एक महाग दंतकथा-२

यापूर्वी वाचा  एक महाग दंतकथा-१
मला आता त्या दुखणाऱ्या दाताचे दुःख या किंमती ऐकून आपोआप कमी झाल्याचा भास होत होता. पण जर्मन सहकाऱ्यांनी आता माझ्या दाताचा प्रश्न धसास लावण्याचा चंग बांधला होता!! 


सासरेबुवांकडून आम्ही दोघे सुखरूप आणि 'सुदंत' परत आलो. आता मी गुपचूप बसून हा प्रश्न विसरायचं ठरवलं. पण सहकाऱ्यांना राहवेना. त्यांनी विमा कंपनीला फोन करून जर्मन भाषेत परिस्थिती समजावली आणि सल्ला मागितला. 'मरूदे तिकडे,आपलं काय जातंय?जिने विमा उतरवला ती कंपनी बघून घेईल.' अशी भूमिका न ठेवता त्यांनी एक मार्ग सांगितला तो म्हणजे दात काढून भारतात जाईपर्यंत तात्पुरते प्लॅस्टिकचे दात नुसते चावण्यापुरते तोंडात ठेवणे आणि मग भारतात गेल्यावर चांगले दात बसवून घेणे. दात पाडण्याचे व तात्पुरत्या दातांचे पैसे विमा कंपनी देईल.


दरम्यान पतिदेवांना व वडिलांना फोन करून कौतुकाने ही हकीकत सांगितली गेली. ('बघा!!जर्मनीत जाऊन इतका दंतपराक्रम गाजवला होता का आपल्या घरात आधी कोणी?') दोघांचेही म्हणणे पडले की नैसर्गिकरीत्या उगवलेले तीन दात इतक्या सहजासहजी काढू नयेत. दुसरा एखादा उपाय शोधून किंवा रजा घेऊन भारतात येऊन उपचार करावे. पण रजेवर भारतात येऊन सर्व वेळ मजेत घालवण्याऐवजी उपचाराच्या सजेत घालवण्याला मी कडाडून विरोध केला.  


एक दिवस जर्मन सहकारी येऊन म्हणाला, 'आम्ही तुझी हकीकत साहेबाच्या साहेबाला सांगितली आहे आणि ते म्हणतात की आपण खात्याच्या इतर कामासाठीच्या फंडातून हे ४००० युरो भरू.पण अट अशी की तू हे तुझ्या भारतीय सहकाऱ्यांना सांगायचे नाहीस. आणि जर हे प्रकरण उघडकीस आले तर साहेबाच्या साहेबावर कारवाई केली जाईल.' मी मनातल्या मनातः 'बचाव!बचाव!जर्मन दात नको पण जर्मन मदत आवर!देवा बाबा असले पाप माझ्या हातून घडवू नकोस रे!' म्हणून देवाचा धावा करायला सुरू केले. आणि धीर एकवटून त्यांना सांगितले की अशा मार्गाने मला पैसे नकोत आणि दातही आता दुखणे कमी झाले आहे. मी सुट्टीवर भारतात जाईपर्यंत थांबेन. (मराठी आणि तीही पुणेकर आहे मी! दातांसारख्या वस्तूवर कोणाचेतरी लाखो रुपये घालवण्यापेक्षा एखादी कार,हिऱ्याच्या कुड्या किंवा घरावर पैसे खर्च करेन. मग तोंडाचे बोळके झाले तरी बेहत्तर!). जर्मन सहकारी हे ऐकून जरा नाराज झाले कारण वैद्यकीय बाबतीत असे तडजोडीचे उपाय काढणे त्यांना पटत नव्हते आणि 'काय हे परक्या देशातले लोक!पैसे पैसे करून जीव देतील' असेही मनात कुठेतरी वाटत असावे कारण पैसे आणि भरोसेमंद शाकाहार यासाठी आम्ही सर्व डबा न्यायचो आणि कचेरीचे उपाहारगृह टाळायचो.    


भारतात मदतविषयक हालचाली सुरू झाल्या आणि मला पतिराजांनी एका दंतवैद्याचा मेलपत्ता दिला. मी दोन पानी ईपत्र लिहून आपले पुराण सांगितले. या दंतवैद्याने कोणत्याही सल्ला फीची अपेक्षा न करता आणि आपला बराच वेळ घालवून पत्राला मोठे उत्तर लिहिले. आतापर्यंत दात काढायचे सल्ले ऐकून घाबरलेली मी जरा आश्वस्त झाले. त्यांनी लिहिले होते,'शक्यतो दात उपटणे हे सर्व उपाय वाया गेल्यावरचा शेवटचा उपाय ठेवावा. ३४ नं वाचला नाही तरी १७ आणि ४४ नं. चा रुट कॅनॉल होऊ शकेल असे पत्रातील वर्णनावरून वाटते. तोपर्यंत जर्मनीत भारतीय दुकानात लवंग तेल मिळाल्यास ते किंवा लवंग विकत घेऊन तो दाताखाली धरा. १७ नं. ला हलकेच एक टाचणी टोचून चाचणी करा. जर ओरडण्याइतक्या वेदना झाल्या तर दातातले चेतातंतू अजून जिवंत आहेत आणि आपण रुट कॅनॉल करू शकतो.३४ नं. काढावा लागेल. (जबड्याच्या चार बाजूंना १,२,३,४ असे क्र. देऊन डावीकडचा खालचा दुसरा म्हणजे ३२,उजवीकडचा वरचा चौथा म्हणजे १४ असे ते क्र. देतात. '३४ आणि ४४ व्या' दाताचे गौडबंगाल हे असे आहे.)'


लवंगाचा शोध घेताना शब्दकोश पाहिला नाही. त्यामुळे दुकानांत जाऊन 'तुमच्याकडे असा असा दिसणारा भारतीय मसाल्याचा पदार्थ आहे का हो?' चालू झाले. एका सुपरमार्केटमध्ये तपकीरी रंगाच्या पेनाने कागदावर लवंगाचे चित्र काढून दाखवले. चित्रकला हा माझा प्रांत नाही, लहानपणी चित्रकलेच्या परीक्षा पण नापास झाले होते. बाईने मिऱ्यांचे पाकीट काढून दिले. सरतेशेवटी एका औषधदुकानात एक आजोबा आंग्लभाषा बोलत होते आणि त्यांनी लवंगाला 'नेलकन' म्हणतात ही माहिती देऊन लवंग काढून दिले. सुपरमार्केटमध्ये फ्लुओराइड पेस्टा शोधल्या. दाताच्या दुखण्यासाठी एक पेस्ट, साफ करण्यासाठी फ्ल्युओराईड पेस्ट,लवंग,वेदनाशामक गोळ्या असा सरंजाम घेऊन स्वारी आता भारतात कायम परतण्याची वाट पाहू लागली..
लवकरच येत आहेः एक महाग दंतकथा-३