसेल.' त्याने माझ्याकडे पाहिले आणि म्हटले, 'तुम्ही याआधी कधी या रस्त्याने प्रवास केला आहे ?'


'नाही', मी सांगितले.


'मग तर तुम्ही दिवसा प्रवास करायला हवा होता. या प्रवासात बरेच घाट लागतात. दोन्ही बाजूला डोंगर, दऱ्या, धबधबे, जंगल आणि फळ आणि फुलांनी भरलेली झाडे. जराशा पावसाचा शिडकावा झाला की मग तर काय बघायलाच नको.'


'तुम्ही कोणत्यातरी अपघाताचं सांगत होतात ना?'


'हो. पन्नास-बावन वर्षापूर्वीची गोष्ट आहे. या रस्त्यावर एका ठिकाणी रस्ता अगदी 'यू' आकारात वळतो. त्याच जागी अपघात झाला होता.'


कुठल्यातरी वाहनाचा प्रकाश पाहून मी पुन्हा त्याच्याकडे पाहिले.


'ट्रक आहे', त्याने सांगितले.


'हा तुम्ही अपघाताचे सांगत होतात.' मी म्हणालो.

'तेच सांगतोय. खचाखच भरलेली बस खूप जोरात जात होती. त्यावेळी नक्की काय झाले हे आज कोणीच सांगू शकत नाही. पण त्या 'यू' वळणापाशी बस अचानक साधारण दोन हजार फूट खाली गेली असेल आणि तितक्यात बस पेटली आणि तशीच पलटी खात दरीत जाऊन पडली. सर्व प्रवासी मेले. फक्त एक दीड वर्षाचा एक मुलगा तेव्हढा वाचला. त्याला खरचटलं सुद्धा नाही.'


मला या गोष्टीचे खूप आश्चर्य वाटले. तेव्हढ्यात एक वाहन समोरून गेले. तो खरंच ट्रक होता.


'बापरे. त्या मुलाला काहीसुद्धा झालं नाही ही मात्र खरंच कमाल झाली.' मी म्हणालो.


'हं. या भागात काही वृक्ष आहेत. अगदी गुलमोहराच्या फुलांसारखी फुलं येतात त्यांना. पण उंचीला मात्र गुलमोहरापेक्षा जरा कमीच असतात. सप्टेंबर महिन्यात हा वृक्ष फुलांनी अगदी मोहरून गेलेला असतो. त्याच सुमारास ती घटना घडली. एक शक्यता अशी की तो मुलगा खिडकीतून हात बाहेर काढून कोणाच्यातरी मांडीत बसला होता. त्याच्या हाताला फांदी लागली आणि तेव्हढ्यात बस पलटली. त्यावेळी फांदी घट्ट धरल्याने तो बस मधून बाहेर ओढला गेला आणि त्या फांदीलाच लटकून राहिला. जेव्हा जवळचे गावकरी तिथे पोचले तेव्हा त्यांना तो मुलगा मिळाला. काही लोक खाली दरीत उतरले आणि त्यांनी ती बस विझवली. सगळं जळून राख झालं प्रेतं सुद्धा ओळखण्याच्या स्थितीत नव्हती. '


'मुलाच्या कपड्यावरून वाटत होते की तो चांगल्या घरचा असावा. पण आई, बाबा यापेक्षा त्याला काही बोलताच येत नव्हते. पोलिसांनी जळलेल्या बसच्या अवशेषांमधे या मुलाबद्दलचे काही कागदपत्र, वस्तू मिळतात का पाहिलं पण काहीच मिळालं नाही... हा पण ट्रक आहे.' त्याने दिव्याच्या झोताकडे पाहून सांगितले.


'त्या मुलाचं पुढे काय झालं ?'


'दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात अपघाताची बातमी आणि मुलाचा फोटो छापून आला. बरेच दिवस गेले पण काही झाले नाही. त्या मुलाला न्यायला कोणीही आले नाही. त्याला दत्तक घेण्यासाठी बरेच लोक येऊन गेले पण त्यात कायदेशीर अडचण होती. मूल एकतर आई-वडिलांच्या संमतीने दत्तक दिले जाते किंवा अनाथ असताना. पण कायदा या मुलाला अनाथ पण म्हणू देत नव्हता. कदाचित थोड्या दिवसांनी कोणी त्याच्यावर हक्क सांगत आलं असतं तर ? मग मॅजेस्ट्रेटनी आदेश दिला की या मुलाचा फोटो असलेला ताईत त्याच्या गळ्यात बांधला जावा आणि त्याला अनाथाश्रमात ठेवले जावे.'


तितक्यात आमच्या समोरून गेलेले वाहन पुन्हा एकदा त्याने सांगितल्याप्रमाणे ट्रकच होते. मी नकळत त्या व्यक्तीबद्दल विचार करू लागलो. नुसत्या दिव्याच्या प्रकाशावरून लांबवरूनच वाहने ओळखणारा हा माणूस नक्की आहे तरी कोण ?


इथून पुढे ...