होम्स कथाः पिशाच्चाचा पाय-१

गेले अनेक महिने होम्स कामात हरवून प्रकृतीकडे दुर्लक्ष करत होता. अर्थातच त्याचे परिणाम त्याच्या शरीरावर दिसल्यावाचून कसे राहतील? अखेर डॉ. मूर यांच्या सल्ल्याने, किंबहुना इशाऱ्याने होम्स हवापालटाला कबूल झाला, कारण जास्त दुर्लक्ष केल्यास परिस्थिती इतकी बिघडेल की काम पूर्ण सोडून द्यावे लागेल असे त्यांनी स्पष्ट सांगितले होते.


आम्ही इथे या शांत आणि रम्य खेड्यात काही दिवसांपासून राहत होतो. भोवतीचा निसर्ग, आराम आणि फिरणे यात दिवस घड्याळाचे भान न ठेवता चालले होते. शेजारच्या चर्चच्या धर्मगुरुशी होम्सची बऱ्यापैकी मैत्री झाली. या धर्मगुरुचा भाडेकरू मॉर्टीमर ही थोडाफार ओळखीचा झाला होता.


एके दिवशी मी आणि होम्स गप्पा मारत बसलो होतो, आणि अचानक धर्मगुरु आणि मॉर्टीमर घाईघाईत घरी आले. धर्मगुरुला धाप लागली होती. 'रात्रीत एक भयंकर प्रकार घडला आहे. आणि तुमच्या सारख्या प्रसिद्ध माणसाचे आम्हाला साहाय्य हवे आहे.' होम्सने त्यांना बसायला सांगितले. मॉर्टीमर धर्मगुरुपेक्षा कमी अस्वस्थ दिसत असला तरी त्याच्या हाताची चाळवाचाळव आणि डोळ्यातल्या भावांवरुन तोही हादरलेला दिसत होता. 'तुम्ही सांगता की मी सांगू?' मॉर्टीमर धर्मगुरुला म्हणाला. 'मॉर्टीमर, तुम्ही प्रसंग प्रत्यक्ष पाहिला असल्याने तुम्ही जास्त चांगले वर्णन करू शकाल.' होम्सने सुचवले.


धर्मगुरु म्हणाला, 'मी थोडी सुरुवात करतो. काल रात्री मॉर्टीमर त्याचे दोन भाऊ आणि बहीण ब्रेंडाला भेटायला त्यांच्या घरी गेला होता. बऱ्याच दिवसांनी चौघे एकत्र भेटल्याने संध्याकाळ मजेत आणि गप्पात गेली.रात्री जेवणानंतर ते चौघे पत्ते खेळत बसले. मॉर्टीमरला काम असल्याने रात्री दहाच्या सुमारास त्याने त्यांचा निरोप घेतला. पहाटे मॉर्टीमर नेहमीप्रमाणे फिरायला गेला होता, तेंव्हा या भावांचा नोकर धावत धावत जाताना त्याला भेटला आणि त्याने जे सांगितले ते ऐकून मॉर्टीमर परत त्या घरी गेला. बघतो तर काय, बहीण ब्रेंडा खुर्चीत मरून पडली होती. तिच्या चेहऱ्यावर प्रचंड भितीचे भाव तसेच गोठले होते. आणि दोन्ही भाऊ वेड्यासारखे बरळत आणि एकमेकांना टाळ्या देत हसत होते. असं वाटत होतं की ते कशाच्यातरी धक्क्याने वेडे झाले आहेत.'


'मॉर्टीमर, तुम्हाला काय वाटतं, असं का झालं असावं?' होम्सने विचारलं.
'ही काहीतरी अमानवी घटना आहे, त्यांनी असं काहीतरी पाहिलं की ते भितीनेच वेडे झाले आणि ब्रेंडाचा अंत झाला.' धर्मगुरु म्हणाला.
'जर तसं असेल तर हे प्रकरण माझ्याही आवाक्याबाहेरचंच आहे, पण या निर्णयाप्रत येण्याआधी आपल्या सर्व शक्यता पडताळून पाहायला हव्यात.मॉर्टीमर, एक प्रश्न मला विचारावासा वाटतो तो म्हणजे तुम्ही या तिघांपासून वेगळे घर घेऊन का राहत होतात?'
'बऱ्याच पूर्वी आमच्यात काही कारणावरून मतभेद होते. पण आता ते सर्व मिटलेले होते.आणि आम्ही मिळून मिसळून होतो.'
'कालची रात्र नीट आठवून पाहा. तुम्हाला काही विशेष प्रसंग, किंवा माहिती आठवते का, ज्याचा या प्रकरणाशी संबंध असू शकेल?'
'अं, तसं काही विशेष नाही, पण काल रात्री खेळताना माझी पाठ खिडकीकडे होती. जॉर्ज माझ्या समोरच बसला होता. अचानक मला जाणवलं की तो खिडकीकडे टक लावून बघतो आहे. मी मागे वळून पाहिलं तर मला अगदी पुसटसं दिसलं की काहीतरी ,प्राणी का माणूस माहीत नाही, ते खिडकीपाशी अगदी टेकून उभं असावं आणि ते दूर जात होतं. मला नीटसं दिसलं नाही. मी जॉर्जला विचारलं तर तो पण असंच काही दिसल्याचं म्हणाला. नंतर आम्ही ते विसरून परत पत्त्यात रंगून गेलो. '
होम्स उद्गारला, 'विचित्र आहे. मला वाटतं आपण लवकरात लवकर प्रत्यक्ष त्या जागी जाऊन पाहिलं पाहिजे. काहीतरी दुवा मिळेल.'


आम्ही सर्व त्या बंगल्यात आलो. बंगल्याची नोकर पोर्टर तिथेच होती. खुर्च्या वगैरे सरकवून ठेवल्या होत्या. पोर्टरही खूप घाबरलेली होती. ती म्हणाली की रात्री तिने काहीच आवाज ऐकले नाहीत. सकाळी उठून जेव्हा खाली आली तेंव्हा ते दृश्य पाहून ती भितीने बेशुद्ध पडली.मग शुद्धीवर आल्यावर तिने पटकन नोकराला डॉक्टर आणि मदत आणायला पाठवलं आणि तो वाटेत मॉर्टीमरला भेटला. 


आम्ही वर गेलो आणि ब्रेंडाचा मृतदेह पाहिला. साधारण तिशीच्या आतबाहेर असावी. ती अत्यंत सुंदर असावी. भितीच्या भावांनी चेहरा वेडावाकडा झालेला असला तरी चेहऱ्याचा रेखीवपणा आणि सौंदर्य लपत नव्हतं.


आम्ही खाली आलो. होम्स बारकाईने सर्व पाहत होता. त्याने खुर्च्या परत रात्री होत्या तशा सरकवल्या, त्यावर बसून पाहिले, खिडकी आणि फायरप्लेस तपासली. 'इतकी लहान खोली असूनही शेकोटी का? ही शेकोटी रोज पेटवतात का? '  'नाही.काल रात्री जरा जास्त थंडी असल्याने मी आल्यावर शेकोटी पेटवली.' मॉर्टीमर म्हणाला.


होम्स विचारमग्न दिसत होता, पण त्याच्या चेहऱ्यावरून वाटत नव्हतं की त्याला काही दुवा मिळाला आहे. तो म्हणाला, 'मॉर्टीमर, आम्ही आता तुमचा निरोप घेतो. मला वाटत नाही की या प्रकरणात मी काही शोधू शकेन. तरीही मला काही आठवलं तर मी परत भेटेन आणि तुम्हाला काही तपास लागल्यास मला कळवा.'


होम्स आणि मी घरी आलो. होम्स खुर्चीत बसला होता. 'वॅटसन,मला वाटतं आपण जरा फिरून यावं. मला काही सुचत नाही. असं काहीतरी मॉर्टीमरच्या जाण्यानंतर खोलीत आलं. काहीतरी..मनुष्य, पिशाच्च..मला माहिती नाही. पण त्याच्या येण्याने भितीने एका स्त्रीचा मृत्यू आणि दोन भाऊ वेडे होतात..खरंच विचित्र आहे.' 
(भाग २ लवकरच येत आहे.)