विळखा - शेवट !

निरंजन स्वामींच्या मठांत गुरूवारी ठरल्या प्रमाणे जायचे आहे हे खास सांगायला मामा घरी आल्याने सुभाष ने विरोध न करता 'जाऊन तर बघू' असा पवित्रा घेतला. मग आईलाही सांगणे सुभाषला भाग पडलेच होते. "जाऊन या, सर्वांच्याच मनाचे समाधान !" इतकीच प्रतिक्रिया आईने दिली.
त्याच दिवशी अंकोलीकरांनी त्यांच्या सौ.च्या दूरच्या भाच्याची, एका बालमानसोपचार तज्ञाची वेळ विसूसाठी राखून ठेवलेली होती. नशीब की तेथे सायंकाळी जायचे होते.
"अंकोलीकरांना सांगायला जड जाणार आहे" सुभाषने वसुधाला म्हटले !
"काय ?" वसुधा गोंधळली "हेच की निरंजन स्वामींकडेही विसूला घेऊन जातोय ते !"
"उद्या सुटी घ्या" वसुधाने सुचवले "आयत्या वेळी ? बघू ... निरोप तरी पाठवावा लागेल"


सकाळी सुभाषने सुटीवर असल्याचा निरोप रेल्वेच्या गॅंगमन बरोबर साहेबांना धाडला. मामा येताच ते विसूला घेऊन निरंजन स्वामींकडे जायला निघाले.


मठातले वातावरण धीरगंभीर होते. "या, स्वामी ध्यानांत आहेत, थोड्याच काळात बोलावतील " एका शिष्याने त्यांना बसायला आसन दिले. दहा पंधरा मिनिटातच स्वामी बोलवत असल्याची सूचना घेऊन तोच शिष्य परत आला. आतल्या कुटीत जाताच एकदम वेगळेच वातावरण सुभाषला अनुभवायला मिळाले. धीरगंभीर व कमी उजेड असलेल्या वातावरणात तंबोऱ्याचे नादमधुर स्वर पार्श्वभागातून येत होते. धुपाचा मंद सुगंध व हलकासा धूर सर्व खोलीत पसरलेला होता. आत प्रवेश करताच सुभाष एक क्षण थबकला त्यापाठोपाठ विसू व मामांनाही थांबणे भाग पडले. बाहेरच्या उजेडातून आत आल्यावर डोळे अंधाराला सरावल्यावर त्याने उजवीकडे बघताच त्याला निरंजन स्वामी एका चौथऱ्यावर पद्मासनांत बसलेले दिसले. छाती पर्यंत रुळणारी पांढरी शुभ्र दाढी, उभट धीरगंभीर चेहरा, चेहऱ्यावर तपस्येचे अद्वैत तेज व प्रेमळ नजर ह्यांनी एका क्षणांत सुभाषच्या अंतर्मनाचा पगडा घेतला.


"बसा" स्वामींच्या पट्टशिष्याने स्वामींसमोर जमीनीवर अंथरलेल्या चटई कडे निर्देश केला.
तिघेही आसनस्थ होताच सुभाषने मानेनेच वंदन करून स्वामींना अभिवादन केले. "काय म्हणतो मुलगा तुमचा ? ताप उतरला का ?" सुभाष बुचकळ्यांत पडलेला बघून हसून ते पुढे म्हणाले,
"जादू टोणा काही नाही, गजानन रावांनी माझ्या शिष्याला सर्व हकीकत सांगितली म्हणून कळली,"  मामांकडे बघत ते बोलले.
"आपल्या वडिलांबद्दल मी ऐकले होते, आयुर्वेदाचार्य राजाभाऊ वैद्यांचे कार्य म्हणजे ह्या मानव जातीवर अनंत उपकार आहेत." सुभाषला आपल्या वडिलांबद्दल अभिमान वाटला.  
थोडक्यात सुभाषने त्यांना घडत असलेला प्रकार सांगितला.
"ये बाळ, असा माझ्या जवळ येऊन बस !" चौथऱ्यावर हात दर्शवत त्यांनी विसूला जवळ बोलावले. विसू थोडा अडखळत व बाबांच्याकडे बघत संकोचाने स्वामींच्या शेजारी जाऊन बसला.
"गजानन राव, सुभाष वाईट वाटू देऊ नका, परंतू मला फक्त ह्याच्याशीच बोलायचे आहे !"
सुभाष अनिच्छेने उठला. दारापर्यंत जाऊन तो मागे फिरताच स्वामी बोलले, "काळजी करू नको सुभाष, ह्या मुलाचे मी भले नाही करू शकलो तरी नुकसान नाही होऊ देणार !" त्यांनी मारलेली एकेरी हाक व त्यांच्या शब्दांतला विश्वास सुभाषला धीर देऊन गेला व एका क्षणांत वळून सुभाष खोलीबाहेर पडला.
************************************
बयाच वेळाने म्हणजे जवळपास दिडतासा नंतर स्वामींच्या पट्टशीष्याने दोघांना स्वामी बोलवत असल्याचे सांगितले. अधीरतेने सुभाषने आत प्रवेश केला. विसूला शेजारी बसवून स्वामी त्याच्या खांद्यावर हात ठेवत असलेले बघून सुभाषचा जीव भांड्यात पडला. जरासे स्मित हास्य करीत स्वामींनी दोघांना बसायची खूण केली.
प्रश्नार्थक नजरेने बघणाऱ्या सुभाषला स्वामी हसत म्हणाले, "काय हे सुभाष, ह्या मुलाला कसलाही त्रास नसून बिचाऱ्याला तुम्ही आजारी ठरवलात..... ह्याला काहीही झालेले नाही, जा बाळ ह्या काकांबरोबर जाऊन आमच्या मठातले ससे बघून ये !" पटकन विसू चौथऱ्यावर उठून स्वामींच्या शिष्याबरोबर गेला.
"सुभाष खरोखर ह्याला काहीही झालेले नाही. हवे तर हे एक लहान मुलांचे स्वप्नरंजन समज.... हा जसं जसा मोठा होत जाईल त्याची ही व्याधी कमी होईल.... मात्र मला ह्याच्या आजीला भेटण्याची आवश्यकता वाटते. त्यांना मठांत येता येण्यासारखे असल्यास कोणाच्या तरी सोबतीने पाठवून दे मला जरा त्यांच्याशीही काही बोलावयाचे आहे."
"पण स्वामी; दोन वेळा रात्री तो झाडाजवळ झोपायला गेला !"
"सुभाष, लहान मुलांच्या मनांचे खेळ आहेत ते सर्व तू काळजी करू नकोस" स्वामींनी आश्वासक शब्दांत त्याला सांगितले.
सुभाष व गजाननराव जागेवरून उठले. नकळत सुभाषने स्वामींच्या चरणांना स्पर्श करून त्यांना वंदन केले. "शतायुषी भव!" स्वामींचा आशीर्वाद घेत ते परत जाण्यास निघाले.
"विसू, काय विचारले बाळ त्यांनी ?" मामांनी विसूला प्रश्न केला.
"ते माझ्या मित्राचे मित्र आहेत... म्हणजे जे वडाचे झाड आपल्या क्वॉर्टरच्या बाहेर आहे ना; तसेच एक झाड त्यांच्या मठाजवळही आहे व ते झाडही स्वामींशी बोलते". विसूने भाबडे पणाने सांगितले ! "बाबा, ते आपले झाड आहे ना, तेही स्वामींशी बोलू शकेल असे स्वामी बोलले !"
"अजून काय विचारले ?" सुभाषने अधीरतेने विचारले.....
"मला नाही आठवत; मला हळूहळू आवाजात ते काहीतरी विचारत होते व मला झोप आली"


घरी येताच वसुधाने उत्सुकतेने काय घडले ते विचारले. "काहीच समस्या नाही असे स्वामी म्हणतात,  पण त्यांना आईला एकदा भेटण्याची इच्छा आहे." 
"तसे का ?" " त्यांनाच ठाऊक !...  असं कर, तुम्ही दोघी उद्या सकाळी जाऊन या"
"माझ्या ऐवजी मामी गेल्या तर ?" वसुधाने चाचरत विचारले "तर..... अख्ख्या गावाला कळेल !" सुभाष हसत बोलला."".....आणी तुलाही काही प्रश्न असल्यास त्याही शंकांचे निरसन करूनच ये !"
***************************
सायंकाळी मात्र वसुधाने सुभाष व विसूबरोबर अंकोलीकरांनी सुचवलेल्या बालमानसोपचार तज्ज्ञाकडे जाण्याचे ठरवले. अंकोलीकर साहेब स्वतः बरोबर आले होते. सुभाषला त्यांनी लहान भावा प्रमाणे वागवीत.


डॉ. पवित्र बाहेकर एक तरूण व होतकरू बालमानसोपचार तज्ज्ञ म्हणून ह्या गांवात आला तेंव्हा बयाच जणांना त्याचे कार्य व छोट्या गांवात अशी सेवा देण्याचे कारण कळलेच नव्हते. शाळांमधून शिक्षक वर्गाला मार्गदर्शन करणारा हा तरूण तसे पाहता गांवात कुतूहलाचा विषय होता. सुभाषला त्याबद्दल ऐकीव माहिती होती परंतू तो अंकोलीकर वहिनींचा भाचा असल्याचे प्रथमच माहीत झाले.
त्या जागेला दवाखाना म्हणावे का ह्या विचारांतच सुभाषने अंकोलीकरांच्या मागोमाग त्या खोलीत प्रवेश केला. घरातल्या दिवाणखान्याच्या बाजूच्या अभ्यासिकेत नीटनेटक्या खुर्च्या, दिवाण मांडून बैठक केली होती. टेबल किंवा रूग्णाला झोपवायला जागा वगैरे गोष्टींना तेथे स्थान देण्यात न आल्याने अनौपचारिक वातावरण निर्मिती होती.


एका कोपऱ्यात लहान मुलांसाठी वेगवेगळी खेळणी ठेवण्यात आलेली होती. डॉ. पवित्र साध्या व घरच्याच कपड्यांमध्ये ह्या मंडळींसाठी थांबलेला होता. सुहास्य वदनाने त्याने सर्वांचे स्वागत करीत त्यांना बसायला सांगितले. विसूचे लक्ष सारखे कोपऱ्यात ठेवलेल्या विविध खेळांकडे जात असल्याचे पाहून त्याने विसूला हवी तितकी खेळणी खेळायला काढून घ्यायला सांगितले. विसू खेळण्याशी खेळत असताना औपचारिक चौकश्या पूर्ण करीत त्याने सुभाष व वसुधाची छोटीसी मुलाखतच घेतली.
विसूला नेमके काय होत आहे हे न कळल्याने भांबावलेल्या त्या पालकांची विस्कळित कहाणी... अधून मधून छोटे पण महत्त्वाचे प्रश्न विचारत... त्याने पूर्ण ऐकली.
स्वामींकडे जाऊन आल्याची गोष्ट वगळता सुभाष व वसुधाने सर्वच गोष्टींचा त्यात समावेश केलेला होता. त्यांच्या कडून प्राथमिक माहिती मिळालेली असल्याची खात्री पटताच बोलत बोलत डॉ. पवित्र जागेवरून उठला. खिडक्यांवरील पडदे खेचत त्याने बाहेरचा प्रकाश आत येणार नाही ह्याची काळजी घेतली. जागेवर बसण्यापूर्वी कोपऱ्यातला टेपरेकॉर्डरवर मंद स्वर असलेल्या विणा वादनाची ध्वनिफीत त्याने लावली. "आपणांस आता माझी रजा घ्यावी लागेल. मी विश्वासला काही प्रश्न तो एकटा असताना विचारणार आहे !" बोलत असताना त्याने काडेपेटीने चार पाच सुगंधी उदबत्त्यांचा जुडगा पेटवला. "साधारण तास दीड तास लागेल तोवर आपण कुठे फिरून आलात तरी चालेल".
अंकोलीकर साहेब व वसुधा उठण्याच्या आधीच सुभाष शांतपणे जागेवरून उठून दाराकडे चालू लागला. त्याच्या पाठोपाठ बुचकळ्यांत पडलेली वसुधा कोपऱ्यात बसून खेळण्याशी खेळणाऱ्या विसूकडे बघत बाहेर पडली.
"अहो, विसूला एकटे सोडायचे ?" "वसू, ते विसूचे भले नाही करू शकले तरी नुकसान नाही होऊ देणार !" ह्या वाक्यावर ती आश्चर्याने सुभाषच्या तोंडाकडेच बघत राहिली.
*********************************


विश्वास वैद्य हा आपला विद्यार्थी अचानक बदलला कसा ह्याचे नवल त्र्यंबक मास्तरांना वाटायला लागले. तो आपल्याला राघू पेक्षा जास्त आवडायला का लागला ह्याचे कारण त्यांना शोधून सापडले नव्हते. राघूच्याही तल्लख बालबुद्धीला विसूचा हेवा वाटायला लागला होता.


आजी हल्ली विसूला केलेल्या चुकांबद्दल शिक्षाही करायला लागलेली होती !


विसूशी खेळायला वडाच्या झाडाखाली बरीच बाळगोपाळ मंडळी जमत होती !


सुभाष त्याच्या शाळेचा अभ्यास घ्यायला लागलेला बघून वसुधाला नवल वाटे !


आशूला प्रयत्न करूनही विसूच्या चुगल्या करता येत नव्हत्या !


आशू व विसू कडे घरात बसून खेळायचे बरेच खेळ जमा होत होते !


विसूच्या भोवतालचा वडाचा विळखा सैल झालेला होता !
********************************
क्रिकेट खेळता खेळता राघूने मारलेला चेंडू आणायला विसू वडाच्या झाडापाशी गेला..... वडाला प्रदिक्षणा घालत त्याने चेंडू हुडकून काढला...... चेंडू फेकल्यावर वडाकडे बघत तो म्हणाला...


"बघ, तू उगीचच माझी काळजी करायचास !"


                                         समाप्त !!!