होम्स कथाः पिशाच्चाचा पाय-३

यापूर्वीः भाग २
'मॉर्टीमर आज सकाळी त्याच्या घरी मृत्यू पावला, आणि त्याचा मृत्यू बराच ब्रेंडासारखा  आहे. ब्रेंडासारखे त्याच्या चेहऱ्यावर पण अत्यंत घाबरल्याचे भाव आहेत! हे सर्व अमानवी आहे!'


'आम्ही तुमच्या बग्गीतून येऊ शकतो का?' होम्सने विचारले.
'अवश्य.'
'वॅटसन,आपल्याला नाश्ता सध्या बाजूला ठेवावा लागेल. चल. काही पुरावे इकडेतिकडे होण्याआधी आपल्याला लवकर तिथे पोहचलं पाहिजे.'


आम्ही डॉक्टर आणि पोलीसांच्याही आधी पोहचलो, त्यामुळे सर्व काही जसेच्या तसे होते. ते दृश्य,मॉर्टीमरचा तो चेहरा मी विसरु नाही शकणार. वातावरणात एक प्रकारचा कोंदटपणा होता. मॉर्टीमरला पहिले मृतावस्थेत पाहणाऱ्या नोकराने खिडकी उघडून ठेवली होती, तरीही तो कोंदटपणा असह्य होता. टेबलावर एक चिमणी अजूनही जळत होती. आणि मॉर्टीमर खुर्चीवर होता. त्याच्या चेहऱ्यावर भयंकर घाबरल्याचे भाव होते. बाहेर जायचे कपडे अंगात होते, पण ते अत्यंत घाईघाईत घातल्याचे स्पष्ट दिसत होते. खुर्चीवर बसून मागे वळून तो खिडकीकडे पाहत होता आणि तसाच मरुन पडला होता..नोकराने सांगितले की त्याच्या बिछान्यात तो काही वेळ झोपला होता, कारण बिछान्यात झोपल्याच्या खुणा होत्या. प्रसंग बहुधा पहाटे घडला असावा. 


होम्सच्या चेहऱ्यात एकाएकी बदल झाला. खोलीत आल्यापासून तो गंभीर आणि सावध दिसत होता. त्याने सगळीकडे फिरुन पाहिले. एकही जागा सोडली नाही. खोली, खोलीच्या बाहेरचा भाग, वरची झोपण्याची खोली..मला त्याच्याकडे पाहून पोलीस पथकातल्या कुत्र्याची आठवण येत होती. झोपण्याच्या खोलीत आल्यावर त्याने खिडकी उघडली. खिडकीबाहेर पाहून त्याला काहीतरी सापडलं होतं हे नक्की. परत झपाट्याने वळून तो खाली आला. आणि जळणाऱ्या चिमणीकडे बारकाईने पाहू लागला. शेवटी त्याने चिमणीचं झाकण उचलून थोडी काजळी खरवडली आणि ती काळजीपूर्वक लिफाफ्यात ठेवली. आम्ही बाहेर आलो.


'मला थोडीफार दिशा मिळाली आहे.आता मला निघायला हवं, पण तुम्ही कृपया पोलिसांना माझे नमस्कार सांगा आणि त्यांना झोपण्याच्या खोलीची खिडकी आणि ती चिमणी यांचं निरीक्षण करायला सांगा.वॅटसन, आपण आता निघायला हवं.' होम्सने धर्मगुरुचा निरोप घेतला.


पोलीसांना कामात ढवळाढवळ आवडत नसावी असं दिसतं , कारण दोन दिवसात पोलीसांकडून काहीही संपर्क झाला नाही. होम्स दोन दिवसात गावभर लांबलांब एकटाच फिरायचा. आणि त्याने हुबेहूब मॉर्टीमरच्या घरातल्यासारखी चिमणी आणली होती. त्यात त्याने तेच तेल भरुन ती चिमणी जळायला  किती वेळ लागतो हा प्रयोग केला. हे एकवेळ ठीक होतं, पण त्याने जो दुसरा प्रयोग केला तो मात्र आम्हाला फार महागात पडू शकला असता.


'वॅटसन,तुला आठवत असेल, या दोन्ही मरणात काही गोष्टी समाईक आहेत. एक म्हणजे दोन्हीकडे पहिल्यांदा मृताला पाहणाऱ्याला जाणवलेला कोंदटपणा.पोर्टर बेशुद्ध पडली होती. आणि मॉर्टीमरच्या भावंडांना पाहायला आलेला डॉक्टरही.मॉर्टीमरला पहिल्यांदा मृत पाहणाऱ्या नोकराणीने आधी खोलीची खिडकी उघडली.तिलाही मी विचारल्यावर मला कळलं की त्यानंतर बराच वेळ ती बरं वाटत नसल्याने पडून होती..याच्यावरुन काय वाटतं?दोन्हीकडे वातावरणात एक प्रकारचा विषारीपणा आहे.. दोन्ही ठिकाणी काहीतरी जळत होतं. अगदी त्या दिवशीची शेकोटी थंडीसाठी पेटवली असेल. पण मॉर्टीमरच्या घरातली चिमणी? ती तर गरजही नसताना मुद्दाम पेटवली होती. माझ्या तेलाच्या प्रयोगावरुन दिसतं की ती उजाडल्यावर पेटवली होती.का? समजा आपण असं धरुन चालूया की काहीतरी आगीत टाकलं होतं, ज्याच्यामुळे वातावरणात विषारीपणा आला होता. आता मॉर्टीमरच्या भावंडांकडचा प्रकार घे. पावसाळी वातावरण आणि थंडीमुळे जरी खिडक्या बंद असल्या तरी असा पदार्थ शेकोटीत टाकल्यावर थोडाफार धूर शेकोटीच्या चिमणीवाटे निघून गेला. त्यामुळे त्या ठिकाणी तीन जण असूनही विषाने एक स्त्री च फक्त मारली गेली. आणि बाकीचे त्या पदार्थाच्या तत्कालीन किंवा कायमस्वरूपी परिणामाने वेडे झाले. मॉर्टीमरच्या वेळी परिणाम जास्त होते आणि पूर्ण काम करुन गेले,कारण खिडकी बंद होती आणि हवा बाहेर जायला काहीच मार्ग शिल्लक ठेवला गेला नव्हता.' होम्स सांगत होता.


'आणि हीच शक्यता मनात ठेवून मी मॉर्टीमरकडच्या दिव्याचा शोध घेतला. मला दिव्याच्या काजळीत पांढरे अवशेष सापडले.इतकंच नाही, तर दिव्याच्या वातीभोवती मला एक पूड सापडली, जी अजून जळायची बाकी होती. मी अर्धी दिव्याची काजळे आणि अर्धी पूड घेऊन लिफाफ्यात गोळा केली.'
'अर्धीच  का?' मी आश्चर्याने विचारलं.
'वॅटसन, मी पोलीसांच्या तपासात अडथळा आणणारा माणूस नाही. मी त्यांना सर्व पुरावे सोडले होते. इतकंच नाही तर धर्मगुरुला सांगून त्यांना एका दुव्याबद्दल अप्रत्यक्ष कल्पनाही दिली होती. त्यांना सापडलं नाही हे खरं , पण ते विष त्यांना सापडेपर्यंत त्या दिव्यातच राहील.'


होम्सने आपल्याकडचा दिवा काढून टेबलावर ठेवला. 'वॅटसन, माझ्याकडे तीच शिल्लक राहिलेली पूड आहे.आता आपण हा दिवा पेटवू. अर्थात आपण दार आणि खिडकी मात्र उघडी ठेवू, कारण जग दोन माननीय सदस्यांना कायमचं मुकावं असं मला वाटत नाही. तू खिडकीच्या जवळ बस,अर्थात तू शहाणा असशील तर या प्रयोगात भाग घेणार नाहीस. नसलास तर तुला पूर्ण स्वातंत्र्य आहे.काय, तू भाग घेणार?मला वाटलंच होतं. बरं तर. आता आपण दोघं एकमेकांच्या चेहरा पाहू शकतो आणि काही बदल जाणवल्यास तत्क्षणी हा प्रयोग संपवू शकतो. हा मी ही पूड दिव्यात टाकतो‌. सावध.' आणि होम्सने पूड दिव्यात टाकली. 


लगेच मला एक घाणेरडा वास आला. आणि मी माझं भान विसरलो. माझ्या डोळ्यासमोर एक काळं धुकं पसरलं होतं. आणि त्या धुक्यात सर्व काही, जे जे मला भयंकर वाटतं आणि मी लहानपणापासून घाबरतो, ते होतं. मला काहीच कळत नव्हतं. ओरडायलाही होत नव्हतं. जीभ जड झाली होती. कुठेतरी मनाच्या कोपऱ्यात जाणवत होतं की यातून बाहेर निघायलाच हवं.. अचानक या सगळ्याशी झगडत असताना क्षणभर माझे डोळे उघडले आणि मला दिव्याच्या शेजारच्या खुर्चीत बसलेला होम्स दिसला. त्याच्या चेहऱ्यावर तेच भितीचे भाव होते, जे ब्रेंडा आणि मॉर्टीमरच्या चेहऱ्यावर होते..


मी स्वतःला कसंबसं भानावर आणलं. आणि होम्सला ओढत नेऊन खोलीच्या बाहेर फरफटत गेलो. बाहेर हवा लागल्यावर थोड्या वेळात माझं डोकं ताळ्यावर आलं. होम्सही शुद्धीवर आला. त्याला सर्व आठवलं आणि तो खूप कळवळीने म्हणाला, 'वॅटसन, तू आज माझा जीव वाचवलास.तुझे माझ्यावर अनंत उपकार आहेत.'
माझ्यासाठी होम्सचं हे भावनिक रुप नविनच होतं. मी आतापर्यंत त्याला एक भावनाहीन यंत्र म्हणूनच पाहिलं होतं. 'नाही होम्स, तू माझा मित्र आहेस आणि तुला मदत करताना मला आनंदच होईल.' 
'वॅटसन, आता तुला कळलं ना, मृत्यू कसे झाले?'
'हो, त्यात शंकाच नाही.'


'मॉर्टीमरच्या बाबतीत आपल्याला माहीत आहे की त्याचे त्या तीन भावंडांशी मतभेद होते. सलोखा झाला आहे असं जरी तो म्हणत असला तरी त्याच्या चेहऱ्यावरुन मला असं वाटलं नाही की तो काही विसरणाऱ्यांपैकी आहे.त्याने त्या दिवशी सर्वांचा निरोप घेतला आणि लगेच ती घटना घडली‍. दुसऱ्या कोणी येऊन शेकोटीत ती पूड टाकली असती तर ते तिघं नक्की खुर्च्यांवरुन उठले तरी असते. पण ती पूड त्यानेच टाकली होती आणि म्हणून तो लांब लांब ढांगा टाकत घरापासून दूर गेला होता. आणि आपल्याला बनवायला तो खिडकीबाहेर दिसलेल्या माणसाचा प्रसंगही त्याने सांगितला.'
'पण मग मॉर्टीमरचा मृत्यू?त्याने आत्महत्या केली का?'


'कधीकधी अशा गुन्हयातून माणसं आत्महत्या करतातही, पण मॉर्टीमरने काय केलं हे माझ्यापेक्षा दुसरी एक व्यक्ती जास्त चांगलं सांगू शकेल. मी त्याना इथे बोलावलं आहे. हे काय, डॉ. लिऑन आलेच.'
'होम्स,मला तुमचा निरोप मिळाला आणि मी इथे आलो.पण मला इथे का बोलावलं त्याचं कारण कळू शकेल का?'
'होय.मला तुमच्याशी मॉर्टीमरच्या खूनाबद्दल बोलायचं आहे आणि माहिती हवी आहे.तो तुम्ही केला आहे.'
लिऑनच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. तो उसळला. 'होम्स, लक्षात ठेवा, इतकी वर्षं जंगलात राहून मी स्वतःच माझा कायदा बनवतो.आणि तुम्ही हे विसरु नका, कारण मलाही तुम्हाला ईजा पोहचवायची इच्छा नाही.'
'मलाही नाही.' होम्स म्हणाला. 'म्हणूनच मी तुम्हाला निरोप पाठवला, आणि पोलीसांना पाठवला नाही.'
'हे पहा,ही जर थाप असेल तर खूप वाईट थाप आहे आणि तुम्ही त्याचे परीणाम भोगाल, होम्स.'


'ही थाप नाही. आणि मी हा निश्कर्ष कसा काढला सांगू? थांबा, मी सर्व प्रसंग तुमच्यापुढे उभा करतो.'
होम्स बोलू लागला. 'तुम्ही मला विचारायला आला होतात की मला या गुन्ह्यात काही दुवे मिळाले का?मी नाही म्हणून उत्तर दिल्यावर तुम्ही तुमच्या घरी परत गेलात. रात्र तळमळत घालवलीत. आणि सकाळी मनाचा हिय्या करुन उठलात. तुमच्या घराबाहेरची लाल खडी खिशात घातलीत आणि मॉर्टीमरच्या घराकडे गेलात.'
लिऑन आश्चर्याने ऐकत होता.
'मॉर्टीमरच्या घरी कोणीच जागं नव्हतं.तुम्ही खिशातली खडी त्याच्या खिडकीवर भिरकावलीत. तो जागा झाला आणि खिडकीपाशी आला.तुम्ही त्याला खाली यायला फर्मावलंत. घाईघाईत कपडे करुन तो खालच्या खोलीत आला.तुम्ही थोडा वेळ बोललात. मग खिडकी बंद करुन आणि दिवा पेटवून बाहेर निघून गेलात आणि बाहेरुन सर्व प्रकार घडताना पाहिलात.मग तुम्ही आपल्या घरी निघून गेलात.लिऑन मला सांगा,या प्रकारामागचे तुमचे हेतू काय होते? ते मला पटले तर मी तुम्हाला वचन देतो, मी तरी पोलीसांना माझे अंदाज सांगणार नाही.'


लिऑनचा चेहरा पांढराफटक पडला.त्याने उदास मुद्रेने खिशातून फोटो काढला. 'ब्रेंडा!'मी उद्गारलो. 'होय ,हिच्यासाठी मी हे केलं. माझी ब्रेंडा. आम्ही लग्न करणार होतो.माझी पूर्वपत्नी मला घटस्फोट देत नव्हती. पण आमचं प्रेम सच्चं होतं. म्हणून ब्रेंडा थांबली. मी इतके वर्षं थांबलो. आणि आज त्या थांबण्याचं हे.. हे  फळ मिळालं. धर्मगुरुला आमचं गुपित माहीत होतं. म्हणूनच त्याने मला तार करुन कळवलं.'


'वॅटसन,हे नाव तुम्ही आधी ऐकलंय का?' लिऑनने खिशातून एका पाकिटातून झाडाची मुळी बाहेर काढली. पाकिटावर लिहीलं होतं, 'डेव्हिल्स फूट रुट'.
'पिशाच्चाचा पाय?नाही बुवा, मी हे नाव कधीच नाही ऐकलं.'
'साहजिक आहे. कारण बुडापेस्टच्या एका प्रयोगशाळेतला नमुना सोडल्यास या मूळाचा एकही नमुना अख्ख्या युरोपात नाही. अजून हे मूळ वैद्यकीय यादीतही यायचं आहे. याच्या पायासारख्या विचीत्र आकारामुळे याला 'डेव्हिल्स' फूट रुट म्हणतात. आफ्रिकेत काही वैद्यांकडून हे मूळ विष म्हणून वापरलं जातं. मी सवतः याचा नमुना माझ्या संशोधनासाठी मोठ्या मुश्कीलीने आफ्रिकेतून मिळवला होता.'
लिऑन पुढे सांगू लागला.
'ब्रेंडामुळे माझी तिच्या भावांशीही ओळख होती. मॉर्टीमरशी झालेल्या मतभेदांनंतर ते मिटल्यावर मॉर्टीमर माझ्या घरी एकदा आला होता. तेव्हा मी त्याला आफ्रिकेतून आणलेल्या आगळ्यावेगळ्या वस्तूंमधे ही मूळीही दाखवली होती. ही मूळी मेंदूतल्या भितीच्या केंद्रावर ताबा मिळवते आणि माणसाला भितीने मृत्यू किंवा कायमचे वेडेपण देते. त्यानेही सहज विचारतो असं दाखवून मूळीचे काम आणि किती वेळात होते इ. माहिती काढून घेतली होती. माझी पाठ वळल्यावर थोडी पूड त्याने चोरली आणि मी आफ्रिकेला जात असल्याची संधी पाहून त्यांच्यावर वापरली. कारण त्याला एकट्याला त्या इस्टेटीचा वारस बनायचं होतं. मी परत आलो आणि ब्रेंडाला बघितलं त्याक्षणी मला कळलं की ही लक्षणं कशाची आहेत.'


'मी काय करणार होतो?पोलीसांनी माझ्यावर विश्वास नसताच ठेवला.म्हणून मी तुमच्यापाशी आलो होतो, तुम्हाला अंदाज येऊन तुम्ही माग घ्याल या आशेने. पण तुम्हीही माझी निराशा केलीत.मला ब्रेंडाच्या मृत्यूचा सूड घ्यायचा होता.म्हणून मी त्याला रात्री खाली बोलावलं. त्याला त्याने काय केलं ते सांगितलं. तो घाबरला. मी त्याला सांगितलं की मी स्वतः ब्रेंडाच्या खूनाचा न्याय करणार आहे. आणि मी त्याच्यावर पिस्तूल रोखून दिव्याभोवती पूड रचली. दिवा पेटवला आणि खिडकीबाहेर उभा राहिलो. अक्षरशः काही मिनीटात तो मेला.भयंकर प्रकारे. पण मला काही वाटलं नाही,कारण माझ्या ब्रेंडानेही मरताना त्याच यातना भोगल्या होत्या. ही अशी माझी कथा आहे. होम्स, तुम्हाला जे करायचं ते तुम्ही करु शकता.'


होम्स काही क्षण शांत बसून राहिला.
'मला हे सर्व सांगण्याआधी तुमचे काय बेत होते?'
'मी आफ्रिकेत परत जाणार होतो. माझं संशोधन अर्धंच पूर्ण झालं आहे.'
होम्स म्हणाला, 'मग निश्चिंतपणे जा आणि उरलेलं अर्धं पूर्ण करा.मी तरी तुम्हाला अडवणार नाही.'


लिऑन अभिवादन करुन गंभीरपणे निघून गेला.
'चल वॅटसन, एखादा 'बिनविषारी' धूर आपल्यासाठी निश्चीतच चांगला आहे सध्या.'
होम्स म्हणाला,'मला शंका तेव्हाच आली जेव्हा मी मॉर्टीमरच्या खिडकीवर ती लाल माती पाहिली.चला, आपणही हे प्रकरण विसरुन जायला हरकत नाही.'


-डेव्हिल्स फूटचा  स्वैर अनुवाद.