नटसम्राट

सोडणार आहे आता
माझे बोलणे मुक्याने,
एकटक भरणारे
कोरे डोळ्यांचे रकाने


काही काळ तरी तेथे
रंगमंच उभा होता,
टाळ्या घेतल्या मी किती
कसलेला अभिनेता


नांदी झालेली टेचात,
प्रवेशलो मी जोशात,
तीन तास संवादांचे
खेळ डोळ्यांत, रोमात


ज़रा उशीरा कळली
स्वस्त झालेली आसवे,
काढता का रडण्याची
तुम्ही माझ्या हो तिकीटे?


ओळखीचे झाले आहे
माझे नाटक तुम्हांला,
टाळ्या देता पहा किती
नुसत्या जाहिरातीला!


दुःख होते मलासुद्धा
वेळ,पैसा वाया ज़ातो,
बदल्यात तुम्हांला मी
तोचतोच माल देतो


अहो मलासुद्धा येते
खोड्या काढणे, लपणे,
उंडारणे, गाणी गाणे,
हसणे नि हसवणे


हसण्याचासुद्धा आता
करतो सराव थोडा,
तालमीला दौडवतो
नव्या नांदीचा हा घोडा


घंटा तिसरी झाली की
नवे नाटक बघूया,
नटसम्राटाचे रूप
थोडे वेगळे पाहूया


म्हणून म्हटले मघा
पुरे बोलणे मुक्याने,
एकटक भरणारे
कोरे डोळ्यांचे रकाने


बघताना नाट्य नवे
मात्र विसरू हे नका
अंतराला माझ्या पुन्हा
तिकीटाने मोज़ू नका