वेगळा

जीवनाचा नूर आहे वेगळा
ताल, लय अन् सूर आहे वेगळा!


वेगळी पत्रातली भाषा तुझी...
अंतरी मजकूर आहे वेगळा!


सागराची रोज भरती पाहिली
आसवांचा पूर आहे वेगळा...


प्रेम केले, भोगली मीही सजा
कायदा मंजूर आहे वेगळा


मूक अत्याचार सारे सोसती
कोण येथे शूर आहे वेगळा?


धावणाऱ्या माणसांचे शहर हे...
गाव माझा दूर आहे वेगळा...


- कुमार जावडेकर, मुंबई


(ही ग़ज़ल पूर्वी 'लोकमत' मधे प्रसिद्ध झालेली आहे.)