फुटबॉल आणि भारत

         आणखी दोनच दिवसात म्युनीच, जर्मनी मध्ये होणाऱ्या फुटबॉल विश्वचशकाच्या अंतिम सामान्यात नवा जगज्जेता उदयास येईल. अर्थातच तो नवा नसेल कारण फ्रांस ने याआधी एकदा तर इटली ने तीन वेळा विश्वचशक जिंकला आहे. तरीसुद्धा पुढील चार वर्षे ते जगज्जेते पदाचे बिरुद मोठ्या अभिमानाने जगभर मिरवतील. जगांतल्या ह्या सर्वात मोठ्या स्पर्धेत (फिफा ह्या जागतिक फुटबॉल संघटनेचे ऑलिंपिक आणि युनो पेक्षा जास्त सदस्य देश आहेत!) भारताचे कुठेच नाव नाही हे बघून फार वाईट वाटले आणि म्हणूनच हे लिहावेसे वाटले.



       तसे पहिले तर फुटबॉल भारताला नवा नाही. 'ब्रिटिश राज' काळात क्रिकेट आणि फुटबॉल हे दोनही खेळ इंग्रजांनी भारतात आणले (अंदाजे १८८० च्या सुमारास) आणि देशभर पसरवले देखिल. भारतातील राष्ट्रीय फुटबॉल लिग ची स्थापना फिफा च्या आधी झाली आहे. कलकत्यातील मोहन बागान हा ११५ वर्षे जुना क्लब आहे (लिव्हरपूल फुटबॉल क्लब आणि रेआल माद्रिद ह्या दोघानं पेक्षाही जुना!) तर तिथलाच ईस्ट बंगाल हाही क्लब सध्या नव्वदीत पोहचला आहे. मोहन बागान आणि ईस्ट बंगाल मधल्या सामान्याची तुलना फक्त भारत - पाकिस्तान मधील क्रिकेट सामान्याशीच करता येईल. खरे तर आजही भारतात घरगुती (डोमेस्टिक) क्रिकेट म्हणजे रणजी वगैरे पेक्षा घरगुती (डोमेस्टिक) फुटबॉलच जास्त लोकप्रिय आहे. 
       भारताचा संघही १९६० पर्यंतच्या ऑलेंपिक मध्ये पात्र होत आला आहे. १९५० मध्ये तर भारताला ब्राझिल मध्ये खेळळ्याचे आमंत्रणही मिळाले होते. पण लांब प्रवास आणि पायात काहीही न घालण्याच्या सवयी मुळे आपला संघ पुढे जाऊ शकला नाही. तरीही भारताचे फुटबॉल मधील अस्तित्व त्यावेळी जाणवण्यासारखे होते.



      आज मात्र भारताचा फुटबॉल मधील जागतिक क्रमवारित ११० च्या वर नंबर लागतो. १ अब्ज लोकसंख्या असलेल्या ह्या देशचा संघ फुटबॉल मध्ये छोट्या छोट्या आशियाई देशांच्या सुद्धा पुढे नाही (मालदिव सुद्धा आपल्यापुढे आहे!!). क्रिकेटच्या लोकप्रियते पुढे ज्या अनेक चांगल्या खेळांची भारतात पीछेहाट झाली त्यांत फुटबॉलही  (जो जगातला सगळ्यांत लोकप्रिय खेळ आहे) असावा हे फार दुर्देवी आहे. मी हि क्रिकेट चा निःसीम चाहता आहे पण फुटबॉलमधली मजा काही औरच आहे. तसे पाहता क्रिकेटच्या तुलनेत फुटबॉल बऱ्याच गोष्टींत आघाडीवर आहे. उदाहरणार्थ:



१. फुटबॉल ला क्रिकेट पेक्षा खर्च कमी आहे.
(जर क्रिकेटचा संपूर्ण संच आणायचा ठरवला तर तो काही हजार रुपयांत जाईल. तसेच गल्ली बोळात खेळल्या जाणाऱ्या बॅट आणि बॉल चा खर्चही साध्या फुटबॉल पेक्षा जास्त आहे.)
२. फुटबॉल चे मॅदान क्रिकेट पेक्षा छोटे असते. (तसेच जसं गल्ली बोळात क्रिकेट खेळता येतो तसं फुटबॉल ही खेळता येतो.)
३. फुटबॉल ला लागणारा वेळ हा क्रिकेटला लागणाऱ्या वेळेपेक्षा खूप कमी आहे.
४. फुटबॉल हा न थांबता खेळतात तर क्रिकेट थांबत थांबत चलतो. (खेळातील लय हि फुटबॉल मधे अधिक त्यामुळे खेळातला थरार हा प्रत्येक सामन्यात अगदी शेवटच्या क्षणापर्यंत अनुभवता येतो.)


(तसे क्रिकेटचे ही बरेच फायदे आहेत पण ते इथे मांडायचे नाहीत. क्रिकेटच्या ५ दिवसाच्या टेस्ट सामन्यात शारीरिक क्षमतेचा जो संपूर्ण कस लागतो त्याला कशाचीच तोड नाही.)


         तसे पहिले तर क्रिकेट हा उच्चभ्रू लोकांचा खेळ होता तर फुटबॉल हा सर्वसामान्य खेळ होता आणि आजही आहे. माझ्यामते क्रिकेट फुटबॉलपेक्षा भारतात लोकप्रिय होण्याचे महत्वाचे कारण भारतीयांच्या मानसिकतेत आहे. आपल्याला गोष्टी पॉश (मराठी शब्द सुचला नाही) असल्या तरच आकर्षित वाटतात. कींवा पॉश असलेल्या लोकांनी केलेल्या गोष्टींची आपल्याला नक्कल करायला आवडते. म्हणुनच इंग्रज ऑफिसर आणि त्यांच्या तावडीतील आपल्या राजे रजवाड्यांनी आपलासा केलेला क्रिकेटचा खेळ आपल्याला जास्त आवडला. (फुटबॉल इंग्रज शिपायानं मध्ये जास्त लोकप्रिय होता असे वाचनात आले.) (एकता कपुर च्या लोकप्रिय मालिका आणि बी आर चोप्रा चे सिनेमे हेच तर दाखवतात, सगळ्यां श्रीमंतांच्या कथा आणि म्हणुनच ते गाजले.)


अर्थात ही फक्त क्रिकेट लोकप्रिय व्हायची एक शक्यता आहे.


          आपणही खेळाला किती प्रोत्साहन देतो त्याचाही विचार केला पाहिजे. खेळायला बंदी नाही पण दहावी बारावीला चांगले गुण मिळवायची अपेक्षा काही थांबत नाही. रोज संध्याकाळी १-२ तास खेळून तेंडुलकर, पेले बनत नाहीत हे तर सगळे जण जाणतात मग आपण तरी ऑलेंपिक मधे पदके मिळवायची आणि विश्वचशक जिंकायची का अपेक्षा धरावी. खरी खंत खेळांना (क्रिकेट सोडून) योग्य प्रोत्साहन नाही ही आहे.


         "भारत फुटबॉल च्या विश्वचशकात कधी खेळणार?" असे खिजवत विचारायची संधी माझ्या सहकार्‍यांनी (इंग्लिश आणि स्कॉटिश) अजिबात सोडली नाही."ह्या आयुष्यात नक्की" असे उत्तर देऊन मी वेळ मारून नेली. तशी अजून ७५-८० वर्षे तरी जगेन तेव्हा आशा करतो की माझी इच्छा नक्की पूर्णं होईल.


असो, सध्यातरी आपण रविवारच्या फ्रांस विरुद्ध इटली फुटबॉलच्या अंतिम सामन्याचा आनंद लुटू.