एक महाग दंतकथा-१

जर्मनीच्या वास्तव्यात एका रात्री अशीच जाग आली. डोकं, कान, दात यापैकी काही तरी दुखतं आहे हे नक्की. पण नक्की काय दुखत असावं बरं? दोन तास हा विचार करण्यात घालवले आणि मग अखेरीस झोपून गेले.
'नक्की काय दुखतंय' या प्रश्नाचं उत्तर कचेरीत गेल्यावर मिळालं. झालं असं, 'फुकट' मिळत असलेल्या हलाहलासम कडू जर्मन कॉफीला कंटाळून अस्मादिकांनी नुकतीच एक धेडगुजरी कॉफी पाककृती शोधून काढली होती. बाजारातून 'कापुचिनो' चा डबा विकत घेतला होता. त्यातली दीड चमचा पूड, कॉफी टेबलावरून घेतलेल्या दोन साखरेच्या गोळ्या कपात टाकून मी त्यांच्या स्वयंपाकघरात जाऊन नळाला येणारे गरम पाणी त्यात टाकून बनणारा प्रकार कॉफी म्हणून पीत असे. तर अशाच कॉफीचा पहिला घोट घेतला आणि डोक्यात परत एकदा सणक गेली आणि ट्यूब पेटली, 'अरे, आपला तर दात दुखतो आहे.'


नियमाप्रमाणे कचेरीच्या वैद्यकीय सल्लागारीणीकडे गेले आणि तिला समजावून सांगितले की दात दुखतो आहे. तिने लगेच दोन गोळ्या दिल्या आणि शहरातील दंतवैद्याला फोन लावला. आणि म्हणाली,'जाताना दहा युरो घेऊन जा.' आता आली का पंचाईत? आम्ही भारतीय युरो न युरो काय, सेंट न सेंट वाचवायचो. मी मोडक्यातोडक्या जर्मनमध्ये विचारले, 'पण कचेरीचा वैद्यकीय विमा आहे ना?आम्हाला ते कार्ड दिले आहे.' ती म्हणाली ,'हो, पण दहा युरो लागणारच.'


दहा युरो घेऊन त्या दंतवैद्याकडे गेले. बाहेरची तोंडे व चित्रातील दात पाहून वाट पाहण्याचा वेळ मजेत गेला. तितक्यात रिसेप्शनवरील सुंदरीने आत जायला सांगितले. दंतवैद्याला सुदैवाने आंग्लभाषा येत असल्याने माझ्याकडून जर्मन भाषेवर होणारे संभाव्य अत्याचार टळले. त्याने नर्सिणीला मला 'राँटगेनबिल्ड' काढायला घेऊन जायला सांगितले. ते ८० युरोचे असल्याने तिथे जरा हुज्जत घातली आणि नर्सिणीला कचेरीत फोन करून हे पैसे नक्की कचेरी देईल हे वदवून घ्यायला सांगितले. दाताचे क्ष किरण चित्र काढण्याचा माझा पहिलाच प्रसंग. त्या यंत्रापाशी जाऊन खांबावर हनुवटी टेकून तेथे असलेला एक दांडा मला तोंडात धरून स्वस्थ उभे राहायला सांगितले. अस्मादिकांची कल्पनाशक्ती अचाट असल्याने मनात भयकारी कल्पना करायला सुरुवात केली, 'या तोंडात धरलेल्या दांड्याचा शॉक बसला तर?' तितक्यात क्ष किरण चित्र झाले.


जंतवैद्याने (म्हणजे जर्मन दंतवैद्याने हो!) माझ्या जबड्याचे क्ष किरण चित्र मोठ्या पडद्यावर लावले आणि तो मोडक्यातोडक्या आंग्लवाणीत बोलू लागला. 'आता हा पाहा तुमच्या १७ नं. दातातला खड्डा. आणि हा ३४ नं. मधला आणि हा ४४ नं. मधला. (आँ??पण ३२ दातच असतात ना म्हणे? मग हे ३४ आणि ४४ नं. कुठून आले?मी प्रश्न मनातल्या मनात दाबला.अर्थात या कोड्याचं उत्तर मला लवकरच मिळणार होतं.) हे तिन्ही दात तातडीने काढायलाच हवे.' माझी ऐकून दातखीळ बसली. तीन कोपऱ्यातल्या तीन दाढा काढल्या तर जेवायचं कसं? मी ही शंका त्याला बोलून दाखवली. जंतवैद्य 'कूल' होता. तो म्हणाला, 'त्यात काय? आता दात काढा, सहा महिन्यांनी जखमा भरल्यावर तीन खोटे नवे दात बसवून घ्या.'


माझ्या घशातून आवाज फुटेना. मी त्याला कसेबसे विचारले, 'या पूर्ण प्रक्रियेचा अंदाजे खर्च किती येईल?' त्याने समोरच्या वहीत आकडेमोड केली आणि म्हणाला, '४००० युरो.' म्हणजे माझा जवळजवळ पाच महिन्याचा जर्मन पगार! मी त्याला तसं सांगितलं आणि त्याला विचारलं की खोट्या दातांचे पैसे वैद्यकीय विमा कंपन्या देतात का? पण 'खोटे दात बसवणे' हे 'सौंदर्यवर्धन' सदरात मोडत असल्याने विमा कंपनी फक्त दात पाडण्याचे तीनशे युरो देईल असे सांगून त्याने मला त्याच्या एका चांगले दात पाडणाऱ्या(म्हणजे, खराब दात चांगल्या प्रकारे पाडणाऱ्या) मित्राचा पत्ता दिला आणि 'लवकरात लवकर दात काढ नाहीतर ती कीड हिरडीत जाईल,डोके दुखेल आणि कदाचित ताप येईल' असे सांगितले. 


'तीनशे युरो' चे अर्धेमुर्धे दात सांभाळत आणि मनातल्या मनात ४००० युरो चे रु. करुन त्या पैशात  कोणती भारतीय कार येईल याची गणितं मांडत आमची स्वारी परत कचेरीत पोहचली. कचेरीतल्या जर्मन सहकाऱ्याला ही कथा ऐकवली. 'त्यात काय? पाडून टाक दात. आणि एक वर्षाने भारतात परत जाशील तेव्हा नवे बसव.' त्याने सल्ला दिला. (वा रे शहाण्या, दात माझे. वर्षभर मोक्याच्या जागच्या दाढा गमावून मी बसणार. तुझं काय जातंय सांगायला? हलवायाच्या घरावर तुळशीपत्र.) मी त्याला 'लवकरात लवकर आणि परवडणाऱ्या पैशात नवे दात मिळायची हमी मिळाल्याशिवाय मी असलेले दात देणार नाही' हा निश्चय बोलून दाखवला. तोही विचारात पडला. दुसऱ्या एका सहकाऱ्याचे सासरे दंतवैद्य होते. तो मला त्यांच्याकडे घेऊन गेला. सासरेबुवांनी जावयाची विचारपूस केली, आणि मला खुर्चीवर बसवून एक गार गार स्प्रे जबड्यावर मारला. आणि चिमटा हातात घेतला. 'अहो तुम्ही काय करताय?' मी घाबरून मोडक्या जर्मन भाषेत विचारले. 'दात काढून टाकतोय. नाहीतरी ते कामातून गेले आहेत.' 'पण मला ते आता काढायचे नाहीत. मी वाट पाहणार आहे.' मी म्हणाले. 'कशाची वाट?दात पूर्ण किडण्याची?' जर्मन सासरेबुवा आता वैतागायला लागले होते.


तितक्यात जर्मन सहकारी मध्ये पडून त्याने माझा निश्चय समजावून सांगितला आणि ते जरा थंडावले. त्यांनी खोट्या दातांऐवजी 'पूल बसवणे' हे स्वस्त उपाय सांगून त्याची आकडेमोड काढून दिली. 'पण हापण खर्च मला परवडणार नाही. हे माझे दोन जर्मन पगार आहेत.' मी म्हणाले. मला आता त्या दुखणाऱ्या दाताचे दुःख या किंमती ऐकून आपोआप कमी झाल्याचा भास होत होता. पण जर्मन सहकाऱ्यांनी आता माझ्या दाताचा प्रश्न धसास लावण्याचा चंग बांधला होता!! 


(वैधानिक इशारा ही दंतकथा दातांवर केंद्रित असून संबंधित दंतवैद्यांचा किंवा त्यांच्या पेशाचा अवमान करण्याचा कोणताही हेतू नाही.दंतवैद्याच्या खुर्चीबद्दल सामान्य माणसाला उगीचच भिती वाटत असते.दंतवैद्यावर विश्वास ठेवून स्वतःला निश्चित बनवून त्याला जास्तीत जास्त सहकार्य केल्यास दोघांनाही कमी त्रास होतो असा स्वानुभव आहे.)