माझ्या क्षितिजाला - अदिती

अदिती ने काढलेले हे एक शब्दचित्र आहे. 
उन्हाळ्याचे, उष्ण काळाचे एक चित्र.  या चित्रात भावनांचे, आठवणींचे रंग टाकून
शब्दांना अदितीने अष्टाक्षरीमध्ये चपखल बांधलेय.  अष्टाक्षरीमुळे कविता म्हणायला,
गुणगुणायलाच हो, वाचकाला संधी मिळते आणि कविता वाचनाची मजा द्विगुणित होते.

केशराच्या
सोनरंगी
भारलेली सांजवेळ
ताणलेल्या दिवसांचा
उष्ण उष्ण
ऋतूखेळ

सांजवेळ ही नेहमी भारलेलीच असते.  कधी वाट पाहण्याची, कधी लवकर
घरी परतण्याची, दिवसाचा शीण एका क्षणात संपवण्याची जागा गाठण्याची.  सांजवेळी साठी
भारलेली हे विशेषण अगदी खरे आहे आणि मनाला जाऊन भीडते.  ताणलेले दिवस आणि उष्ण
रूतूखेळ हा शब्दप्रयोग देखील आवडला.  हा ऋतूंचा खेळ आहे या दृष्टिकोनातून ऋतूंकडे
पाहिले तर उन्हाळादेखील त्यातला एक डाव आहे याची आठवण राहते आणि हिवाळा, पावसाळा
येणार आहेतच याची जाणीव पण राहते.

अर्धी मुर्धी पानगळ
अर्धी थंडी पहाटेला
उष्ण
घामट रात्रीत
चांदण्यांची चंद्रकळा

"या गर्मीयों की रात को आंगन मे लेट कर, ठंडी सफेद चादरो..." हे गुलजार
चे गाणे आठवले.  "चांदण्यांची चंद्रकला" असे लिहिले असतेस तरीही चालले असते. 
त्यामुळे एक नवा अर्थ पण मिळाला असता.  "चांदण्यांची चंद्रकळा" हा शब्दप्रयोग खूप
आवडला.

माध्यान्हीचा किती थाट
सूर्यनारायण
दिवा
भातुकलीची पंगत
पेरू डाळिंबांचा मेवा

भातुकलीच्या पंगतीने लहानपण आठवून दिले.  आई गूळ फुटाणे द्यायची आणि
आम्ही त्या गूळ फुटाण्याचे, सगळे काही करींत असू.  सूर्यनारायणाच्या दिव्याखाली
जायला मज्जाव असायचा.  मोठेपणी आता विचारांचेच गूळ फुटाणे घेऊन स्वप्नांचे खेळ खेळत
बसतो.

किलबिल पाखरांची
चोहीकडे लगबग
कोणी दिसेना
तरीही
कसे सूर जागोजाग

कोणी दिसेना तरीही कसे सूर जागोजाग, या ओळी खूप आवडल्या. 

आम्रमोहराची ऊर्मी
धुंद दर्वळ मातला
लाल
पोपटी पानांनी
देहविस्तार माखला

आम्रमोहर हा या ऋतूतला विशेष सोहळा.  लाल पोपटी पानांचा देहविस्तार खूप
सुरेख चित्र डोळ्यासमोर दाखवून गेला.  त्या पोपटी पानांमधून लाल चुटुक पोपटांच्या
चोची पण आठवल्या.  माखला या शब्दाला मस्तीचे अंग आहे.  माखण्यात एक आनंद आहे. 
पोपटी पानांनी माखणे हे शब्द खूप आवडले बरं अदिती.

साऱ्या क्षितिजाच्या पटी
दिवसांची
चित्रकारी
माझ्या क्षितिजाला तुझ्या
आठवांची
अब्दागिरी

या सगळ्या शब्द चित्रात हे कडवे म्हणजे चित्राची चौकट आहे.  सगळे चित्र
एक करून हे सगळं पाहून माझ्या क्षितिजावर तुझ्या आठवणींची अब्दागिरी तयार होते हे
खास.  तुझ्या आठवणींशी कुठेतरी दिवसाच्या चित्रकारीची तुलना आहे का? असेलही
कदाचित. 

खरे तर काही काही ऋतू काही काही काळ आपल्याला काही खास आठवणी आठवायला
लावतात.

अदिती तुझी कविता वाचून, म्हणजे गाऊन आनंद झाला.  हे लिहिले ते रसग्रहण
नव्हे माझे आस्वाद घेणे आहे.  कविता वाचताना माझ्या मनात आलेले विचार तुझ्या मूळ
विचारांशी मेळ खातीलच असे नाही.  तीच तर खरी मजा आहे.  प्रत्येक जण स्वतःच्या
चष्म्यानेच साहित्य वाचतो.  त्याला त्याच्या पूर्वायुष्यातल्या छटा दिसतात, वेगळीच
अनुभूती होते.

सौमित्र