अंधार (३)

देवी मुळातच हुशार. आपल्या साधारण असलेल्या भूमिकेतही तीने बऱ्यापैकी प्रभव पाडला होता. तीची आवड, तीचा उत्साह, तीचा प्रत्येक भागात जीव ओतून काम करण्याचा प्रयत्न यामुळे ती त्या चमूत नाव कमावत होती. मालिका प्रदर्शित झाली. संध्याकाळी ८ ची वेळ मिळाली होती,जाहिरातही त्या वाहिनीने भरपूर केली होती. पण नेमके नशिब आड आले. दुसऱ्या मराठी वाहिनीवरील ७.३० ची मालिका प्रेक्षणांक (टीआरपी)उंचावल्याने अचानक ८ लाच आली, इकडे प्रख्यात हिंदी वाहिन्यांपैकी एकीवर त्याच वेळेस रजतपटावरील चेहेरे ठासून भरलेली एक 'ककार' मालिका सुरू झाली तर दुसऱ्या हिंदी वाहिनीवर ९ वाजता सादर होणारी व भरगच्च प्रायोजक लाभलेली एक स्पर्धात्मक मालिका ८ वाजता केली गेली. परिणामी बरे कथानक असूनही देवी ची मालिका काहिशी झाकोळली गेली.


हे जगच वेगळे आहे. एखादा खेळाडू शतकाच्या जवळ येउन संध्याकाळी नाबाद रहातो तो दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी जोरदार फ़लंदाजी करित आपले शतक पुरे करून नवा विक्रम रचायची स्वप्ने पहात झोपतो; दुसऱ्या दिवशी पाउस पडतो व उरलेला सामना सोडून द्यावा लागतो. त्याचा वा संघाचा दोष नसताना विनाकारण जवळ आलेले यश, लोकप्रियता हुलकावणी देउन जाते. देवीचे नेमके तसेच झाले. मालिका काही कारण नसताना मागे पडली. मात्र याच वेळेला देवीला आणखी दोन भूमिका मिळाल्या. एका मलिकेत भ्रष्ट सरकारी वकिलाची तर दुसऱ्या मालिकेत मोठ्या व्यावसायीकाच्या गर्विष्ठ पत्निची. पुन्हा एकदा देवी उत्साहाने कामाला लागली.


छोटा काश्मिरचा परिसर आज अचानक फ़ुलुन गेला होता. तशी इथे अनेक चित्रिकरणे नित्यनेमाने होत असतात, पण आज अचानक तीन चार कार्यक्रम होते. एक जाहिरात, एक 'क' दर्जाचा हिंदी चित्रपट तर दोन मराठी मालिका. आज देवीचे काम होते. आपले संवाद पाठ करुन तयार होउन देवी चित्रिकरणाला सज्ज होती. त्या कृत्रिम तलावाकाठच्या कृत्रिम बंगल्यात चित्रिकरण सुरू झाले. नवऱ्याचा 'बिझिनेस' हा आपल्या बापाच्या पैशावर उभा राहिला आहे ही जाणीव असणारी व प्रसंगी नवऱ्याला ती करून देणारी पत्नी देवी साकारत होती. त्या प्रसंगात बंगल्याच्या समोरील हिरवळीवर दोघे सकाळचा चहा घेत आहेत. अचानक काहीतरी बिनसते आणि शब्दाला शब्द वाढतो, पत्नी संतप्त होउन पावले आपटीत निघून जाते असा प्रसंग होता. चित्रिकरण सुरु झाले. वाद भडकताच जळजळीत कटाक्ष टाकीत चहाचा ट्रे ढकलून देत एक शब्दही न बोलता देवी निघून जाते आणि कपातला चहा अंगावर सांडेल म्हणून नवरा दचकून मागे होतो. खरेतर तो दचकतो तो देवीच्या त्या कटाक्षाने. अशा रागाने बघत जाते, की एक शब्दही न बोलता तिचा तिरस्कार त्याला समजतो. शॉट ओके होतो, सगळे खुष! सगळी कलाकार मंडळी जरा निवांत होउन सावलीत येउन बसतात तर तांत्रिक चमू पुढचे दृश्य साकार करायच्या तयारीला लागतो. कॅमेरा, ट्रॉली, दिवे, परावर्तक वगरेची हलवाहलव सुरू होते. देवी आपल्या आजच्या कामावर विलक्षण खुष असते. सहकारीची तिचे कौतुक करत असतात तर पतिची भूमिका  साकारणारा अभिनेता तसा मुरलेला व बऱ्यापैकी नाव असूनही तिला खास पसंतीची दाद देतो.


"मॅडम, जरा आमच्या मॅडमनी तुम्हाला भेटा असा निरोप दिलाय, फ़ोन करा आणि ठरवा."देवीच्या हातात कार्ड देत तो मनुष्य निघून गेला. देवी फ़क्त त्या कार्डाकडे अवाक होउन बघत राहीली. वर लाल शाइत भ्रमण्ध्वनीक्रमांकही हस्ताक्षरात लिहिलेला होता. 'अजिंक्य आर्टस' - राणी जोगळेकर. मराठी चित्रपट सृष्टी व मालिकांमधील एक मोठे नाव. आतापर्यंत अनेक चित्रपट त्यातले काही लोकप्रिय तर काही पारितोषिक विजेते. मालिकात तर काय, एक संपायच्या आत दुसरी हजर व त्याही एकापेक्षा एक लोकप्रिय. देवीचा आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता.


माहिमला असलेल्या अजिंक्य आर्ट्स च्या कचेरीत देवी प्रतिक्षा करत होती. नाही म्हंटल तरी खूप दडपण आल होत. आपल्याला कशाला बोलावल असेल? काही खास भूमिका असेल का? की अशीच आपली नायिकेच्या आजुबाजुला फिरणाऱ्या पात्राची किंवा मालिका लांबवायला निर्माण केलेल्या उप-पात्राची? तोंडभर हसत मॅडम आत शिरल्या, सेवकवर्ग लगबगीने सरसावला, आणि आपल्या केबीन मध्ये शिरताना राणी मॅडमनी देवीला खुणेनेच आत येण्यास सांगितले. देवी संकोचून मॅडमच्या पुढे उभी होती, काय बोलावे समजत नव्हते. खणातून एक बाड काढत मॅडम हसतच म्हणाल्या, देवी बस अग आरामात, हे वाचायला जरा वेळ लागेल. मॅडमनी बाड देवीकडे दिले. मी आलेच हं पाच मिनिटात, वाच तू असे म्हणत मॅडम बाहेर गेल्या. देवीच्या हातात 'झुंज' नावाचे कथानक होते. एका नामांकित लेखकाची पटकथा होती. एका बड्या इस्पितळात सेवेच्या नावाखाली चालणारा भ्रष्टाचार, रुग्णांची होणारी फसवणूक, परवड व त्या संपूर्ण यंत्रणेशी लढा द्यायला निघालेली डॉ. शर्मिला. कथानक तर जबरदस्त होते. चाळता चाळता देवी गुंगून गेली होती ती दरवाज्याच्या आवाजाने भानावर आली. मॅडमनी आत शिरताच प्रश्न केला, "काय देवी, कशी वटते स्टोरी?" देवीचे उत्तर यायच्या आत दुसरा प्रश्न, "देवी तू 'डॉ. शर्मिला' च्या भूमिकेला न्याय देशील असे मला वाटते. तुझे काय मत आहे?" देवीचा आपल्या कानांवर विश्वास बसत नव्हता.


देवी तिथून बाहेर पडली ती जणु तरंगतच.


(क्रमशः)