अंधार(.)

देवी तरंगत बाहेर पडली ती सरळ बरिस्ता मध्ये शिरली आणि गरमागरम कापुचिनो चे घोट घेत तिने घरी दूरध्वनी केला. आईशी कधी एकदा बोलते आणि कधी ही बातमी सांगते असे तिला झाले होते. या वेळेला तिचा दूरध्वनी म्हणजे आईला जरा आश्चर्यच वाटले, सहसा देवी रात्री निवांतपणे बोलायची. तिने जरा काळजीनेच विचारले की बरी आहेस ना? हसतच देवी उत्तरली, आई मी आज फ़ार फ़ार आनंदात आहे , कधी एकदा तुला भेटीन अस झालाय. आई, आज माझं स्वप्न साकार होताय. ज्याच्यासाठी इतकी दूर धावत आले ते अखेर साध्य होताय, मला एका मोठ्या नावाच्या जबरदस्त मालिकेत नायिकेची भूमिका मिळाली आहे, अगदी मनासारखी व्यक्तिरेखा असलेली, नुसती गुळगुळीत नाही. अग सगळे दिग्दर्शक काय, लेखक काय वा बाकीचे अभिनेते काय, सगळे अगदी टॉप चे कलाकार आहेत. वासंतीताईंनाही क्षणभर बरे वाटले, त्याही लेकीला भेटायला उतावळ्या होत्या.


नाही, मनात असूनही आता लगेच येणं शक्यच नाही ग आई, अग या शनीवारी अजिंक्य आर्टस तर्फे एक छोटे संमेलन ठरवले आहे. यात सगळे कलाकार एकत्र येतील, एकमेकांशी ओळखी होतील. बाकी बरेचसे एकमेकांना ओळखतात पण मी नवीनच आहे. मला खूप तयारी करून दाखवायची आहे. मी नवखी आहे मला ही भूमिका जमेल किंवा नाही अशी शंका कुणाच्या मनातही येणार नाही असे व्यक्तिमत्त्व प्रदर्शित करायचे आहे, सर्वांना जिंकून घ्यायचे आहे. आणि लगेच पुढच्या आठवड्यात करारावर सह्या होणार आहेत. मग हे सगळे पार पडले की एकदमच पेढे घेऊन येईन. बाबांनाही सांग, मी दादाला फोन करतेच आहे.


आता देवीला थांबायला वेळच नव्हता. पार्टीसाठी नवा ड्रेस आताच घेऊन टाकायची घाई झाली होती. मग काकांकडे जाऊन त्यांना ही बातमी द्यायची होती व मुख्य म्हणजे डॉ. शर्मिला चा भक्कम गृहपाठ करायचा होता. डॉक्टर मंडळींना इस्पितळात काय जबाबदारी असते, काय अधिकार असतात, ते रूग्णांशी त्यांच्या नातेवाईकांशी कसे वागतात, अधिकारी वर्ग व विश्वस्त मंडळी त्यांना काय वागणूक देतात हे सगळे समजून घ्यायचे होते. नव्या मालिकेची नायिका ही त्या संमेलनाची केंद्रबिंदू ठरली पाहिजे हाच एक ध्यास होता.


दुसरीकडे मनातल्या मनात वेळापत्रकाची आखणी चालली होती. ही नवी मालिका म्हणजे आव्हान तर खरे, इथे खूप मेहनत घ्यावी लागणार व पर्यायाने वेळही द्यावा लागणार. हे करत असताना हाती घेतलेल्या मालिकांकडे दुर्लक्ष होता कामा नये, एखाददा जरी जाता आलं नाही तरी मोठा गहजब होतो. या लहान विश्वात नाव डळमळीत व्हायला वेळ लागत नाही. शिवाय उत्कर्ष सहन न होऊन पाडायला टपलेले काही कमी नसतात. आपल्याला ही एक मालिका घेऊन थांबायचे नाही तर लवकरात लवकर एक आघाडीची अभिनेत्री म्हणून नावलौकिक मिळवायचा आहे. असो. जया अंगी मोठेपण तया यातना कठिण. चला देवयानीबाई, कामाला लागा.


उद्या शनिवार! देवी दिवस मोजत होती. हस्तसंच गुणगुणायला लागला. देवीने क्रमांक निरखून पाहिला, 'अजिंक्य आर्टस' चा होता. लगबगीने देवीने संपर्क जुळवला. हॅलो, देवी बोलत्ये.. नमस्कार मॅडम, मी विश्वनाथ देसाई बोलतोय. अजिंक्य चा प्रॉडक्शन मॅनेजर. हो, ओळखले, बोला. देवीचा अधीर आवाज. क्षणभर शांतता. मग देसाईंचा जरा गंभीर आवाज. माफ करा मॅडम, पण जरा प्रॉब्लेम झालाय. काय? उद्याचा कार्यक्रम.. देवीने विचारायच्या आत देसाई म्हणाले, सॉरी मॅडम एक वाईट बातमी आहे. देवीच्या छातीत धस्स झाले. देसाई म्हणाले सगळे फोनवर नाही सांगत जरा येऊन जा.


देवीला काही सुचेनासे झाले होते. देवीने टॅक्सी पकडली व ती थेट माहीमला आली. मॅडम तर नव्हत्या, त्यांना काही कामासाठी बाहेरगावी जावे लागले होते असे देसाई म्हणाले. मग देसाईंनी मिड डे चा आदल्या दिवशीचा अंक देवीला दाखवला, व विचारले ही बातमी तुम्ही वाचली असेल ना मॅडम. - " मंत्रिमंडळाची वीजटंचाईवर खास बैठक. ग्रामीण आमदारांचा वाढता दबाव, महाराष्ट्र अंधारात तर मुंबईत झगमगाट का? निरुत्तर मुख्यमंत्र्यांचे बेस्ट ला आदेश. आता मुंबईतही बचत सक्तीची. सायंकाळी ६ चा चित्रपट रद्द आणो ७ ते १० केबल प्रक्षेपण बंद. वीजस्थिती समाधानकारक होईपर्यंत हे निर्बंध लागू.


मॅडम, काल संध्याकाळीच फ़ायनान्सर बेहेरानी व तनेजा मॅडमशी बोलले. जर मुख्य वेळ मालिकांना उपलब्ध नसेल तर बघणार कोण आणि मग अशा परिस्थितीत मालिकांमध्ये पैसा घालणे म्हणजे हात दाखवून अवलक्षण. त्यांनी साफ नकार दिलाय. सॉरी मॅडम, पण नाईलाजाने ही मालिका सध्यातरी बासनात गुंडाळून ठेवण्यापलीकडे काही रस्ताच नाही. देवीला सगळे जग प्रचंड वेगाने गोल गोल फिरत असल्याचा भास झाला. पुढचे शब्दच ऐकू येत नव्हते.


तीच्या डोळ्यापुढे खोल, अथांग अंधार पसरला होता, न संपणारा.