नागफणी (ड्यूक्स नोज)

मुंबई पुण्याच्या सर्वांनाच खंडाळ्याच्या घाटाचे आकर्षण असते. पावसाळ्यात तर  कर्जत लोणावळा हा प्रवास गाडीच्या दारातच बसूनच करायचा आणि आजूबाजूच्या डोंगरदऱ्या, धबधबे डोळयात भरून घ्यायचे हे ठरलेले असायचे.


कर्जतहून (वा खोपोलीहून रस्त्याने) खंडाळ्याकडे वर येतांना उजव्या हाताला नागाच्या फणीच्या आकाराचा एक सुळका आकाशात घुसलेला दिसतो. त्यालाच बिलगुन तसाच एक थोडा छोटा सुळका दिसतो. हाच तो सुप्रसिद्ध नागफणी व धाकली नागफणी (ड्यूकस व डचेस नोज). या बाजूने बघतांना इथे अत्यंत अवघड श्रेणीचे व उंच असे प्रस्तरारोहण केल्याशिवाय जाणे शक्य नाही असेच वाटते. तशा काही मोहिमाही झाल्या आहेत आणि त्या दरम्यान काही मृत्यूही ओढवले आहेत.


पण सामान्य डोंगरयात्रींना वर जाण्यासाठीचा एक अगदी सोपा मार्ग या सुळक्यांच्या पाठीवरून आहे.  अगदी नवख्यांसाठीही उत्तम वर्षासहल होऊ शकेल अशा या मार्गाने नागफणीला जाण्यासाठी आरती, कूल आणि मी रविवारी साडेसहाच्या लोकलने लोणावळ्याकडे निघालो. अजिबातच ढग नव्हते, सूर्यही 'व्यवस्थित' उगवला होता, त्यामुळे थोडी धाकधूक वाटत होती. पण कामशेतनंतर वातावरण जरा आल्हाददायक झाले.


लोणावळ्याला अन्नपूर्णामध्ये पोटपुजा करून खंडाळ्याला गेलो. खंडाळा रेल्वे स्थानकावरून वापरात नसलेले रूळ वर चढत जातात, तिथून वर चढत गेलो आणि थोडयाच वेळात टाटांची धरणाची एक टाकी लागली, तिथुन एका पायवाटेने डोंगर चढत गेलो आणि अर्ध्याच तासात एका खिंडीत आलो. इथे उजव्या डाव्या बाजूला डोंगर दिसतात आणि वाट मात्र खाली उतरत जाते. अजुन थोडा पाऊस झाला की इकडे छान धबधबे असतात. समोरच पुढे कुरवंडे गाव, आय एन एस शिवाजीची वसाहत वगैरे दिसते. उजवीकडे एक डोंगराची सोंड खाली उतरलेली दिसते, तीही ओलांडुन पुढे गेल्यावर मग उजवीकडे चढाई सुरू करायची असे मला बऱ्याच पुर्वीच्या अनुभवावरून आठवत होते. पण दगडांवरचे बाण मात्र आत्ताच उजवीकडे जा असे दाखवत होते, एक नवी वाट बघायला मिळेल म्हणून तिकडुन निघालो.


जेमतेम चार दिवसांच्या पावसाने निसर्ग केवढे रूप बदलू शकतो ते पावलापावलाला जाणवत होते. सर्वत्र हिरवेगार झालेले, ओढे, ओहळ यातही थोडेफार पाणी, ठिकठिकाणी खेकड्यांची बिळे आणि त्यातून लगबग करणारे चांगलेच मोठे लाल, पिवळे, नारिंगी खेकडे. ते बघुन काहींच्या तोंडचे पाणी पळाले तर काहींच्या तोंडाला पाणी सुटले. सोपा, छोटा ट्रेक म्हणून फारच रमत गमत प्रवास चालू होता. सह्याद्रीच्या काळया बेसाल्ट खडकामध्ये काही ठिकाणी झिऑलाईट खनिजांमुळे पांढरेशुभ्र पासून ते रंगांची अक्षरशः जादुई उधळण असलेले स्फटिक आढळतात. हा भाग तर अशा दगडांचे माहेरघरच वाटत होते. एरवी आम्ही बरोबरचे वजन कमी करण्यासाठी धडपडत असतो, पण आज माझ्या सहप्रवाशांनी माझ्या विरोधाला न जुमानता असे आवडतील तेवढे दगड गोळा करून माझ्याच पाठीवरच्या सॅकमध्ये भरण्याचा सपाटा लावला होता. वाहून नेण्याचे कष्ट घ्यावे असे ते दगड सुंदर मात्र नक्कीच होते.


तासाभरात चढण चढुन एका निमुळत्या सोंडेवर आलो आणि बाण व वाट दोन्हीही संपले. आम्ही धाकल्या नागफणीच्या सुळक्याच्या खाली आलो होतो, उजवीकडे सरळसोट वर आणि तेवढाच खोल खाली जाणारा नागफणीचा काळा कुळकुळीत राकट सुळका भिववत होता. त्यातल्या त्यात वर जाण्याचा आम्ही थोडा प्रयत्न केला, एका उंचीवर पोहोचल्यावर ते अशक्य आहे असे लक्षात आले आणि पुन्हा निमुळत्या सोंडेवर आलो. या ठिकाणी आलो हे एका परीने चांगलेच झाले, कारण प्रत्यक्ष नागफणीवरून आजूबाजूचे गिरीवैभव फार सुरेख दिसते पण आपण कुठे  बिकट सुळक्यावर आहोत तो 'फील' काही येत नाही, तो इथुन छान येतो.


परत फिरलो, आणि भराभर पावले उचलत पुन्हा पाठीवर जाणारी वाट शोधली, तिथे आता वरच्या स्वयंभू महादेवाबद्दल माहिती देणारी एक छोटी कमान टाकली आहे, त्यामुळे लगेच लक्षात येते.  वर चढु लागलो तर उरलेसुरले धुकेही गायब होउन उन पडले होते, आणि आम्ही वरूणराजाची आळवणी सुरू केली होती. अर्ध्या तासाच्या सोप्या चढाईनंतर माथ्यावर दाखल झालो.


माथ्यावर एक पिटुकले शिवमंदिर आहे, आणि कातळात मोठे रांजणखळगे आहेत, वेगवान नद्यांच्या पात्रात सापडणारे हे खळगे इथे कसे आले कळले नाही. त्याच्या थंडगार पाण्यात पाय सोडुन बसलो. गोविंदा नावाच गुराख्याच आठ दहा वर्षाच एक पोरग आपल्या गाई खाली चरायला सोडुन वर पळत पळत आलं होतं. त्याच्याशी गप्पा मारल्या, आजुबाजूच्या दुर्गम गावांची नावे आणि वाटा कळल्या. आज पाऊस नाही येणार का अशी त्याच्याकडेही विचारणा केली. त्याने गंभीरपणे अंदाज घेतला आणि अर्ध्या तासात येईल म्हणाला. आम्हाला पलिकडच धुक बघुन कळत म्हणाला आणि मग आता पाऊस येईल, जातो मी म्हणून निघुनही गेला.


आम्हाला तरी ढग दिसत नव्हते. नागफणी हे या परिसरातले सर्वोच्च आणि तसे एकांडे शिखर. त्यामुळे चौफेर लांबवर दिसत होते. खाली आम्ही आधी गेलो होतो ती दरीतली सोंड दिसत होती. उत्तरेला लोणावळा, खंडाळा, तिकडुन पश्चिमेकडे उतरणारा घाट, द्रुतगती महामार्ग थेट खोपोलीपुढच्या टोलनाक्यापर्यंत, नागमोडी रेलवे मार्ग आणि बोगद्यात शिरणाऱ्या गाड्या, त्याच्या बरोबर पलिकडे या बोरघाटावर लक्ष ठेवणारा राजमाची आणि त्याच्या श्रीवर्धन आणि मनरंजन बालेकिल्ल्यांची जोडगोळी, त्यांच्याही मागे थरारक ढाक. इकडे दक्षिणेकडे सुधागड, सरसगड, अस्पष्टसा कोराईगड, पुर्वेला लोहगड आणि विसापूर तर बाजूला तुंग. हे सर्व वैभव बघायला तर छानच आहेत, पण आता त्यांना ओळखतो, या सर्व ठिकाणी जाऊन आलो, त्यामुळे तर अजुनच छान वाटते.


बरोबर अर्ध्या तासात खरच ढग गोळा झाले आणि पाऊस पडू लागला. एक एक डोंगर लुप्त झाले. खालच्या दरीतून भसाभस धुके वर येऊ लागले आणि मग समोरचे सुद्धा काही दिसेनासे झाले. बरोबर भिजण्याचा आनंद देण्यापुरताच पाऊस पडला आणि मग गेला पण. जेवण आणि वामकुक्षी आटपून आम्हीही निघालो, मात्र खंडाळ्याला न जाता समोर दिसणाऱ्या कुरवंडे गावात गेलो, तिथुन लोणावळा चारच किमी आहे. आम्ही जीपने स्थानक गाठले आणि मग प्याशिंजरने पुणे.


जरा धो धो पाउस पडला की बाकी सर्वांनाच तिकडे घेउन जायचा बेत आहे...


मी न काढलेली काही छायाचित्रे..


नागफणी आणि खाली आम्ही आधी गेलो ती सोंड


नागफणी


माथ्यावरचे छोटेसे देऊळ