विळखा २

"इतिहासाच्या वह्या काढा, गृहपाठ कोणी केला नाही, उभे राहा !" त्र्यंबक मास्तरांची आरोळी वर्गभर घुमली....
वर्गातला एकच मुलगा उभा राहिला..... तो होता राघू !
"बस खाली, मला माहीत आहे, तुझी पाठांतर परीक्षा होती ते !" मास्तरांनी राघूला खाली बसवले.
"धडा पाचवा - शाहिस्तेखानाची पुण्यावर स्वारी- विश्वासराव वैद्य वाचायला सुरुवात करा"
.......
"विश्वासराव वैद्य वाचायला सुरुवात करा"
..........
"अरे, विस्या... गाढवा; वाचतोस का मार खातोस"
"हो गुरुजी.... " विसूने धडा पाचवा कसाबसा वाचून संपवला-
मास्तर काही न बोलले तर नवल होते -"लेकाच्या, विस्या बोलल्या खेरीज कळतं नाही का ? बस खाली !"


'मास्तर आज मला विश्वासराव वैद्य बोलले'
'तुझे बाबा भेटायला गेले होते त्याला आज'
'हो? ताई बोलली नाही काही !'
'तिला माहीतच नाही !'
'तुझ्या पारंब्या मोठ्या कधी होणार ?'
'लवकरच, तुझी आजी आली.....'

विसू गप्प बसला- " चल पोरा, खेळायला जा !"आजीने आल्या आल्या फर्मान सोडले !
विसू खेळायला गेला-
"देवा माझ्या ह्या पोरावर लक्ष ठेव रे !" आजी वडाकडे बघून बोलली.........
वडाच्या पारंब्याची जराशी सळसळ झालेली तीच्या नजरेतून सुटली.

"मुलींमध्ये मुलगा लांबोडा- भाजून खातो कोंबडा"
"ए ताई मला चिडवू नकोस हं !"
"माझा कोंबडा कोणी मारियेला !"
"ताई... सांगतोय मला चिडवू नकोस"
"कु कु कूच कू - कोंबडा आरवतो"
"ताये, बस झालं आता "
"काय करशील ? आजीला सांगशील ?"
"नाही, वडाला सांगेन- तो बांधून ठेवेल तुला"
आशू बरोबरच्या सगळ्या मुली फिदीफिदी करून हसू लागल्या.

आज वडाशी बोलत बसल्याने विसूला शाळेत जायला उशीर झाला. रस्त्यात राघूचे बाबाही दिसले नाहीत.... पण त्र्यंबक मास्तरांची पारंबीची छडी आज ते घरीच विसरले असावेत. त्र्यंबक मास्तर मुलांना हाताने कधी मारीत नसत. वडाची पारंबी हेच त्यांचे आवडते हत्यार होते.
'आज मार वाचला ना ?'
'हो ! कसे झाले हे ?'
'माझी पारंबी आज कापलीच गेली नाही'
'रोज कर नं काही तरी असेच'
'बरं......'
'आज शाळेत मी माझा मित्र वर निबंध लिहिला.'
'कोण आहे तुझा मित्र ? राघू ?'
'च्छ्या तो शेंबड्या राघू नाही आवडत मला, रुबाब तर करतो पण नाक गळत असते सारखे त्याचे'
'मग कोण आहे तुझा मित्र'
'तूच तर आहेस........'
'.......'
'मला खूप आवडते तुझ्याशी बोलायला'
'..........'
'तू गप्प का बसलास ?ऐकतोयस ना ?'
'हो... पण आता तू जा इथून'
'का ?'
'रात्र पडायला लागलीय म्हणून !'
'बरं -अच्छा उद्या येईनच !'
*****************
'राघू फार शेफारलाय'
'काय करणार तो अभ्यास खूप करतो ना म्हणून काहीच करता येत नाही'
'काही तरी कर ना !'
'बरं..... बघतो !'
**********************
"आजचा गृहपाठ कोणी केलेला नाही ?"
राघू उभा राहिला !
"काय रे लेका ? तुझी पाठांतराची परीक्षा संपली ना ? मग गृहपाठ कोण करील ? माझा बा ?"
पोरे फिदी फिदी करून हसू लागली...... आयुष्यात प्रथमच विसूचे मास्तरांवर प्रेम जडले !
राघू खात असलेला मार पाहून विसूच्या डोळ्यांचे पारणे फिटले !
****************************
'मार खाल्ला ना आज त्याने ?"
'हो ! हे कसे झाले ?'
'पारंब्या मोठ्या झाल्यात माझ्या'
'मला देशील थोड्या काढून ?'
'काय करायच्यात ?'
'काही नाही सहज !'
'घे काढून हव्या तितक्या, माझ्या काय कामाच्या - उगीच ओझे विनाकारण'
'नको.....!'
'का रे ?'
'कोणी माझे हात पाय कापले तर मला कसे वाटेल ?'
'अरे आम्हा झाडांचे तसे नसते, पण मला आवडले तू बोललास ते, मलाही खूप दुखते रे माझ्या फांद्या तुटल्या की.'
'तू शाळेत येशील एकदा ?'
'नको रे बा ! त्र्यंबक मास्तर ओरडेल मला.... आणी येऊ कसा ? मला पाय आहेत  का ?'
'हम्म.....'
"विसू कोणाशी बोलतोय तू ? मला सांग खरं खरं......" अचानक आईचा आवाज आल्याने विश्वास दचकला.
'......'
"थांब, पळू नकोस, तुला माझी शप्पथ आहे बघ !"
"झाडाशी..... ह्या वडाच्या, तो माझा मित्र आहे !"
"वेडा कुठला.... झाड कधी बोलते का ? चल हात पाय धुऊन घे, दिवे लागणीची वेळ झाली आहे."


"शुभंकरोती कल्याणम, आरोग्यं......." आजीचे खडे बोल वातावरणात घुमत होते. तिच्या मागोमाग वसुधा, आशा व विश्वास स्तोत्र म्हणत होते. परंतू वसुधाचे लक्ष स्तोत्र म्हणण्यात लागतच नव्हते.
रात्री जेवणे आटोपल्यावर वसुधा व आजी क्वॉर्टरच्या पायऱ्यांवर जाऊन बसले. सुभाष ऑफिस च्या कामानिमित्त बाहेर गांवी गेला होता.
"सूनबाई, आज लक्ष लागत नाही ते तुझे कशांत ?"
"अं.... काही नाही, असेच"
"मघाशी जेवताना पाण्याचा तांब्या घेतला असूनही दोन वेळा तू पाणी आणायला गेलीस..... स्तोत्र पण अडखळतच म्हटलेस... सुभाष ची काळजी वाटतेय का?"
"नाही हो आई, विसू जरा चमत्कारिक वागतो ना, त्याचीच काळजी करीत होते."
"आता काय केले त्या गरीब पोराने माझ्या ?"
"सारखा झाडाशी बोलत बसलेला असतो ! काय खुळं भरलंय डोक्यात देव जाणे..... परवा आशूला बोलला, झाडाला नांव सांगीन म्हणे !"
"अगं, मला पण म्हणे एकदा- झाड बोलते म्हणे माझ्याशी ! लहान मुलांचे कल्पनांचे खेळ सगळे अजून काय ?"
"मला तर आता भिती वाटायला लागलेली आहे त्या झाडाचीच !"
"तुझे आपले मनाचे खेळ आहेत सगळे सूनबाई, झोप आता जाऊन !"


रात्री कसल्यातरी आवाजाने वसुधाची झोप उडाली. कूस वळून बघते तर विसू बिछान्यात नव्हता. आजीकडे झोपायला गेला असेल असा विचार करत ती झोपायचा प्रयत्न करू लागली. अचानक एका अनामिक भितीने तीच्या अंगावर काटा उठला व ती तशीच ताडकन उठून खिडकी जवळ गेली. किलकिल्या खिडकीतून चंद्रप्रकाशातल्या वडाच्या झाडाकडे बघत असताना वडाच्या झाडाखाली कोणीतरी झोपल्याचा भास तिला झाला. निरखून पाहिल्यावर विसू झोपला असल्याचे तिच्या लक्षात आले.
'......'
'............'
आपल्या तोंडातून आवाज का येत नाही हेच तिला कळत नव्हते............... तशीच ती पलंगावर कोसळली.


"वसुधा काय झालं गं?" सासूबाईंचा स्वर फार लांबून येत असल्याचा भास तिला झाला.
जऱ्या वेळाने जरा शुद्धीवर आल्यावर तिने विसूला पलंगाशेजारी पाहिले.
"रात्री झाडाखाली का झोपलास विसू ?"
"मी तर आजी जवळ झोपलो होतो"
"खोट बोलू नकोस...... मी बघितले तुला रात्री त्या झाडाखाली झोपलेला"
"काहीतरीच काय सूनबाई, हा रात्रभर माझ्या जवळच झोपलेला होता" आजीने ठामपणे सांगितले.
"तुम्ही त्याला वाचवायचा प्रयत्न करताय, पण तो खोटं बोलतोय हे मला माहीत आहे आई,"
'.........'
*****************************************************
'आईने तुझ्या जवळ यायला मनाई केली आहे मला !'
'तिने रात्री तुला बघितला माझ्या जवळ झोपलेला'
'मग आजी का 'नाही' म्हणाली ?'
'तिला माहीतच नाही, तू दाराची कडी काढून कधी बाहेर आलास ते !'
'मी जातो, आईने पाहिले तर रागावेल !'


क्रमशः