सिर्फ 'पेज थ्री'!

सकाळी,सकाळी
दाराखालून माझ्या घरात सरकवलं जातं
वर्तमानपत्र नामक एक तप्त वाळवंट
ज्याच्या पाना-पानावर पसरली आहे
रक्तपात,खून,दंगली,स्फोट,जाळपोळ,
अन्याय,अत्याचार,आत्महत्या,बलात्काराच्या बातम्यांची
तापलेली वाळू.....
ज्यावरून फिरणारे माझे डोळे भाजून निघतात
आणि नजर तहानेनं कोरडी होते.


तळवे भाजलेल्या माणसागत टाचेवर चालणाऱ्या डोळ्यांना
अचानक तिसऱ्या पानावर गवसतं
'पेज थ्री' नावाचं एक हिरवळीचं नंदनवनी बेट
ज्यावर सुखशीतल गारवा असतो आणि
या बेटावर चालू असते 'पार्टी'नामक
एक 'उत्सव' अहर्निश,
जिथे तंग कपड्यातल्या मादक ललना हसत खेळत
बिलगत असतात
हातात फेसाळत्या मद्याचे प्याले मिरवणाऱ्या
लक्षाधीश,मस्तवाल पुरुषांना!

या बेटाच्या गावीही  नसते
भोवतालचे तापलेले वाळवंट...
मी तिरिमिरीने भिरकावून देतो
ती सारी वाळवंटी पाने..

बस्स! आता ठरलं!
मी सांगणार वर्तमानपत्रवाल्याला
'उद्यापासून माझ्या घरी
टाकायचं फक्त तिसरं पान..सिर्फ 'पेज थ्री' !
फक्त गारवा,मादक ललना आणि मद्याचे प्याले!'

(बाकी तापलेली वाळू टाक माझ्या फुकट्या शेजाऱ्याकडे
 नाहीतरी लेकाचा रोज माझंच वर्तमानपत्र नेतो वाचायला!)


(जयन्ता५२)