अंधार (१)

देवी, ऊठ पाहू. नऊ वाजलेत आता कौतुक पुरे झाले. आता जरा आवर आणि ते पाकीट उघड. आज दहा दिवस होऊन गेले, तुझी नाटक आणि तालमी आणि समारंभ यात तू आत्यानं लंडनहून एवढे अर्ज नी माहितीपत्रके पाठवली आहेत ती पाहिली सुद्धा नाहीसा. लोकांची मूल बिचारी परदेशी शिक्षणाची दूरून स्वप्न पाहतात, इथे सगळे हात जोडून हजर आहे तर बघायला वेळ नाहीये. आता काय बोलणार? वासंतीताईंच्या तोंडाचा पट्टा चालू होता. देवीने फक्त कूस बदलली आणि ती स्वतःशीच हसत पुन्हा आपल्या विश्वात गेली. तिची रात्र अजून संपली नव्हती.


देवयानी गोडबोले. पुण्यातल्या एका सुखवस्तू घरातली धाकटी मुलगी. बी. कॉम. च्या शेवटल्या वर्षाला होती, शिक्षणाबरोबर वक्तृत्व अभिनय याची आवड असलेली देवयानी दिसायला सुंदरच नाही तर समोरच्याला प्रभावित करून टाकेल अशी होती. अगदी लाडावलेल्या मुलीने असावी तशी स्वतःचं खरं करणारी. वडील नावाजलेले कर सल्लागार. मोठा भाऊ शिकायला अहमदाबाद आय आय एम ला. देवयानीने बी कॉम नंतर लंडनला येऊन व्यवस्थापन शास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घ्यावं असा तिथे स्थायिक असलेल्या आत्याचा आग्रह तर चांगला जम बसलेल्या कर सल्लागाराच्या मुलीने पदवी नंतर कर विषयक काही अभ्यासक्रम पार पाडत एकीकडे आपला व्यवसाय सांभाळावा असे वडिलाचे म्हणणे.


देवीला काल जे काही घडले ते अजूनही स्वप्नच वाटत होते. काल पुणे आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेत तीच्या एकांकिकेला प्रथम पारितोषिक मिळाले होतेच पण तिला सर्वोत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक मिळाले होते. पारितोषिक समारंभाचे अध्यक्ष व प्रख्यात अभिनेते विक्रांत यांनी तिचे कौतुक केले. काल ती साऱ्या महाविद्यालयाची अनभिषिक्त सम्राज्ञी झाली होती. समारंभ संपला. मग समस्त कलावंत व प्रोत्साहनदाते यांना देवीची मेजवानी मिळाली. सगळा वेळ एकच विषय होता. एकांकिका, पारितोषिक आणि देवी. देवीच्या डोक्यात अजूनही विक्रांतांचे शब्द आंदोलत होते    " नाटक अनेकजण करतात. पण बहुतेक सगळे एक महाविद्यालयीन जीवनातील मजा वा लोकप्रियता मिळवण्याचा एक मार्ग म्हणून. पदवी घेतली की सगळे संपते. हे बरोबर नाही. खरे अभिनेते असाल, तर आतला कलावंत जगवा, जोपासा. त्याला गाडून टाकून त्याच्या थडग्यावर संसार थाटू नका"


इच्छा नसली तरी आईची टकळी थांबण्यासाठी देवीला उठणे भाग पडले. देवी चहा घ्यायला आली ती तिचा एस ४ हातात घेऊन आपल्या बक्षीस घेतानाच्या छबी न्याहाळतच. देवी, कौतुक पुरे आता. जरा जमीनीवर उतरा, संमेलने, एकांकिका स्पर्धा सगळी नाटकं झाली आता जरा आपल्या आयुष्याचा विचार करा. परीक्षा, पदवी आणि मग परदेशात उच्च शिक्षण. वासंतीताईंच्या भावाची दोन्ही मुले परदेशी असल्याने त्यांना आपल्या मुलांनी परदेशी जाणे आवश्यक वाटत होते. मोठ्या मुलाने अभियांत्रिकी पदवीनंतर एम एस मध्ये रस नसून आपल्याला व्यवस्थापन क्षेत्रात जायची इच्छा असल्याचे आणि एक दिवस बिझनेस इंडियात आपला परिचय एक यशस्वी सी इ ओ म्हणून छापून आलेला पाहायचे आपले स्वप्न असल्याचे सांगितले तेंव्हा वासंतीताइंची मुलांनी परदेशी जायची पहिली संधी गेली होती. आता सगळ्या आशा देवीवर. वडिलांची फारशी इच्छा नसतानाही त्यांनी तिला परदेशी पाठवायचा चंग बांधला होता.


देवीने 'कलासक्त' मध्ये प्रवेश केला आणि तिचे आईशी जणू शितयुद्ध सुरू झाले. वसंतराव म्हणजे तिचे बाबा, त्यांना हे फारसे पसंत होते असे नाही पण मोठ्या मुलांना दाबून ठेवाचे म्हटले तरी शक्य नाही तेंव्हा जरा कलाकलाने घेऊ, काही दिवसांनंतर वेड कमी होईल असा व्यवहारी विचार केला. 'कलासक्त' ही प्रायोगिक नाटके बसवणारी धडपडी मंडळी होती. अभिनयाच्या वेडाने झपाटलेली देवी आली खरी पण तिला लवकरच समजले की तिला हवी तशी अभिनय संधी व विशेषतः प्रसिद्धी, लोकप्रियता तिला इथे राहून कधीच मिळणार नाही.


अनपेक्षित धनलाभ व्हावा तशी देवीला खरे सराफांच्या दागिन्याची जाहिरात मिळाली आणि देवीला वाटले, मार्ग सापडला. जाहिरात करताना सान्निध्यात येणाऱ्या त्या क्षेत्रातल्या प्रत्येक व्यक्तीकडून ती जास्तीत जास्त बारकावे आणि या क्षेत्रात जर नाव मिळवायचं तर काय करावे लागेल ते समजून घ्यायचा प्रयत्न करीत होती. देवीला मॉडेलिंग मध्ये अजिबात रस नव्हता, तिला अभिनेत्री व्हायचं होतं. तिने ओळखले की सोपा मार्ग म्हंटला तर दूरदर्शन मालिका. आणि त्या करायच्या तर चंचुप्रवेशासाठी मुंबईचा रस्ता पकडणे भाग आहे.


घरी झालेल्या अकांडतांडवाला दाद न देता देवीने परीक्षा संपताच मुंबईला जाण्याचा निर्णय जाहीर केला.


(क्रमशः)