नशा

पेल्यात सागराला जागा उरली नाही
ह्रदयी नव्या नशेला जागा उरली नाही

इतकी भरून आहे त्यांच्यात वारुणी की
डोळ्यांत आसवाला जागा उरली नाही

साकी हरेक बाला, जग झाले मधुशाला
शुद्धीत राहण्याला जागा उरली नाही

भरले निरोप इतके विरही त्या यक्षाचे
मेघात पावसाला जागा उरली नाही

वृंदावनात पेरू तुळशीच्या शेजारी
भांगेस वाढण्याला जागा उरली नाही