विळखा ३

"काय सांगतेस काय ?" सुभाषच्या स्वरात आश्चर्याचे भाव होते.
"खरंच हो, मला सुरुवातीला वाटले तो अजून स्वतःच्याच भावविश्वात मग्न आहे, पण कालचा प्रकार अंगावर शहारे आणणारा होता" वसुधाने सर्व हकीकत सुभाषला कथन केलेली होती.
दुपारी सुभाष बाहेर गांवाहून परतल्यावर वसुधाने त्याला घाबरत घाबरतच सगळी कहाणी सांगितली.
'.......'
"आईंशी बोलण्यात काही अर्थच नाही ! त्या काही ऐकूनच घेणार नाहीत."
"त्यालाच विचारतो !"
"नको, त्यापेक्षा आपण दुसरे कोणाला तरी विचारू" वसुधाला मुलाच्या मन:स्थितीची काळजी होती.
"मामांना विचारून बघावे लागेल, उद्या सुटीच आहे तर त्याच्यावर लक्षही ठेवता येईल."
प्रकरण साधे सरळ असते तर गोष्ट वेगळी होती.... पण रात्री कडी उघडून विश्वास झाडाखाली झोपल्याने सुभाषला काळजी वाटू लागली.


विसू शाळेतून परतल्यावर सुभाषने त्याच्यावर बारीक लक्ष ठेवले होते. मध्येच तो 'त्या' खिडकीकडे जाऊन येत असल्याचे सुभाषच्या लक्षांत आलेले होते.  विसू बाहेर पडायला लागताच, सुभाष पडवीत जाऊन उभा राहिला. थोडा वेळ अंगणातच खेळून शेवटी कंटाळून विसू आजीजवळ जाऊन बसला.


"बाबा, झाडांना पाय का नसतात ?"
"कारण तुला डोक्यावर फांद्या नसतात !" आशू त्याला चिडवण्याच्या स्वरांत बोलली.
"बाबा, सांगा ना " विसू तिच्याकडे दुर्लक्ष करीत बोलला.
"तू लहान आहेस अजून मोठा झाल्यावर कळेल" सुभाष ने विषयाला फाटा दिला.
"पण त्यांना हात तर असतात नां !"
"ह्या... बुद्धूराम डोक्यात भुसा भरलाय तुझ्या " आशूने त्याला परत चिडवले.
"विसू जेव आता मुकाट्याने" इतकेच बोलत सुभाष गप्प झाला.
नंतर मात्र खरोखरच विश्वासने स्वतःचा तंद्रीतच जेवण संपवले.


वसुधाचे जेवण व कामे आटोपल्यावर नेहमीप्रमाणे दोघे फेरफटका मारायला निघाले. तोवर आशू झोपली होती. विसूची आजीच्या मागे 'गोष्ट सांग' ची भुणभूण चालू होती.
"आई आम्ही येतो जरा फिरून " वसुधा बोलली.
"मी येऊ ?" पटकन विसूने विचारले.
वसुधाने सुभाष कडे प्रश्नार्थक नजरेने बघितले...."नको, आजी गोष्ट सांगतेय ती ऐक" सुभाषने त्याला कटवला.
"घ्यायचा होतात की त्याला बरोबर" आजीला नातवाच्या हौसेची काळजी होती.
"....." वसुधा चप्पल पायांत सरकवून बाहेर पडली.
"मग मला झाडाचीच गोष्ट सांग" विसूचे वाक्य जाता जाता तिच्या कानांवर पडताच तिच्या काळजांत चर्र झाले.


"मामांकडे जाऊन येऊ या का आताच ?" वसुधाने सुभाषला चालता चालता म्हटले.
"झोपले असतील तर ?" "काही नाही, बाहेरूनच बघू, दिवे बंद असतील तर दार वाजवायचेच नाही" 
"बरं, चल जाऊन तर बघू !" दोघे रोजच्या वाटे ऐवजी सुभाषचे मामा राहतं त्या भागाकडच्या रस्त्याकडे जायला वळले.
नशिबाने मामा व मामी जागे होते. "काय रे सुभाष, आज अचानक ह्या वेळी ?" मामीच्या चौकश्या करायच्या स्वभावाला चालना मिळाली. "काही नाही सहज पाय मोकळे करायला पडलो होतो!" सुभाषला मामीचा बोचक स्वभाव आवडत नसे-
"सुभाष, आईची तब्येत काय म्हणते ?" मामांनी विचारले.
"आई ठीक आहे, विसूला जरा बरं वाटत नाही !" सुभाष मोघम बोलला.
"चल जरा कोपऱ्यावर जाऊन येऊ तोवर ही बसेल वसुधांशी गप्पा मारीत" मामा बायकोकडे बघत बोलले.
"हो, तुम्हाला सिगारेट फुंकायची असेल ना !" मामांचे सिगरेटपान प्रकरण सुभाषच्या पत्थ्यावर पडले.


"काय रे, काही गंभीर मामला" मामांनी चालतानाच विचारले.
"मलाही नक्की सांगता येणार नाही.....पण..." सुभाषने हळूहळू घडलेले प्रकरण मामांना सांगायला सुरुवात केली.
"अरे मुलांच्या काही विचित्र कल्पना असतात त्याने इतके बावचळून जायचे कारण नाही!" मामांनी
सुभाषला धीर दिला. "तरी मी बघतो कोणी मांत्रिक असला तर".मामा सहजपणे बोलले.
सुभाषला मांत्रिकाला भेटण्याची कल्पना पसंत नसली तरी लगेच प्रतिक्रिया दिली नाही.
"झाल्या प्रकाराची कुठेच वाच्यता करू नकोस सुभाष, अगदी अक्कालाही व आमच्या हिलाही सांगू नकोस, उगीच दहा तोंडातून चार वेगवेगळ्या गोष्टी बाहेर पडतात." त्यांचे हे वाक्य मात्र सुभाषला दिलासा देऊन गेले.मामांशी बोलून व मामीने केलेले आग्रहाचे पन्हे पिऊन घरी पोहचे पर्यंत बराच उशीर झालेला.


रस्त्यात चालताना मामा काय म्हणाले ते सुभाषने वसुधाला सांगितले. घरी पोहचल्यावर फाटकातून आत शिरताना त्यांनी विसूला पडवीत शिरताना पाहिले.
"काय रे, काय करीत होतास बाहेर ?" सुभाषने विसूला थोडे मोठ्या आवाजात विचारले.
"काही नाही, तुमची वाट बघत होतो."
विसू खोटे बोलतोय हे वसुधाच्या लक्षात येत होते पण ही वेळ त्याला रागावण्याची नाही ते तिला ठाऊक होते. "आजी झोपली ?" "हो, केव्हाचीच. मला गोष्ट सांगता सांगताच ती झोपली" त्याच्या ह्या वाक्याने वसुधा आणखीनच काळजीत पडली. आजी व आशू मध्ये झोपल्या असताना विसू एकटा पडवीत जागा राहणे (किंवा झाडाशी बोलत बसणे) हे तिला कसेसेच वाटत होते. 
"चल जा आता झोपायला" सुभाषने विसूला बजावले. "बरं" करीत तो आजीजवळच्या पांघरुणात शिरला. "विसू आज बाबांबरोबर झोपायचे का ?" वसुधाने त्याची कळी खुलवायला त्याला विचारले "हो, चालेल !" विसू टुणकन उडी मारीत बोलला. "नको, तो झोपेत लाथा खूप मारतो." सुभाष सहज बोलला खरा पण विसूच्या हिरमुसल्या चेहऱ्याकडे त्याचे दुर्लक्ष होते. शेवटी विसू आजीच्या पांघरुणात शिरला.


बराच वेळ गप्पा मारता मारता झोप केंव्हा लागली ते सुभाषला कळलेच नाही. पहाटे आईच्या हाकांनी दोघे दचकून जागे झाले. दार उघडून बघितले तर आई घामाघूम झालेली होती. "सुभाष विसू कुठे दिसत नाही. मी संडासात, पडवीत सगळीकडे बघितले"
वसुधाने पटकन खिडकीकडे धाव घेतली. काही बोलायची तिला आवश्यकताच नव्हती. सुभाषने झाडाखाली गाढ झोपलेल्या विसूला उचलून स्वतः:च्या बिछान्यावर आणून ठेवले. "रात्री आपल्याकडेच झोपवले असते तर बरे झाले असते" ह्या वसुधाच्या वाक्याने त्याला स्वतः:ची चूक उमगली.
******************************
सकाळी उठून बघतात तर विसू तापाने फणफणलेला होता. तसा तो कधी आजारी पडला नव्हता. आजीने त्याला बरीचशी चाटणे चाटवली पण ताप उतरण्याचे नांवच नव्हते. पूर्णं दिवस तो तापात बडबड करीत होता. मध्येच त्र्यंबक मास्तरांना "नका मारू, नका मारू" म्हणून सांगायचा मध्येच आजीला "ते बघ झाडाला पाय फुटलेत आता ते शाळेत येणार" असे म्हणायचा. "बाबा, ताई मला चिडवते" तर आईकडे वर्गातल्या मुलांच्या तक्रारी....... पूर्ण दुपार त्याची तापात बडबड चालू होती. शेवटी संध्याकाळच्या सुमारास त्याचा ताप उतरल्यावर सुभाषने त्याला डॉक्टर पानसेंकडे नेले. 
डॉक्टरांचे भाऊसाहेबांशी व त्यांच्या कुटुंबीयाशी चांगले संबंध होते. आयुर्वेदाचार्य राजाभाऊ वैद्यांचे नांव ह्या क्षेत्रात सन्मानाने घेतले जाई. त्यांनी विसूला तपासले व बाटलीत एक औषधी मिश्रण बनवून दिले."तासाभरात ताप उतरेल पण विषमज्वर असल्यास परत पहाटे चढेल तेंव्हा ह्या बाटलीतले औषध दोन मात्रा दे." झाला प्रसंग सुभाषने त्यांना फारच मोघमपणे सांगितला होता व मामांची ह्या प्रकाराची वाच्यता न करण्याच्या सूचनेची आठवण ठेवत तोंड बंदच ठेवणे पसंत केले.
रात्री मामा व मामी फेरफटका मारत घरी आले तेंव्हा त्यांना विसूच्या तापाबद्दल कळले.
"गुरुवर्य निरंजन स्वामींच्या पट्ट शिष्याला मी भेटलो सुभाष, त्याला प्रकाराची पूर्ण कल्पना दिलेली आहे. विसूला घेऊन गुरूवारी त्यांच्याकडे जाऊन येऊ" सुभाषला थोडे बाजूला घेत ते बोलले.
"मांत्रिकाकडे जाण्याने काही फरक पडेल का मामा ?" सुभाषने घाबरत घाबरतच विचारले.
"सुभाष निरंजन स्वामी मांत्रिक नाहीत, तुला सहज सोप्या शब्दांत कळावे म्हणून मी तो शब्दप्रयोग केला होता. अघोरी विद्या ह्या विषयांत त्यांना रस आहे व म्हणूनच त्यांनी त्यावर अभ्यास केला आहे."
"हो चालेल जाऊ गुरूवारी" सुभाष ह्या युगातला असल्याने त्याला साहजिकच हा प्रयोग करण्यापेक्षा डॉक्टरवर जास्त विश्वास होता.


मध्यरात्री विसूला परत ताप चढला पण डॉक्टर पानस्यांनी दिलेल्या औषधाने व कपाळावर थंड पाण्याच्या ठेवलेल्या पट्ट्यांनी तासाभरात तो परत गाढ झोपला. वसुधाला मात्र रात्रभर जागे राहावे लागले होते.
दोन दिवसांच्या शाळेच्या बुट्टीने विसूला ताजे तवाने बनवले होते. त्याला लागून आलेल्या रविवारच्या सुटीमुळे त्याला अभ्यासाचा चांगलाच विसर पडला होता. ताप उतरताच शाळेत जाण्याच्या कल्पनेने तो हिरमुसला. पण वसुधाने समजूत घालितं त्याला तयार केला.


मधल्या काळांत सुभाष मामांबरोबर निरंजन स्वामींकडे जाऊन आला. निरंजन स्वामींनी त्याला विसूला घेऊन या इतकेच सांगितले.
*******************
"काय रे कशी आहे विसूची तब्येत ?" सुभाष चे वरिष्ठ व तिथल्या रेल्वेच्या स्थानकाचे प्रमुख मास्तर अंकोलीकरांनी विचारले. "बरी आहे, आजपासून शाळेत जायला लागला." पण बरीच वर्षे बरोबर काम केलेल्या अंकोलीकरांच्या नजरेतून सुभाषची घालमेल लपली नाही.
"तुला काही तरी सांगायचे आहे का मला ?" अंकोलीकरांनी सुभाषला विचारले. "हो सर, तुमचे थोडे मार्गदर्शन हवे होते" सुभाष चाचरतच बोलला."पण येथे नको, घरी जाताना बरोबर जाऊ मग सांगतो" त्याने हळूच सांगितले.
संध्याकाळी परतताना त्याने अंकोलीकरांना सर्व हकीकत सांगितली. अंकोलीकरही त्याच्याबरोबर विसूची तब्येत बघायला म्हणून घरी आले होते. त्यांना क्वॉर्टरच्या फाटकापर्यंत सोडायला सुभाष गेला तेंव्हा त्याला समजावण्याच्या स्वरांत ते बोलले,"सुभाष हे स्वामी वगैरे सर्व ठीक आहे परंतू माझ्या मते तू एखाद्या बालमानोसपचार तज्ज्ञाला भेटावे असे मला वाटते."
"आपल्या माहितीतले आहे कोणी सर ?" "माझ्या नाही पण हिच्या माहेरच्या नात्यातला एका मुलाने ह्या क्षेत्रात चांगली पदवी घेतलेली आहे, तिला विचारून सांगतो उद्या तुला". अंकोलीकरांनी त्याला आशेचा एक किरण दाखवला होता..... विसूला घेऊन मानसोपचार तज्ज्ञ कडे जाणे म्हणजे त्याला वेडा ठरवणे तर नाही ना ? अशी एक शंका सुभाषच्या मनांत येऊन गेली तरीही मांत्रिका कडे जाण्यापेक्षा मानसोपचार तज्ज्ञ बरा असाच विचार त्याने केला.


"बाबा, झाडांनाही ताप येतो का ?" विसूच्या वाक्याने तो भानावर आला.
***********************


हा तिसरा भाग प्रकाशित करण्यास काही वैयक्तिक कारणांमुळे उशीर झाल्याबद्दल क्षमस्व !