अंधार (२)

देवीने मुंबईला जाऊ नये, म्हणजे नाटक-सिनेमासाठी जाऊ नये असे तीच्या आई-वडिलाचे म्हणणे होते. अभिनयाची आवड इथे घरी राहूनही कशी जोपासता येईल, एक जाहिरात इथे राहूनच कशी मिळाली, एकट्या मुलीने असे या नादी लागून बाहेर एकटीने राहणे किती धोक्याचे आहे वगरे सर्व सांगून झाले. त्यांना चाकोरी बाहेरचे असले काहीतरी असे सहज अंगवळणी पडणारे नव्हते शिवाय मुलीची काळजीही होतीच.


देवी आपल्या निश्चयावर ठाम होती. गेल्या काही दिवसात तिने बराच विचार आणि काही नियोजनही केले होते. स्वतःच्या अनेक भूमिकांमधील प्रकाशचित्रांचा आकर्षक संच, आपली थोडक्यात माहिती, आतापर्यंत केलेल्या भूमिका, मिळालेली पारितोषिके वगरेची एक छोटी पुस्तिकाच तिने तयार केली होती. दुसरीकडे तयारी सुरू होती ती मालिकांमध्ये प्रवेश मिळवण्याची. अनेक निर्मीतीसंस्थांचे पत्ते, दिग्दर्शकांचे नांव-पत्ते, ख्यातनाम अभिनेत्यांचे पत्ते, येऊ घातलेल्या नव्या मालिकांची माहिती मिळवणे वगरे जोरात चालले होते. मालिकांमध्येच प्रयत्न करायचा हे देवीने ठरवले होते त्याला कारणही होते. नीट अभ्यास केल्यावर देवीने असे ठरवले होते. नाटक हे भूमिकेचे समाधान देत असले त्यात बांधिलकी फार. अनेक तालमी, मग नाटक येणार, ते यशस्वी झाले तर बरे, शिवाय रोज इकडून तिकडे फिरा, झालंच तर दौरे असा व्याप. इतके असूनही गेल्या काही वर्षात केवळ नाटकातून एकदम पुढे येऊन लोकप्रियतेच्या शिखरावर गेलेली अभिनेत्री तिला आठवत नव्हती. सिनेमा विषयी बोलायचे तर मराठीमध्ये असे कितीसे निघतात? शिवाय त्यांना प्रेक्षकवर्ग किती आहे? हिंदी चे क्षेत्र अफाट पण त्या मोहमयी दुनियेविषयी तिला आकर्षण म्हणावे इतके वाटत नव्हते. मुळात आपण नाव कमावायचे, लोकप्रिय व्हायचे पण ते एक सशक्त अभिनेत्री म्हणून. बिन्धास्त भूमिका करून वा वाटेल तिथे तडजोड करून नाही हे तिने ठरवले होते. उगाच सिनेमात जायचे म्हणून कुणा लांडग्याच्या मागे लागण्याइतकी ती उथळ नव्हती.


हा सर्व विचार करता तिला मालिका हे माध्यम उत्तम वाटले. हल्ली अनेक मराठी वाहिन्या आहेत, त्या लोकप्रिय आहेत, बरे कार्यक्रम दाखवतात, विशेषतः मालिका भरपूर ओतत असतात व मालिकांना प्रेक्षकही उदंड असतात. सगळ्या मालिका काही मोठ्या दर्जेदार नसतात पण सवयीने रोज पाहणारे प्रेक्षक वेळ झाली की दूरदर्शन संचासमोर येऊन बसतात हे खरे. एका मालिकेद्वारे एखादी अभिनेत्री लाखो लोकांसमोर पोचू शकते व पटकन लोकप्रियही होऊ शकते. हल्ली मालिकांना चलती आहे, इथे अनेक ओळखीही होतील ज्यायोगे पुढे चित्रपटात विनासायास जात येईल असा सर्व विचार करून देवीने मालिकांमध्ये कारकीर्द करायचा निश्चय केला.


देवी मुंबईत हजर झाली. खरेतर देवीचे सख्खे काका पार्ल्यात रहात होते, त्यांची मुलगी साधारण देवीच्याच वयाची पण तरीही देवीने स्वतंत्र राहायचे ठरवले. उगाच आपला लोकाला आणि लोकाचा आपल्याला त्रास नको. नातेवाईकांच्या घरी राहायचे तर पुन्हा अभिनेत्री होणे बरे की वाईट यावर ऐकायला लागणारच, तोच तो उपदेश त्यापेक्षा स्वतंत्र राहिलेले बरे. देवीने धडपड करून अंधेरीत चार बंगला भागात एका बाईकडे पीजी म्हणून जागा मिळवली होती. ३ बीएचके च्या प्रशस्त फ्लॅट मध्ये देसाई बाई तशा एकट्याच रहात होत्या. पतीचे अचानक निधन आणी नोकरीनिमित्त मुलगाही बाहेर तेंव्हा त्यांनी चांगल्या घरातल्या व नोकरीनिमित्त मुंबईत येणाऱ्या एक-दोन मुली पीजी म्हणून ठेवायची जाहिरात दिली आणि त्यांना देवी व मधुरा या दोघीजणी अगदी मनासारख्या मुली मिळाल्या. मधुरा संगणक क्षेत्रातली, मूळची नाशिकची पण आता नोकरीमुळे मुंबईत आली होती.


देवीचे रोज प्रयत्न सुरू झाले. अनेक मंडळी नाटकाशीही संबंधीत असतात तेंव्हा त्यांना गाठायला नाट्यगृहांच्या चकरा सुरू झाल्या. कुणाकडून एखाद्या मालिकेची माहिती मिळाली की शूटिंगच्यावेळी लोकेशनवर जाउ लागली. मग एकदा तिने विक्रांतांची भेट घेतली व त्यांना आपली ओळख दिली. त्यांनी तोंडभर हसून ओळख दिली, तिचा निर्णय ऐकून बरे वाटल्याचे सांगितले. मात्र भूमिका मिळवून देण्याच्या दृष्टीने काही बात केली नाही. लक्षात ठेवतो, प्रयत्न करतो, हल्ली इथेही खूप कलावंत आहेत, अनेक गुणी कलावंत आहेत वगरे बरेच काही सांगितले. देवीने मोठ्या आशेने करुणा भट यांचीही भेट मिळवली, आज त्यांच्या दोन मालिका सुरू होत्या एक तर बरीच लोकप्रिय झाली होती. करुणाबाइंना एकूण देवी आवडली पण सध्यातरी त्यांच्या मालिकेत तिला साजेशी भूमिका नव्याने निर्माण होणार नव्हती. त्यांनी शिफारसपात्र देऊन तिला कोल्हटकरांकडे जायला सांगितले. त्यांची एक मालिका येऊ घातली होती. देवीने त्यांची भेट घेतली. एकूण कथानक बरे होते, पण भूमिका तशी दुय्यमच होती. कोल्हटकरांनी देवीला समजावून सांगितले की इथे अभिनय आधी लोकांना एक ओळखीचा चेहरा लागतो. अशा चार दोन भूमिका करशील तेंव्हा तुला मोठ्या भूमिकेसाठी प्रयत्न करता येईल.


बऱ्याच विचारानंतर देवीने ती भूमिका स्वीकाराचा निर्णय घेतला. उगाच खाईन तर तुपाशी असा हट्ट धरण्यात अर्थ नव्हता. निदान एकदा काम सुरू झाले तर चार जणांशी ओळख होईल, काही इतर मालिकांमधले लोक भेटतील, किमान आपल्या असलेल्या भूमिकेत आपण छाप पाडू शकलो तर उद्या मोठा रोलही मिळेल. तिने भूमिका स्वीकारली खरी पण ती तितकीशी समाधानी नव्हती. मात्र तरीही तिने आपल्या कामावर परिणाम होऊ न देता ती भूमिका उत्तम सादर करायचे ठरवले. एकदा जर नैराश्य आले तर सगळे संपले. तेंव्हा लहान का असेना आपल्याला इथे आल्यापासून अवघ्या दोन महिन्यात भूमिका मिळाली हेही नसे थोडके अशी समजूत तिने स्वतःच घालून घेतली.


(क्रमशः)