नव्हत्या सचिंत मुद्रा, ते आरसेच होते
ऐने अनेक, माझे प्रतिबिंब तेच होते
माझी प्रकाशण्याची पहिलीच वेळ होती
बाहूस यामिनीच्या तारे जुनेच होते
कळले मला कुठे की झालो हलाल केव्हा
होते जरी शराबी, डोळे सुरेच होते
ठेवून लोक गेले नावं खुशाल मजला
माझे जणू नव्याने ते बारसेच होते
बाहूत, द्राक्षकन्ये, कवळून घे मला तू
शुद्धीत राहण्याचे तोटे बरेच होते
समजावले मनाला माझ्या अनेकदा मी
समजावण्यास काही कारण तसेच होते