कोणी

काळजाला पिसू नये कोणी
हाल इतका पुसू नये कोणी

जीव घ्यावा खुशाल प्रेमाने
बोचकारू, डसू नये कोणी

कुंतलांशी असे न खेळावे
मग स्वत:शी हसू नये कोणी

ओठ नाजुक बरे न दुमडावे
वर अबोला कसू नये कोणी

कोण रुजवात घालणार अता?
(एवढेही रुसू नये कोणी)

सूर्य पाण्यामधे पहावा पण
काजव्यांना फसू नये कोणी

ओळखीचे अजून गाव तरी
ओळखीचे दिसू नये कोणी?

मी नसावे तुझ्यासवे जेव्हा
मी असावे, असू नये कोणी

चित्तरंजन