कुतुहल, मॅट्रिक्स आणि अनुदिनी

यांचा परस्परसंबंध काय आहे ह्याबाबत आपले कुतूहल जागृत झाले असेल.


कुतूहल या विषयाबद्दल मला नेहमीच कुतूहल वाटत आलेले आहे. झाडावरून पडणा-या सफरचंदाचे कुतूहल असल्याने न्युटनला गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. तर कोप-यात गुणगुणा-या माशीच्या उडण्याच्या कुतुहलाने रेने देकार्तने भूमितीचा चेहरामोहरा साफ बदलून टाकला.

असे हे कुतूहल कसे निर्माण होते? त्याची कशी वाढ होते? असे अनेक विचार मला ब-याच वेळा सतावतात. ते काही असले तरी कुतूहल हा प्रतिभेचा आवश्यक घटक म्हणायला हरकत नाही. कुतुहलापोटी शेकडो प्रश्न विचारून भांडवून सोडणारी गोंडस बालके कुणी पाहिली नाहीत? मौज म्हणजे आपण मोठे होईतो त्याच प्रकियेतुन गेलेलो असतो. फरक इतकाच की लहानपणी असणा-या कुतूहलाचे स्वरूप उद्गारवाचक चिन्हासारखे उत्साहवर्धक असते. मोठेपणी बहुतांश ह्याच कुतूहलाचे रूप अंमळ प्रश्नार्थक चिन्हासारखे होऊन कपाळावर आढ्या येतात. बहुधा यामुळेच तुकोबरायांनी "लहानपण देगा देवा" असे साकडे घातले असावे. पण, आपण हे उत्साहाचे स्वरूप जर का जपून ठेवू शकलो तर त्यासारखी आनंददायी गोष्ट नाही. थोडी कल्पनाशक्ती ताणून असेही म्हणता येईल की नियोला जगाकडे पाहण्याची जी दृष्टी प्राप्त होते, काहीसं तसंच. सविस्तर सांगतो. मॅट्रिक्स चित्रपटाच्या प्रथम भागात अखेरीस गोळ्या लागल्यावर क्षणभर गेल्यासारखा वाटणारा नियो उठतो. तेंव्हा त्याला सगळं जग अंकांच्या स्वरूपात दिसायला लागतं. स्मिथ आणि इतर हेर त्याच्यावर गोळ्यांचा वर्षाव करतात. पण, नियो केवळ एक हात दाखवून त्या गोळ्या काही अंतरावरच हवेतच थांबवतो.


येथे आपल्याला मॉर्फियसची एक उक्ती आठवते. जेव्हा नियो त्याला प्रशिक्षण सुरू असताना विचारतो की मॅट्रिक्सचा अर्थ कळल्यावर तो गोळ्यासुद्धा चुकवु शकेल काय. त्यावर मॉर्फियस त्याला म्हणतो की जेव्हा नियोला मॅट्रिक्स काय आहे हे उमगेल तेंव्हा त्याला गोळ्या चुकवायचीसुद्धा गरज पडणार नाही. एखाद्या सुमार हिंदी चित्रपटात नायक एका हाताने गोळी अडवतो तसा काहीसा वाटणारा हा प्रसंग मॅट्रिक्समध्ये एक वेगळाच अर्थ घेऊन येतो. एका हाताने गोळी अडवण्यातून दिग्दर्शकाला हेच सूचीत करायचे आहे की ती गोळी प्रत्यक्ष अस्तित्वात नाही. तर, नियोच्या सर्व ज्ञानेंद्रियांना होणारी दृष्टी, ध्वनी, स्पर्श, चव, गंध इत्यादींची अनुभूती काय आहे हे मॅट्रिक्सची आज्ञावली ठरवतेय. जणू एखादा चित्रपट त्रिमितीय  स्वरूपात पाहावा तसे. परंतु, जे दिसतेय ते खरे नाही "यदृष्टम् तन्नष्टम्" या सिद्धान्तासारखे. एकदा नियोला स्वतःच्या ख-या रूपाची जाणीव झाली की त्याच्या दिशेने झेपावणारी गोळी ही सत्य वाटणारी असत्य संवेदना आहे हे त्याला कळेल. अर्थातच तो त्या गोळीला केवळ हात दाखवूनच अडवू शकेल.


नियोला जशी एक दृष्टी प्राप्त झाली तशा जगाकडे पाहण्याच्या विविध दृष्टी कुतूहलाचे सकारात्मक रूप आपल्याला प्राप्त करून देते. त्यांतूनच हे विश्व कधी अंकांनी भरलेले आहे असे दिसते. तर कधी सर्वत्र केवळ सुरांचाच संचार दिसतो. अवचित शब्दांच्या राशी दिसायला लागतात. त्यामुळे कुतूहल ही चांगली वृत्ती आहे असे म्हणण्यास हरकत नसावी. आता काही लोकांचे कुतूहल आपल्या कुतूहलापेक्षा इतकं वेगळं असतं की आपल्याला वाटतं "अरेच्च्या! हा काय कुतूहलाचा विषय आहे?" आज मायाजालाची सफर करताना असंच काहीसं झालं.


चार संशोधकांच्या चमूने लोक अनुदिनी का लिहितात या विषयावर संशोधन करून चक्क एक शास्त्रीय लेख लिहिलाय. त्यासाठी त्यांनी अनेक अनुदिनीकारांच्या मुलाखती घेतल्या आणि त्यांच्या रचनांचे विश्लेषण केले. संशोधनाचा सारांश इतकाच की लोक स्वतःचे आयुष्य, मतप्रदर्शन, भावना व्यक्त करणे, कल्पनांचे विकसन आणि समाजाचा सक्रिय घटक होण्यासाठी अनुदिनी लिहितात. आता बोला! आहे की नाही हाडाचे संशोधक?


मणभर काथ्याकूट तात्त्विक चर्चेचा
अन् डोंगर पोखरून उंदीर काढला


हीच उक्ती तुम्ही या लेखाला देण्याआधीच लेखणी आवरतो, :)


 


ता.क. - विंडोज एक्सपी मध्ये टंकन करतांना "य" सोबत येणारा हलन्त "र" चा विशेष प्रकार कशा प्रकारे द्यावा? तेथे इनस्क्रिप्ट हा टविस (टंकन विधिका संपादक) आहे. सध्या मी सरळ ऋण चिन्ह म्हणजे "-" वापरतो.