होम्स कथाः पिशाच्चाचा पाय-२

यापूर्वीः भाग-१
'वॅटसन,मला वाटतं आपण जरा फिरून यावं. मला काही सुचत नाही. असं काहीतरी मॉर्टीमरच्या जाण्यानंतर खोलीत आलं. काहीतरी..मनुष्य, पिशाच्च..मला माहिती नाही. पण त्याच्या येण्याने भितीने एका स्त्रीचा मृत्यू आणि दोन भाऊ वेडे होतात..खरंच विचित्र आहे.' 


आम्ही फिरायला निघालो आणि होम्स परत बोलू लागला. 'आपण जरा नीट विचार करु. हं,तर जी थोडीफार माहिती आपल्या कडे आहे त्यावरुन..सर्वात पहिले आपण अमानवी अस्तित्व किंवा 'भूत' ही शक्यता बाजूला ठेवू. आपल्याला काय माहित आहे? तीन व्यक्ती कुठल्यातरी भयंकर भितीने इतक्या पछाडल्या की त्यातली एक व्यक्ती मेली आणि दोन मानसिक संतुलन हरवून बसल्या. हे नक्की कधी घडलं? माझं मत म्हणशील तर मॉर्टीमर खोलीच्या बाहेर गेल्यागेल्या. मला कसं कळलं? पत्ते टेबलावर तसेच पसरलेले आहेत.मंडळी नेहमी त्या दिवशीच्या वेळेपेक्षा लवकर झोपतात. जर घटना मॉर्टीमर बाहेर गेल्यानंतर खूप वेळाने घडली असती तर त्यांनी झोपण्याच्या इराद्याने पत्ते आवरलेले असते, खुर्च्या सरकवलेल्या असत्या..म्हणून मी म्हणू इच्छितो, की जे घडलं ते मॉर्टीमर खोलीच्या बाहेर गेल्यागेल्या काही मिनीटातच घडलंय.'
होम्सची निरीक्षणे आणि आडाखे मला नेहमीच अवाक करायचे आणि आताही मी कान देऊन तो काय म्हणतो ते ऐकत होतो. 
'तर हे कळल्यावर अर्थातच आपल्यापुढे प्रश्न उरतो तो म्हणजे मॉर्टीमरच्या हालचाली बाहेर पडल्यावर काही संशयास्पद होत्या का?  हे मला हवं होतं आणि म्हणून मी 'धांदरटपणा' करुन तो पाण्याचा जग पाडला. मला त्या पाण्यामुळे बाहेरच्या वाळूत मॉर्टीमरच्या पायांचा ठसा व्यवस्थित मिळाला.काल रात्रीपण पाऊस पडलेला होता. आणि कालचे त्याचे ठसे बघितले तर कळतं की तो घाईघाईत आणि लांबलांब ढांगा टाकत शक्य तितक्या लवकर त्या बंगल्यापासून दूर गेला आहे. का बरं?'
'आणि समजा मॉर्टीमरच्या सांगण्याप्रमाणे क्षणभर आपण असं मानू, की कोणीतरी खिडकीच्या अगदी जवळ आलं होतं आणि त्या व्यक्तीच्या भयंकर दर्शनाने तिघांची ही अवस्था केली..पण या व्यक्तीला पाहिल्याचा दावा कोण करतं? पोर्टर तर झोपायला गेली होती. बाकी तीन व्यक्ती आता काही पाहिल्याचं सांगण्याच्या स्थितीत नाहीत. उरतो कोण? मॉर्टीमर एकटा. त्यानेच खिडकीबाहेर कोणीतरी पाहिलं होतं, किंबहुना तसं आपल्याला सांगितलं होतं. अगदी तो खरं बोलतो असं धरलं तरी ती रात्र पावसाळी आणि धुक्याची होती. कोणीही खिडकीपाशी उभं दिसायचं म्हटलं तरी त्या कोणालातरी खिडकीला नाक लावून अगदी चिकटून उभं राहण्याशिवाय पर्यायच नव्हता. त्याशिवाय आतल्या कोणाला तो दिसलाच नसता धुक्यामुळे. म्हणजे या 'कोणीतरी' च्या पायाचे ठसे बागेत खिडकीवर कुठेतरी हवेत. पण बागेत खिडकीजवळ तर कोणाचेच ठसे नाहीत. चिखल आहे तसा आहे. म्हनजे आता बघ, कोणीतरी बाहेरच्या व्यक्तीने तिघांना इतकं घाबरवलं. पायाचे ठसेही न सोडता हे कसं केलं असेल? आणी असं करण्यामागचा हेतू काय?'


'हो, हा प्रश्न आहे खरा.' मी होम्सच्या तर्कशास्त्रापुढे नेहमीप्रमाणे प्रभावित झालो.
'म्हणूनच मी म्हणतो, की सध्या आपण ही घटना बाजूला ठेवू. उगीच अपुऱ्या माहितीवर तर्ककुतर्क करणं नको.'


पुढचे दोनतीन तास आम्ही गप्पांत घालवले. वेगवेगळ्या विषयांवर आम्ही बोलत होतो आणि वेळ कसा गेला ते कळलंच नाही. दुपारी आम्ही घरी परतलो. दारात उभ्या माणसाने आमची गाडी परत आधीच्या विषयांवर आणली! आम्ही त्या माणसाला प्रत्यक्ष ओळखत नसलो तरी त्याच्या बद्दल ऐकून होतो.  लंडनमधे प्रसिद्ध आणि सध्या आफ्रिकेत संशोधन करत असलेले डॉ. लिऑन!सिंहाच्या शिकारीबद्दल विख्यात. आम्ही एकदोनदा त्यांना गावात पाहिलं होतं. आज त्यांना आमच्या बद्दल चौकशी करत असलेलं पाहून जरा आश्चर्य वाटलं.


'पोलीस तपासात चुकतायत असं वाटतं.' डॉ. लिओन म्हणाले. 'मात्र होम्स, मला तुमच्याकडून अपेक्षा आहेत की तुम्हाला या प्रकरणात काही वेगळे दुवे मिळाले असतील.मी मॉर्टीमरच्या कुटुंबाला जवळून ओळखतो. असं काही अघटीत घडणं हा माझ्यासाठी मोठाच धक्का आहे. तुम्हाला सांगतो, मी आज इथून आफ्रिकेला जाण्यासाठी निघालो होतो आणि प्लायमाऊथपर्यंत पोहचलोही होतो, पण ही बातमी मला कळली आणि मी परत आलो.'
'पण तुम्हाला ही बातमी इतक्या तातडीने कळली कशी?'
लिऑनना प्रश्न फारसा आवडलेला नसावा, पण त्यांनी उत्तर दिलं. 'धर्मगुरु माझे मित्र आहेत आणि त्यांनी त्वरेने तार करुन ही बातमी मला कळवली. मी माझं काही सामनही बोटीत सोडून आलो आहे. अर्थात माझं महत्वाचं सामान प्लायमाऊथच्या हॉटेलातच आहे,त्यामुळे जास्त काही फरक पडत नाही. '
'मी तुम्हाला इतकंच सांगू शकतो डॉ. लिऑन, की सध्यातरी माझ्यापाशी अगदी नक्की अशी दिशा नाही. पण मला आशा नक्कीच आहे की मला काहीतरी सापडेल आणि काही अंदाज मी केलेले आहेत.'
लिऑन म्हणाले, 'काय अंदाज केलेत मला कळू शकेल का?'
'माझ्या व्यावसायिक तत्वात ते बसत नाही आणि मी सांगू शकत नाही. माफ करा.' होम्स शांतपणे म्हणाला.
'मग मी इथे उगीच वेळ वाया घालवला!'  काहीसे वैतागून डॉ लिऑन निघून गेले.


होम्स संध्याकाळपर्यंत अस्वस्थ आणि कशाचीतरी वाट पाहत असल्यासारखा दिसत होता. संध्याकाळी एक तार आली. त्याने ती वाचून बाजूला टाकली.
'मी प्लायमाऊथला तार पाठवली होती. मला खात्री करायची होती की डॉ. लिऑनची गोष्ट खरी आहे का. सर्व खरं आहे आणि खरोखर तो आपलं काही सामान जाऊ देऊन परत आला आहे.'
'असं दिसतं की त्यांना या प्रकरणात बराच रस असावा.' मी म्हणालो.
'खरं आहे. मला वाटतं की काहीतरी आपल्या अगदी जवळ आहे, पण तो दुवा आपल्याला अजून सापडलेला नाही. तो सापडला की आपण प्रकरण उलगडण्याच्या अगदी जवळ आहोत.'


प्रकरण अजून गंभीर झालं, कारण मी सकाळी दाढी करत होतो तेव्हा अचानक एक बग्गी येऊन उभी राहिली. धर्मगुरु घाईघाईत आत आले.
'होम्स, होम्स, परत एक भयंकर प्रकार! मला तर वाटतं सैतानाने पछाडलंय या जागेला आणि तो हे अघटीत प्रकार घडवून आणतोय!' धर्मगुरु भयंकर उत्तेजित होता. थोड्यावेळाने शांत झाल्यावर तो म्हणाला, 'मॉर्टीमर आज सकाळी त्याच्या घरी मृत्यू पावला, आणि त्याच्या मृत्यूत तीच लक्षणे आहेत!ब्रेंडासारखे त्याच्या चेहऱ्यावर पण अत्यंत घाबरल्याचे भाव आहेत! हे सर्व अमानवी आहे!'