ऐकावे ते नवलच-जगप्रसिद्ध पूल

          नवेनवे तंत्रज्ञान वापरून पूल बांधण्याचे प्रयत्न नेहमीच सुरु  आहेत .  पुणे विद्यापीठाजवळच्या उड्डाण पुलावरून  सुरु झालेली चर्चा वाचून जगातील काही प्रसिद्ध पुलांचा आढावा घ्यावा असे वाटले. त्याअनुशंगाने विविध पुलांचे बांधकाम, त्यांची वैशिष्टे आणि वापरलेले तंत्रज्ञान याची तोंडओळख करून घेऊ.  आपल्यापैकी काहींना याची माहिती असेल तर काहींना हयामुळे नवीन माहिती मिळेल अशी आशा वाटते.  या लेखामध्ये ऐतिहासिक पुलांची व अभियंत्यांची ओळख करून घेऊ.


इतिहास


                रोमनांनी लाकडाऐवजी दगड वापरून पहिल्यांदा अधर्वतूळाकार कमानीचे पूल बांधले.  ह्या प्रत्येक अर्धवर्तुळाकार कमानीचा परीघ(स्पॅन) साधारण १३० फूट असे. हे पूल साधारण पाच शतकांपर्यंत वापरात होते.  त्यापैकी तर काही अजुनही रोममध्ये आहेत. त्यापुलांवर लाकूड व लोखंडाचा आधार घेऊन पुन्हा बांधकाम केले आहे.  रोमन साम्राज्याचा जसा जसा विस्तार झाला तसे तसे त्यांचे तंत्रज्ञान जगात इतर भागातही पोहोचले आणि युरोपात अनेक अविस्मरणीय असे दगडी व लाकडी बांधकाम असणारे  पूल उभारण्यात आले.   रोममधील सर्वात जुना पूल ख्रिस्तपूर्व काळात ६२ ला बांधण्यात आला त्याचे नाव 'क्वाट्रो कॅपी' असे आहे.  ज्युलियस सिझरने ऱ्हाईनलॅंड येथे एक १००० फूट लाकूड व दगडाचा पूल दहा दिवसात उभारला अशी नोंद आहे.  


               इ‌. स. १३४ मध्ये हॅड्रियन राजाने रोममध्ये बांधलेला पूल आजही आहे.  टिंबर नदीवर असणाऱ्या ह्या पुलाचे नाव पूर्वी 'ऍलियस ब्रिज' असे होते. सतराव्या शतकात त्या पुलावर देवदुतांची शिल्पे लावण्यात आली. त्याचे नामकरण सेंट अँजलो ब्रिज असे केले गेले.


स्पेनमध्ये रोमनांनी काही मोठे पूल बांधले. टॅग्स नदीवर असणारा अलकॅनटारा पूल १९ शतकानंतरही अजुनही आहे. स्पेनच्या पर्यटनखात्याकडून त्याची मुद्दाम जाहिरात केली जाते. हा पूल ग्रॅनाईटच्या ३० फूट रुंदीच्या व ३० फूट खोलवर असणाऱ्या खांबांवर उभारला आहे. त्याची उंची नदीच्या पात्रापासून १७० फूट आहे.


अठराव्या शतकातील औद्योगिक क्रांतीनंतर अवजड अशा मालवाहू आगगाड्यांची वाहतूक करता येईल असे पूल असणे आवश्यक होते. अशा क्षमतेचे फक्त लोखंडच होते. इग्लंडमध्ये १७७९ मध्ये 'आयर्न ब्रिज ' नावाचा पूल पोलादापासून अर्धवर्तूळाकार कमानीचा बनवण्यात आला. पोलादापासून तयार झालेल्या रूंद पुलांमूळे नदीला येणारे पूर व हिमवृष्टि याने होणारे सामानाचे नुकसान कमी झाले.


              ब्रिटिश अभियंता थॉमस टेलफोर्ड याने स्कॉटलँड मध्ये 'बोनॉर ब्रिज' बांधला.  त्याच्या नवीन तंत्रज्ञानामुळे थॉमसला पोलादी पुलांचा जनक असे समजण्यात येते.  त्याचा परीघ १५० फूट होता, खर तर आधीच्या तंत्रज्ञानानुसार त्याला दोन मोठाले खांब नदीला पात्रात उभारावे लागले असते पण पोलादामुळे व थॉमसच्या तंत्रज्ञानाने अशी गरज भासली नाही. असे रूंद परीघाच्या कमानीचे नाविन्यपूर्ण तंत्र अवलंबणारा टेलफोर्ड एकटाच होता. १८१४ साली त्याने स्पे नदीवर स्कॉटल्ड मधे बांधलेला पूल कर्णाचे(डायगोनल मेंबर) तंत्र असलेला सर्वात जुना पूल आहे. मोडकळीस आलेल्या लंडन ब्रिजकरता थॉमसच्या कलाकृतीला मान्यता मिळाली असती तर आज तो स्थापथ्य शास्त्रातील विशेष पूल म्हणून गणला गेला असता पण दुर्दैवाने तसे झाले नाही.  इ‌.स. १८२६ मध्ये थॉमसने वेल्स मध्ये लोखंडी साखळ्यांचा मेनाई ब्रिज बांधला. ह्या पुलाला सर्व आधुनिक पुलांमधील पहिला मानण्यात येते. थॉमसने दगडी कमानी ऐवजी लोखंडी साखळ्यांचा सर्वप्रथम उपयोग केला होता.


         प्रसिद्ध स्थापत्यतज्ञ गुस्तोव आयफेल याने पोर्तुगालमध्ये 'पाय मारिया' नावाचा पूल बांधला.  त्यामुळे आयफेलचे युरोपातील मुख्य पूल बांधणाऱ्या अभियंत्यात नाव झाले. त्याच दरम्यान अमेरिकेत जॉन रोबलिंग हा अभियंता पूल बांधण्याच्या नव्या तंत्रज्ञानामुळे उदयास आला.  लोंबत्या पुलासाठी लोखंडाच्या तारा वापण्यास त्याने सुरुवात केली व त्या तारांच्या निर्मितीचा कारखाना त्याने सुरू केला.  ८२१ फूट लांबीचा नायगारा धबधब्यावरील लोंबता पूल जॉनने १८५५ साली पूर्ण केला.  त्याने बांधलेला ओहायो नदीवरचा सिनसिनाटी पूल हा न्यूयोर्क मधील ब्रुकलीन ब्रिजची छोटी प्रतिकृतीच.  १८८३ साली जॉन ने पूर्ण केलेला 'ब्रुकलिन ब्रीज' हा पुलांच्या तंत्रज्ञानात जागतिक स्तरावर नावाजला गेला.


यापुढील लेखात युरोपातील व काही आल्पमधील पुलांची माहिती पाहू या. वाचकांपैकी कोणाला या विषयी अधिक माहिती असेल तर प्रतिसादात जरूर द्या अशी विनंती. नायगारा पूल व ब्रुकलीन ब्रीज येथे पहाता येतील.


नायगारा व ब्रुकलीन ब्रीज


क्रमशः