विळखा १

"विसू...; ए विसू ...." "कुठे जातो हा मुलगा देव जाणे"- विश्वासची आई कावलेली होती.
घरभर शोधत ती अंगणात येऊन पाहते तर छोटा विश्वास वडाच्या झाडाखाली बुंध्याला टेकून बसलेला.
"अरे, शाळेची वेळ होतेय, चल जेवायला पटकन. आणी हे काय ? अजून कपडे नाही बदललेस तू ?"
"काय झालं सूनबाई ?" "बघा नं, काय खुळं भरलंय ह्याच्या डोक्यात.... सारखा त्या झाडाखाली बसलेला असतो."
"असू दे गं, त्याला बरं वाटत असेल झाडाखाली बसायला !" "अहो पण काळ वेळ काही आहे की नाही ?"
आजीने आपली बाजू घेतली की आई जास्तच तणतणते हे विश्वासला माहीत होते. अनिच्छेनेच तो उठला व कपडे बदलायला खोलीत गेला. दप्तर भरून जेमतेम चार घास तोंडात कोंबत त्याने घर सोडले. शाळेला उशीर झाला असता तर मारकुट्या मास्तरांनी परत फोडून काढले असते. कधी गृहपाठ नाही केला तर कधी एखादे पुस्तक वा वही विसरला म्हणून मास्तर विश्वासला रोज प्रसाद देत असत. त्याच्या नशिबाने आज राघू चे बाबा सायकलवर राघूला घेऊन जाताना दिसले मग त्यांनी विसूलाही बसवून शाळेत पोहचवले.
आज विसूची पेन्सिल घरी राहिलेली व मास्तरांच्या छड्यांची पुनरावृत्ती झाली. मास्तर वडाच्या पारंबीची छडी घेऊन येत. बहुदा रोज वरची साल काढल्याने ओली असे व चांगली सणसणीत लागे. आज त्यांचे सर्व काही सुरळीत असावे म्हणून विश्वासची ढुंगणावरच्या दोन फटक्यातच सुटका झाली. पण नंतर दात ओठ खाणारा विसू त्र्यंबक मास्तरांच्या नजरेतून सुटला हे त्याचे नशीब. "तुझी बहीण बघ किती व्यवस्थित आहे... नाही तर तू घोड्या, गाढवासारखा चरतो तरी अक्कल येत नाही." मास्तरांचे बोल पारंबीच्या फटक्यापेक्षा विसूला जास्त झोंबले. पोरं फिदी फिदी करून हसत होती हे त्याला रुचत नसे... पण त्यालाही त्यांच्यावर तसे हसायचा मोका मिळायचा. त्र्यंबक मास्तरांचा वर्गात कोणीच लाडका नव्हता !
राघू मात्र कमी बोलणी ऐकी व मारही कमी खायचा, म्हणून मास्तरांकडे त्याचा भाव जरा जास्तच वधारलेला असे. फळ्यावर गणीत सोडवायला किंवा आकृती काढायला मास्तर त्यालाच पुढे बोलवत. मग राघू पूर्ण वर्गाकडे तुच्छतेने बघत जागेवर जाऊन बसे. विश्वासला त्याच्या हुशारीचे वाईट वाटत नसे पण तो ज्या रितीने सर्वांकडे बघे ते त्याला आवडत नव्हते, म्हणून राघू त्याच्या कंपूतून कटाप होता.
************************************
राजाभाऊ वैद्यांचा मुलगा सुभाष मितभाषी होता- शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याला रेल्वे खात्यात नोकरी लागली. राजाभाऊ आडनावाने व पेश्यानेही वैद्यच होते. सुभाषनेही वैद्यकी पेशा पुढे चालू ठेवावा असे त्यांना वाटे परंतू पत्नीचा - सुभाषच्या आईचा त्याला विरोध होता. "तुम्ही जन्म वेचला लोकांसाठी, धड दोन वेळचे अन्न तरी पोटात गेले का ?"  हा तिचा आवडता प्रश्न असे.... सुभाषलाही त्या जडीबुटीशी सुरुवातीपासूनच आत्मीयता वाटत नसे. तो नोकरीला लागल्यावर जरा बरे दिवस त्या कुटुंबाने पाहिले. थोडे स्थिरस्थावर झाल्यानंतर राजाभाऊंनी गरीब घरातल्या  पण सोज्वळ मुलीशी सुभाषचे लग्न लावून दिले. वसुधा गरीब घरातली असल्याने मेहनती व काटकसरी होती. नव्या लक्ष्मीची पावले घरात येताच सुभाषला बढती व रेल्वेचे निवास मिळावे हा योगायोग खचीतच नव्हता. वसुधाने दोन मुलांना जन्म दिल्यावर कुटुंब पूर्णत्वाकडे होते न होते तोच राजाभाऊंना देवाज्ञा झाली. आशा शाळेत जायला लागलेली होती तर विश्वास रांगण्याच्या तयारीत होता. वैद्य कुटुंबाचा कर्ता पुरूष व गावातला एक भला माणूस हरपला होता.....
************************************************
"आजी हा बघ ना माझी वही खेचतोय...." आशाने विसूची तक्रार मांडली "आशू तू दुसऱ्या खोलीत जाऊन बस !" वसुधा स्वयंपाक खोलीतूनच ओरडली."मीच सारखं का ऐकायचं ...." असं काहीस अस्पष्टसं बडबडत आशू तेथून उठली. "विसू बाबा आल्यावर त्यांनाच नाव सांगते थांब तुझे" " बाबांना माझे नांव माहीत आहे-" तो वाकुल्या दाखवत तिला म्हणाला.  "अरे बाळ असे मोठ्या बहिणीला म्हणू नये !" आजी सारवा सारव करीत होती......


"विस्या, नालायका तुझे अक्षर आहे की कोंबड्या चरल्यात उकीरड्यावर ?" त्र्यंबक मास्तरांनी वही भिरकावली ती थेट विश्वासने अलगद झेलली..... पोर खो खो हसत होती. मास्तरांना वाटले ते आपल्यावर हसतात मग विसूची दाणादाण उडवली मास्तरांनी.... "चालता हो शाळेतून आणी बापाला सांग तुझ्या, घरीच शिकव म्हणावं" विसू पडत्या फळाची आज्ञा घेऊन दफ़्तर भरू लागला... "घोड्या चाललास कुठे ? भिंती कडे तोंड करून शाळा सुटे पर्यंत उभा राहा- आशू चे अक्षर बघ मोत्याच्या दाण्यांसारखे आहे नाही तर तू गाढवा - रत्न आहेस रत्न !"   टचकन पाण्याचे थेंब विसूच्या गालावर ओघळले. त्याने मान फिरवली अन धूसर नजरेत राघूचा चेहरा त्याला दिसला, राघू छद्मीपणे हसत होता.....


"काय रे पोरा खेळायला नाही गेलास आज ? आणी ह्या झाडाखाली काय करतोय ?" आजी एक हात कंबरेवर तर दुसरा कपाळावर दोन डोळ्यांच्या वर हात ठेवत बोलली ! " काही नाही आज मास्तर रागावले ते सांगतोय ह्याला !" "कोणाला रे राजा ? मला तर कोणीच दिसत नाही इथे !" "विसू चल बिस्किटे खाऊन घे आणी खेळायला जा !" आईची आरोळी ऐकून तो धावतच क्वार्टरच्या पडवीत शिरला... आजी गोंधळल्यासारखी वडाकडे पाहतंच राहिली......

"बाबा, आज विसूला नं भिंतीकडे तोंड करून उभे केले होते मास्तरांनी" आशाने चुगली केलीच !
"तुला कसे कळले ?" आजीने बातमीचा शहानिशा करायचे ठरवले !
"राघू भेटला होता बागेत त्याने सांगितले !" आशू टेचांत बोलली- 
"थांब त्याला येऊ तर दे... आज फोडूनच काढतो" सुभाष कार्यालयातून आल्यावर रोजचेच वाक्य बोलला.
"त्याला हात तर लाव मग बघ मी जेवणच सोडते !" आजीनेही रोजचीच धमकी दिली.....

"विसू तिला जेवू दे धडपणे.... " वसुधाने विसूच्या हातावर फटका दिला. "पण ती लोणाचंच खातेय केव्हाची, मी फक्त कोशिंबीर घेतली तीच्या ताटातली !"
"पण इथे आहे ना अजून ह्या भांड्यात कोशिंबीर, मग कशाला तीच्या ताटात हात घालतोस" सुभाषचा पारा चढला.
"राहू दे रे, त्या भावा बहिणींचे सतत काहींना काही चालत असते तू का लक्ष घालतोस त्यांच्यात ?" आजी भक्कमपणे विसूच्या बाजूची होती.

"ऐकलंत का, विसूला कसे समजवावे मला कळतंच नाही !" "का काय झालं ?" सुभाष अंथरुणात पडताच वसुधाने विषयाला वाचा फोडली.
"रोज तो शाळेत ह्या ना त्या कारणाने मार खात असतो, त्र्यंबक रावांना भेटून याल का जरा ?" 
"वसू, मास्तरांना मी चांगला ओळखतो, ते विनाकारण मारत नसावे !"
"तरी माझ्या समाधाना करिता एकदा भेटूनच या, माझे आईचे काळीज आहे; तो इतका मार खातो ते मला ऐकवत नाही !"
"बघतो काय करायचे ते !" सुभाषला सकाळी लवकर जायचे असायचे म्हणून तो कूस बदलून झोपेच्या अधीन झाला...
वसुधा मात्र विसूच्या काळजीत बराच काळ जागी होती......
**********************************************
'बघ ना तो मास्तर मलाच मारतो सारखा, पारंबी कशाला देतोस तू त्याला रोज ?'
'मी काय करणार ? रोज तो येऊन एक पारंबी तोडून जातो.'
'काही करू नकोस, तुझा मित्र रोज मार खातो ते बघत बस'
'थोडे दिवस थांब माझ्या पारंब्या मोठ्या होऊ दे मग बघ गंमत'
'तुझ्या आणी आजी शिवाय माझे कोणीच नाही रे !' विसूच्या डोळ्यांत पाणी तरारले होते !
"कोणाशी बोलतो आहेस विसू ?" आईच्या अचानक आलेल्या आवाजाने विसू दचकला-
"काही नाही, कोणी नाही..." असं अस्पष्टसं बोलत अपराधी नजरेने विसू झाडाखालून उठला !


वडाच्या झाडाकडे एक टक बघत वसुधा मागे वळून चालू लागली व अचानक तिच्या अंगावर अनामिक भितीने शहारा उठला.......


क्रमशः
*******************************************************