'सत्यकथे' च्या एका जुन्या अंकात रविराज गंधे यांनी लिहिलेले हे स्फुट. मराठी लिखाणाचा हा एक वेगळाच बाज...
एका बड्या मासिकात माझी कथा आली. आईला दाखवली. तिनं ती वाचून पोस्टकार्ड दिल्यासारखी परत दिली अन म्हणाली "ह्या धंद्यात काही राम नाही. तू म्हशी विकत घे!"
- एक संवाद कानी पडला. पाच वर्षे वयाचा मुलगा तीन वर्षाच्या मुलाला म्हणत होता "अरे! गोडं तेल आठ रुपये वीस पैसे झालं!"
-आज चमत्कारच झाला. आमच्या समोरची, लाल डूल आणि निळा स्कर्ट घालून थेट दांडीवरून सायकल चालवणारी कमल, तब्बल सहा वर्षांनी तिच्या सासरहून घरी आली. माजघरात आईला म्हणत होती, "साखरेत चार लवंगा टाकल्या म्हणजे मुंग्या लागत नाहीत."
- परवा नेन्यांकडं देवघरात पाहिलेली केशवपन केलेली, गंध उगाळणारी तरूण बाई डोळ्यासमोरून जात नाही.
-काल बाळ्या घाईघाईत सायकलची किल्ली देऊन गेला, पण ती फक्त उलटी लागते हे सांगायचं विसरला.
-दोन तास झाले, समोर उलट्या पडलेल्या चपलेमुळे अभ्यासात लक्ष लागत नाही.
-आज जेवताना आई बाबांना म्हणाली, "शोभाला आता स्थळं पाहायला पाहिजेत." बाबा म्हणाले "हो." त्यावर आई म्हणाली, "'हो' काय? तुम्हाला तर फक्त तोंडासमोर वर्तमानपत्र धरून बसता येतं!"
-सकाळी बाळ्याला एक धपाटा घातला. भिंतीवर नखं ओढत होता!
- दाढी करता करता सहज पाहिलं, तर बाबा एका पाकिटावरचं शिक्का न लागलेलं तिकीट काढत होते.
- परवा डेक्कनवर सुधीर एकदम ओरडला, "अरे! हाच तो कंडक्टर, त्या दिवशी पाच पैसे सुटे नाहीत म्हणाला!"
-मोलकरीण आईला म्हणत होती "रेशनची ज्वारी तुम्ही सोडणार आहात काय?"
- आमचे एक दूरचे नातेवाईक वारल्याचं कळालं. आई म्हणाली, "पत्र लिहायला पाहिजे."
-काल काका भेटले. म्हणाले,"म्हातारपण वाईट! सूनबाईला किती सांगितलं, अगं मूठभर जांभळं आण. आताशा बाजारात छान येतात."
- एकदा आमच्या शेजारचे लेले म्हणाले, "आपले क्रिकेटीयर काय पण विटीदांडू खेळतात! पण बाईंच्या पॉलिसीज बरोबर आहेत हां! अहो ! 'कोशिश' मध्ये संजीवकुमारनं काम काय तोडलंय! अरे! नळ आला वाटतं? चला, पाणी भरायला!"
- आई जेंव्हा देवघरातल्या समईवर हळदीकुंकू वहाते तेंव्हा त्यातून लालपिवळ्या सुंदर ठिणग्या उडतात.
- नेवाशाला असताना एकदा असाच झडझडून पाऊस आला अन माळवदावर वाळत घातलेले कपडे काढायला बाळ्या धावला. खूप मजा आली. कितीतरी वेळ पागोळ्या पडणारं पाणी आम्ही पाहत होतो. मग आईला म्हणालो, "आता गरम गरम धिरडी कर!"
- आमच्या फरसबंदी अंगणात एकदा पिंपळाचं हिरवं रोप तरारलं. त्याला आळं करावं म्हणून मी एक फरशी काढली तर मुळाभोवती लालजर्द गांडुळं वळवळत होती.
- अभ्यंगस्नानाच्या वेळी भल्या पहाटे उठून स्नान केल्यानंतर मग काय करायचं? हा प्रश्न मला ह्या दिवाळीतही सुटला नाही.
- बाळ्याला एकदम फटाक्यांची लड उडवलेली आवडत नाही. हिरवे, लाल लवंगी फटाके सुटे करून खिशात ठेवतो; अन उदबत्ती घेऊन एक एक वाजवतो. लाल फटाके जोरात वाजतात, असं तो म्हणतो.
- मला तर फटाक्यावरच्या लक्ष्मीच्या - रामाच्या चित्रांच्या चिंध्या झालेल्या पहावत नाहीत.
- आमचा पिंटू फटाक्याला फार घाबरतो. दिवसभर नुसत्या गुलकाड्या पेटवतो.
- आमच्यकडे मुंबईचे पाहुणे आले होते. त्यांनी मला सिगरेटी आणायला सांगितलं. आमचा नेहमीचा दुकानवाला त्यानंतर माझ्याकडे पाहिनासा झाला.
- काल आई मोरीत पडली. चष्म्याची काच फुटली. वडील म्हणाले, " आता एक तारखेनंतर आणू."
- बाळ्या कटींग करून आला. एकदम पांडू स्टाईल! दिवसभर कटलाइनीवरून उलटा अंगठा फिरवीत होता.
- दूधवाल्याचं म्हणणं असं की, "गेल्या रविवारी मी पाव लिटर जादा घातलं." तर आई म्हणते, " गेल्या रविवारी आम्ही इथे नव्हतोच." तो म्हणतो, " अहो..." आइ म्हणते, "तुझं दूध आम्हाला नको!"
-काल आई वेगळं अंथरूण भिंतीशी घालून पडली होती. मी म्हणलं, "काय झालं?" आई म्हणाली, " कावळा शिवला!" मग आमचा छोटा बाळ्या कपडे काढून तिच्याजवळ गेला.
-परवा रात्री बाबा कसला तरी हिशेब करीत होते. आई म्हणाली, "इतकं कर्ज झालंच कसं? तुमचा कारभारच असा!"
-येत्या रविवारी कॉलेजची ट्रीप महाबळेश्वरला जाणार आहे. सुधीर म्हणाला, " येणार का?" मी म्हणलं, " पाह्यलंय!" त्याला खरंच वाटलं.
- बाबांनी आज एक चांदीचा पेला गहाण ठेवला. माझ्या लक्षात आलं. पैशाचा कागद रेडीओखाली ठेवला होता. "तुमचा जन्मजात स्वभावच असा पडला. तुम्हाला जमलंय काय! त्या सान्यांचं पहा जरा..." मी माजघरात येताच आईची वाक्यं बंद पडली अन बाबा अपराध्यासारखे निमूटपणे बाहेर आले.
- रात्री मला अचानक जाग आली. आई रडत होती अन बाबा तिच्या डोक्यावरून हात फिरवीत, " पुढल्या महिन्यात ओव्हरटाईम आला की आणू" असं कायसं म्हणत होते.
- आज बाबांचे सेव्हिंग सर्टिफिकेटचे पैसे आले. आई म्हणाली, " पावशेर खवा आण."
- बाबा म्हणाले, " 'नटसम्राट' चे दर पार आहेत. आज आपण श्रुतिका लावू."
- अलिकडं शोभी वाजवीपेक्षा जास्त वेळ आरशासमोर उभी असते. सटकावली पाहिजे.
-बशीतल्या गाजरांच्या रोपाला काल पाणी घातलं नाही म्हणून शोभी भडकली. मी म्हटलं," तू घालीत जा!"
_रोज घरी येणारा पोस्टमन थिएटरवर सिव्हिलमध्ये दिसला. क्षणभर ओळखलंच नाही.
- आईनं दाणकन स्टोव्ह माझापुढं आदळला अन म्हणाली, "पहा रे आज काय अंगात आलंय याचा!"
_ आयुष्यात पहिल्यांदा कुत्र्यांची कीव आली. दुपारी चौकात अट्टी पडली होती अन पोरं मधे दगड घालीत होती.
- परवा वाईचे खोत म्हणून आले. म्हणाले, "जालन्याचे इरिगेशनमधले देशपांडे तुमचे कोण? त्यांची मुलगी बीडला दिक्षितांना दिलीय पहा अन मुलाची नुकतीच मुंबईला रिझर्व बँकेत बदली झालीय. प्रमोशन मिळालं ना! पण मुलगी चांगल्या घरी पडली हो! सासरे चीफ ऍडीशनल जज्ज आहेत रत्नांग्रीला!" मी म्हटलं, "चहा घ्या."
_काल पोरांची गाण्याची बैठक झाली. बाळ्याला म्हटलं, "गाणं म्हण" जाम म्हटलं नाही. प्रोग्राम झाल्यावर सतरंजी झटकताना मत्र गुणगुणत होता.
-वरणाला फोडणी दिल्यानंतर आई पुन्हा थोडं वरण पळीत घालते. आपल्याला काय, दोन वेळा मस्तपैकी चर्र ऐकायल मिळतं.
-शोभी गणितात नापास झाली. विचरलं तर म्हणाली, "त्या दिवशी तुळशीचं पान खाल्लं नव्हतं."
-आज मामा आले. चहा पाणी झाल्यावर म्हणाले, "अरे, तो पिशवीतला आंबा काढ."
-संध्याकाळी एक स्कूटरवाला मित्र वह्या घ्यायला आला होता. आई म्हणाली, "कोण आहे हा?"
- शोभीचं आज सरकारी दवाखान्यात टॉन्सिल्सचं ऑपरेशन झालं. दिवसभर आईसक्रीम खात होती.
- सकाळी उठल्यावर आपल्या अंगावर दोन चादरी कशा येतात हे मला काल कळलं. आई पहाटेच उठते.
-वडील जेवताना गंभीरपणे म्हणाले, "आता तुला हातपाय हलवायला पाहिजेत! माझी सर्व्हिस संपत आली." त्या दिवशी मी खूप लांब फिरायला गेलो.
-वडील आज पुन्हा म्हणाले, "मला पेन्शन वगैरे मिळणार नाही. आपण काहीतरी धंदा सुरु करु."
- मी अर्जांचा सपाटा लावला. रोज मारुतीला जायला लागलो.
- आश्चर्य! आज रेव्हेन्यूत क्लार्कची नोकरी मिळाली. वडील जाम खूष झाले. म्हणाले," शेरभर गुलाबजांब आण." आई म्हणाली, "देव पावला!"
- आज जेवताना वेगळच वातावरण होतं. हेडक्लार्क बडवेची कशी तासली हे वडील सांगत होते; तर शिपाई माझ्या टेबलावर किती आदबीनं कागद ठेवतो, हे मी खुलवून सांगत होते. सगळे आनंदी होते. शोभी-बाळ्या आताच नव्या कपड्यांचा क्लेम लावत होती. आई आग्रह करकरून वाढत होती. सर्वजण मनमुराद हसत होते आणि इतिहासातली पानं मात्र आम्हाला उल्लू बनवून हसत होती.