एक महाग दंतकथा-३

 यापूर्वीः एक महाग दंतकथा-२ 
दाताच्या दुखण्यासाठी एक पेस्ट, साफ करण्यासाठी फ्ल्युओराईड पेस्ट,लवंग,वेदनाशामक गोळ्या असा सरंजाम घेऊन स्वारी आता भारतात कायम परतण्याची वाट पाहू लागली..


यथावकाश भारतात परतले आणि आता जंतवैद्य विसरून भांतवैद्याची(भारतीय दंतवैद्याची) अपॉइंटमेंट घेतली. एरवी दंतवैद्याच्या खुर्चीची आणि आ वासून आपल्या तोंडात ठाकठोक करून घेण्याची मला भिती आहे. पण हा भांतवैद्य शांत आणि निरुपद्रवी वाटला. एकंदरीत आताचे तीन + ५ वर्षापूर्वी काढलेला एक अशा ४ दातांची उस्तवारी करण्याची असल्याने माझे बरेच शनिवार भांतवैद्याकडे जाणार असे दिसत होते.


पहिला शनिवार आला. रुट कॅनॉलसाठी  दात खरवडून त्यातले चेतातंतूंचे तुकडे काढणे असा कार्यक्रम होता. वैद्य साहेबांनी मोठी सुई काढली. मी 'दृष्टीआड सृष्टी' म्हणून डोळे मिटून तोंड उघडून श्वास रोखून बसले. वैद्यसाहेब म्हणाले,'तुम्ही डोळे मिटू नका हो. अशाने मी तयारी करत असतानापण तुम्ही तोंड उघडून बसाल आणि जबडा दुखायला लागेल.' पण मी दंतवैद्याच्या खुर्चीवर डोळे मिटून बसते ती आजतागायत. चेतातंतू काढणे म्हणजे हा वैद्यबुवा जादू केल्यासारखं दातातून लांबलचक चेतानळ्या बाहेर काढेल अशी माझी अपेक्षा होती आणि मी ती बोलूनही दाखवली. पण चेतातंतू हा नाजुक प्रकार असतो आणि त्याचे तुकडे निघतात असा शोध मला बशीतील सूक्ष्म तुकडे पाहिल्यावर लागला.    


डोळे मिटूनच सर्व उपचारांना सामोरे जायचा माझा निर्धार असल्याने वैद्यबुवांची जरा पंचाईतच झाली. पण ते बरेच सहनशील दिसत होते. त्यांचे बोट किंवा दुसरे काही तोंडात असताना तोंड मिटले तरी शांतपणे सांगत होते, 'थांबा. झालंच. जरा धीर धरा. तोंड मिटू नका. तोंडात सुई आहे. ती मोडेल.' (या सुया म्हणे वरच्या आणि खालच्या दातातल्या अंतराचा अंदाज घेण्यासाठी असतात.) परत एकदा दाताचे क्ष किरण चित्र घ्यायची वेळ आली. यावेळी खांब वगैरे नव्हता. एक पातळ छोटीशी फिल्म दाताच्या आतल्या बाजूला धरायची होती. मी म्हटलं, 'मीच धरते.' पण तोंडाच्या आत आपलीच बोटं आणि प्लॅस्टिकचा तुकडा धरून ठेवण्याच्या कल्पनेने कसंतरीच झालं. दोनदा प्रयोग करूनही व्यवस्थित जमलं नाही. वैद्यबुवांची सहनशक्ती जरा कमी व्हायला लागली होती कारण क्ष किरण चित्र हालल्यामुळे त्यांना अपेक्षित चित्र न दिसता समुद्राच्या लाटांसमान काहीतरी दिसत होते.


रुट कॅनॉल आणि रुट कॅनॉल केलेले दात सीलबंद करणे व्यवस्थित पार पडले. आता होतं क्राउन कटिंग म्हणजे दातांच्या पुलाला योग्य होण्यासाठी नसलेल्या दाताच्या आजूबाजूचे दात घासून त्यांची उंची कमी करणे. हा प्रकार जरा लांब वाटला. पण सभोवताली खूपच रंग होते. तोंडात धरायला तपकिरी औषध,त्याबरोबर लाल रंगाचं मलम, वैद्यबुवांचा हिरवा झगा, निळ्या क्ष किरण फिल्मा, दूरचित्रवाणी संच उघडल्यावर दिसतात तशा रेझिस्टरसारख्या दिसणाऱ्या पिवळ्या सुया, चंदेरी करवत.. एकंदरीत 'रंग रंग रांगोळी रंग कोणता' चा खेळ खेळला असता तर कमी पडले नसते इतके रंग होते. जवाहिरा हिरे कातरतो तसे करवतीने दात घासून, माप घेऊन परत करवतीने दात घासणे चालू होते.


दात खरवडल्यावर 'ट्रायल' ला एक आठवडा एक खोटा पूल देण्यात आला. तो बरोबर बसतो आणि उपयोगी पडतो असे सिद्ध झाल्यावर त्या पुलाचे माप देऊन कारखान्यातून खरा पूल बनून येणार होता.    


खऱ्या पुलाच्या वेळी असेच डोळे मिटून बसले होते तर वैद्यबुवांचा आवाज आला, 'आता जरा जळण्याचा वास आणि चटका बसेल हां, घाबरू नका.' (बापरे, मेणबत्ती?काय काय लिहिलं आहे रे दाताच्या दैवी?) पण माप घेण्याच्या किंवा तत्सम प्रक्रियेतील ती एक आवश्यक पायरी होती. असेच एकदा मेणाच्या पट्टीवर बसवलेल्या दाताने जोरात चावायला सांगितले गेले. पडत्या फळाची आज्ञा घेऊन मी त्या पट्टीला कडकडून चावले आणि तिचे तुकडे झाले. (वैद्यबुवा मनातल्या मनात वैतागले आणि त्यांनी सांगितले, 'अहो इतक्या जोरात नाही चावायचं, त्या पट्टीवर दाताचा ठसा उमटेल इतपत जोरात चावायचं.')


पूल बसवण्याच्या मधल्या प्रक्रियेत मला स्वतःच्या दातांचे मातीचे मॉडेल बक्षीस मिळाले. (आधी म्हणे वैद्य लोक हे स्वतःकडे ठेवायचे. पण हल्ली जागा जात असल्याने आणि रेकॉर्ड ठेवण्यात गोंधळ होत असल्याने ज्याचे दात आहेत त्यालाच देतात. पोलीस गुन्हेगार किंवा मृतदेहाची ओलख पटवतात ती म्हणे या दातांच्या ठेवणीवरुनच. चला, आता आपले मॉडेल आपल्यापाशी असल्याने गुन्हा करायला मी मोकळी! )


अशाप्रकारे अशाच एका शनिवारी पूल तयार होऊन तोंडात बसला. वैद्यबुवांना विचारले, 'आता याची काळजी कशी घ्यायची?' बुवा नेहमीच्या हृषीतुल्य शांततेने म्हणाले, 'रोज रात्री ब्रश करत जा आणि चिक्की किंवा खूप चिवट चॉकलेट शक्यतो खाऊ नका, कधीकधी त्याच्याबरोबर दात निघून येतो.' (तेव्हापासून मी  'चॉकलेट खायचं आहे' म्हटलं की आजूबाजूचे किंचाळतात 'नको! एक चॉकलेट चार हजाराला पडेल. तू आपली शीतपेय पी.')


बघता बघता तीन दातांची उस्तवारी करून झाली आणि आता चौथ्या आणि शेवटच्या खोट्या दातासाठी 'क्राऊन कटिंग' अर्थात तासणीसाठी शनिवारी जायचे आहे. 'दातांवर मारायलाही पैसा नाही' हा वाक्प्रचार मात्र हल्ली आम्हाला पटत नाही. दातांकडे दुर्लक्ष केलं तर जास्तीत जास्त पैसा दातावर मारायला जाऊ शकतो हा धडा आमच्याकडे आहेच! या सर्व प्रक्रियेत आमचे शांत वैद्यबुवा हा मात्र सर्वात मोठा आधार होता. अजूनही एकटी दंतवैद्याकडे निघाले की घरचे सांगतात 'डॉक्टरांना त्रास नाही द्यायचा हं! दंगा न करता आणि त्यांच्या इंस्ट्रुमेंटसचं नुकसान न करता परत ये!'